देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2026-27च्या रब्बी हंगामासाठी गव्हासह सहा प्रमुख पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार समितीच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुठल्या रब्बी पिकांसाठी एमएसपी किती वाढली आहे आणि शेतकऱ्यांना आता काय सरकारी भाव मिळेल ते जाणून घ्या. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत मिळेल आणि पीक विविधतेला चालना मिळेल. एमएसपीमध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल आणि शेती फायदेशीर होण्यास मदत होईल.
गव्हाच्या एमएसपीमध्ये किती वाढ?
गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 160 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे 2026-27च्या पीक विपणन हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ होऊन ती गेल्या वर्षीच्या 2,425 रुपयांच्या तुलनेत 2,585 रुपयांपर्यंत वाढली आहे. सरकारी आकलनानुसार, गव्हाच्या उत्पादनाचा खर्च प्रति क्विंटल 1,239 रुपये आहे. परिणामी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनखर्चापेक्षा अंदाजे 109 टक्के नफा मिळेल.
रेपसीड मोहरीच्या किंमतीत किती वाढ?
सरकारने रेपसीड मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 250 रुपयांनी वाढ केली आहे. मोहरीची एमएसपी आता 5,950 रुपयांवरून 6,200 रुपयांपर्यंत वाढली आहे. या पिकांचा उत्पादनखर्च प्रति क्विंटल 3,210 रुपये आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अंदाजे 93 टक्के नफा होईल. या वाढीमुळे तेलबियांचे उत्पादन वाढण्यास आणि शेतकऱ्यांना चांगले भाव मिळण्यास मदत होईल.

हरभरा, मसूरच्या किमतीत किती वाढ?
हरभरा आणि मसूर यासारख्या डाळींच्या किंमतीतही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. हरभराच्या किमान आधारभूत किंमतीत 225 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे आणि आता ती प्रति क्विंटल 5,875 रुपये झाला आहे, जी गेल्या वर्षी 5,650 रुपये प्रति क्विंटल होती. हरभराचा उत्पादन खर्च 3,699 रुपये प्रति क्विंटल आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना 59 टक्के नफा होईल. मसूरची एमएसपी 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. 2026-27 च्या मार्केटिंग हंगामात आता मसूरला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल. गेल्या वर्षी हा भाव 6,700 रुपये होता. मसूरचा उत्पादन खर्च 3,705 रुपये प्रति क्विंटल आहे आणि शेतकऱ्यांना त्यातून अंदाजे 89 टक्के नफा मिळेल.
जव, करडईमध्ये किती नफा होईल?
बार्लीची (जव, सत्तू) एमएसपी प्रति क्विंटल 170 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता बार्लीचा सरकारी खरेदीभाव 1,989 रुपयांवरून 2,150 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. बार्लीचा उत्पादनखर्च 1,361 रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांना त्यातून 58 टक्के नफा मिळणार आहे. याशिवाय, करडईची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 600 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आता नवी किंमत प्रति क्विंटल 6,540 रुपये झाली आहे, जी गेल्या वर्षी 5,940 रुपये होती. करडईचा उत्पादनखर्च 4,360 रुपये प्रति क्विंटल आहे आणि शेतकऱ्यांना त्यावर 50 टक्के नफा मिळेल.