Friday, July 12, 2024
Homeचिट चॅटराजाभाऊ देसाई कबड्डी...

राजाभाऊ देसाई कबड्डी चषकाच्या जेतेपदावर भारत पेट्रोलियमचीच हॅटट्रिक

अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महापालिका (टीएमसी) भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली आणि भारत पेट्रोलियमने ठाणे पालिकेचा थरारक संघर्ष ३०-२५ असा मोडत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर सलग तिसर्‍यांदा आपले नाव कोरले. गतवर्षीही त्यांनी आयएसपीएलवर निसटता विजय मिळवत जेतेपद राखले होते तर यंदा टीएमसीला हरवत हॅटट्रिक साजरी केली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीच्या कबड्डीभूमीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अंगावर शहारे आणणारा संघर्ष अनुभवता आला. उपांत्य फेरीच्या लढतीत भारत पेट्रोलियम आणि ठाणे महापालिकेने प्रतिस्पर्धी संघांना संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. पण एकतर्फी उपांत्य लढतींनी कंटाळलेल्या कबड्डीप्रेमींनी अंतिम सामन्यात रोमांचक मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

शेवटच्या चढाईवर उपांत्य फेरी गाठणार्‍या भारत पेट्रोलियम आणि ठाणे पालिकेनेच अंतिम फेरी गाठली आणि सामन्याचा थरार शेवटच्या मिनिटापर्यंत कायम ठेवला. भारत पेट्रोलियमने आकाश पिकलमुंडेच्या चढाई-पकडीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पहिल्या सत्रात १५-१० अशी आघाडी घेतली असली तरी ठाणे पालिकेच्या अनिकेत मानेने अफलातून चढाया करत शेवटपर्यंत सामन्यात विजयाचा सस्पेन्स कायम राखला.

भारत पेट्रोलियममध्ये प्रो कबड्डीचे अनेक स्टार असले तरी आकाश पिकलमुंडे आणि शुभम शेळकेच्या खेळापुढे त्यांचे अस्तित्त्व जाणवलेच नाही. शेवटची ८ मिनिटे असताना अनिकेत मानेच्या झंझावाती खेळाने सामन्यात अनोखी रंगत आणली. ते १६-२१ असे पिछाडीवर होते तेव्हाच अनिकेतच्या करंट मारणार्‍या चढाईने भारत पेट्रोलियमचे तीन खेळाडू बाद केले. त्यामुळे स्कोर १९-२१ असा झाला. मात्र यानंतर पिकलमुंडेच्या चढाईं आणि पकडींनी संघाला २८-१९ अशी आघाडी मिळवून दिली. ठाणे पालिकेवर लोण चढल्यामुळे ते काहीसे मागे पडले. पण शेवटची ३ मिनिटे असताना सामन्याने वेगळेच रंग दाखवले.

अनिकेतने आणखी एक भन्नाट चढाई करत बीपीसीएलच्या दोघांना टिपले. त्यातच शुभम शेळकेची पकड करून ठाणे पालिकेने बीपीसीएलच्या पोटात गोळा आणला. सामन्यात ठाणे पालिका २२-२८ अशी मागे होती. त्याच क्षणाला अनिकेत मानेच्या आणखी एका चढाईने पुन्हा एकदा बीपीसीएलच्या ३ खेळाडूंना बाद करत सामना २५-२८ वर नेला. बीपीसीएलवर लोणचे संकट ओढावले होते. सामना संपायला फक्त ९० सेकंद बाकी होते. तेव्हा अनिकेतची ही चढाई निर्णायक ठरली. पिकलमुंडे आणि निलेश शिंदेने दोघांत अनिकेतची मगरमिठीसारखी जबरदस्त पकड करत आपले लोणचे संकट टाळले आणि आपला पराभवही टाळला. अनिकेतला या चढाईत यश मिळाले असते तर स्कोर २९-२८ असा ठाणे पालिकेच्या बाजूने असता. पण बीपीसीएलने जेतेपद ३०-२५ असे खिशात घालत राजाभाऊ देसाई स्मृती चषक जिंकण्याची हॅटट्रिक केली.

इंडियन ऑइल, एलआयसी, सारस्वत बँक आणि ओएनजीसीच्या पाठिंब्यामुळे दिमाखदार झालेल्या या कबड्डी सोहळ्याचा पुरस्कार वितरण सोहळा माजी महापौर श्रद्धा जाधव, मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत, भारतीय कामगार सेनेचे निशिकांत शिंदे, प्रकाश पवार, जयराम शेलार, रवी शिंदे, शाखाप्रमुख संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला. बीपीसीएलचा पिकलमुंडे सर्वोत्तम चढाईपटू तर शुभम शेळके सर्वोत्तम खेळाडू ठरला. टीएमसीचा सिद्धेश तटकरे सर्वोत्तम पकडवीर ठरला.

तत्पूर्वी उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने शुभम शेळके आणि आकाश पिकलमुंडेच्या जोरदार चढायांमुळे बँक ऑफ बडोदाचा ३२-२१ असा सहज पराभव केला.अभिमन्यू गावडे आणि साहिल राणे यांनी मध्यंतराला बडोदा बँकेला १३-११ अशी आघाडी मिळवून दिली होती, पण उत्तरार्धात त्यांचा खेळ फुसका झाला. दुसर्‍या सामन्यात ठाणे पालिकेने अनिकेत माने आणि मनोज बोंद्रेच्या खेळामुळे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा ३६-२४ असा सहज पराभव केला होता.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!