स्थळ आहे ठाणे शहरातील (प.) गोकुळ नगर चौक, कॅसेलमिल परिसरात! परिसराला नाव आहे मीनाताई ठाकरे चौक. एक छोटंसं वाहतूक बेटही आहे. मीनाताई जशा हळव्या होत्या तसंच या छोटेखांनी वाहतूक बेटाबाबतही समस्त ठाणेकर हळवे आहेत. वाहतूक बेट सुस्थितीत आहे. परंतु या देव्हाऱ्यात देवच नाही, अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी काही कारणाने मीनाताईंचा अर्धपुतळा तेथील चबूतऱ्यावरून उतरवण्यात आला तो आतापर्यंततरी तेथे स्थानापन्न करण्यात आलेला नाही.
संतापजनक बाब म्हणजे ठाणे महापालिकेचे अधिकारी या संबंधात काहीच सांगण्यास तयार नाहीत. शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याबाबत साधा आवाजही उठवत नाहीत. याबाबत ठाणेकर जनता नाराज आहे.
इतकेच नव्हे तर मातोश्री बंगल्याशी घानिष्ठ संबंध असणारे वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षाचे आमदार असूनही तेही हाताची घडी घालून बसल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच भाजप नेत्यांना श्रद्धास्थानी असलेल्या बाळासाहेबांच्या पत्नीसंदर्भात इतके अलिप्त धोरण स्वीकारल्याबद्दल ठाणेकर त्यांनाही बोल लावत आहेत. चबूतऱ्यावरील अर्धपुतळा काढल्यावर त्या जागेभोवती पडदा वगैरे बांधण्याचे साधे सामान्यज्ञानही पालिका प्रशासनाकडे नसावे यांचे ठाणेकरांना सखेद आश्चर्य वाटत आहे. आता ती जागा पडदानशीन करायचे ठरेलही. पण आता ती वेळ निघून गेलेली आहे. सध्या या चबूतऱ्याची अवस्था ‘देव नाही देव्हाऱ्यात’ अशीच आहे. सध्या महाविकास आघाडी तसेच महायुतीचे धुरंधर राजकारणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नावाने आणभाका घेऊन जनतेसमोर जात आहेत व पुढील तीन महिने तर ‘अहो.. येता जाता.. उठत बसता..’ या तालावर साहेबांचा मंत्रजागर केला जाणार आहे. आता मतदारांनीच आपल्या ‘आई’ला असे तिष्ठत ठेवणाऱ्यांना धडा शिकवावा!
छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे