Thursday, September 19, 2024
Homeकल्चर +दत्तपाड्यातले हिंदू विश्रांती...

दत्तपाड्यातले हिंदू विश्रांती गृह ते हॉटेल सतिश..

मुंबईत लोकल रेल्वेवरील पूर्व-पश्चिम फाटक ओलांडणे पूर्वी तापदायकच होते. बोरीवलीत दत्तपाड्यात जाण्यासाठी पश्चिमेकडून फाटक ओलांडणे म्हणजे एक दिव्यच असायचं. उजवीकडून येणाऱ्या लोकलवर लक्ष ठेवावे लागे. बोरिवलीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर लोकल उभ्या असल्या की उजवीकडची लोकल दूरवर थांबत असे. प्लॅटफॉर्म रिकमा झला की हळूहळू थांबलेली लोकल पुढे येत असे. तिच्यावर लक्ष द्यावं लागे. पुढची लाईन ओलांडताना बोरीवलीहून सुटणाऱ्या लोकलवर लक्ष ठेवावे लागे. त्याच्या पुढच्या लाईन्स म्हणजे फास्ट गाड्यांचा मृत्यूचा सापळाच. गुजरात, दिल्ली, फ्रंटीयरकडे धडाडत जाणाऱ्या मेलगाड्या बघताबघता जवळ यायच्या. त्यांना चुकवून पुढे जायची कला दत्तपाड्यातले लोक शिकले होते. तरीही संध्याकाळी शिंपोली गावात गेलेली मंडळी सुखरूप घरी पोहोचेपर्यंत घरच्या लोकांना काळजी वाटे.

हे अडथळे ओलांडले, की तुम्ही दत्तपाड्यात पोहोचलात म्हणून समजा. छोट्या गेटमधून पुढे आलात की समोर क्षितिजावर कौलारू घरांच्या मागे डोंगररांगा पाहून छाती अभिमानने फुलत असे. आजची परिस्थिती वेगळी आहे. भुयारातून वाकून बाहेर येताना सुरक्षित वाटते खरे, पण डोंगर दिसत नाहीत. उंच इमारतीच्या पुढे खूप खुजे झाल्यासारखे वाटते.

असाच एक दिवस बोरिवली पश्चिमेकडून येत होतो. नुकतीच गिरगाव कट्ट्यात मिसळ खाल्ली‌ होती. मराठमोळी चव, रेल्वे खालून गेलेल्या सब-वेतून पुर्वेला बाहेर येईपर्यंत जिभेवर रेंगाळत होती. असाच एक पदार्थ लहानपणी मिळायचा. येथेच उजव्या बाजूला दुकानांच्या रांगेत एक हॉटेल होतं. “हिंदू विश्रांती गृह”. त्या काळात वडा सांबार, मसाला डोश्याला रहिवाशांनी दत्तपड्यात, वेलकम केलं नव्हतं. एकच हॉटेल होतं. हिंदू विश्रांती गृह. सकाळी शाळेत जाताना ह्या हॉटेलवरूनच जावे लागे. सुरू झालेली लगबग, स्टोव्हचा आवाज, कप-बशांची किणकीण आणि त्यात मिसळलेला उसळ, मिसळीच्या रश्शाचा वास. बटाटेवड्याचा डोंगर काचेच्या कपाटात दिसयचा. त्याचं शिखर कपाटाच्या खणाच्या वरच्या फळीपर्यंत पोहोचलेले असे. खमंगपणा शाळा येईपर्यंत नाकात भरून राही. दुपारी शाळेतून घरी येताना सहज नजर काचेच्या कपाटाकडे जायची. वड्यांच्या डोंगरानं तळ गाठलेला असायचा.

दुपारच्या उन्हातून आल्यावर पलिकडल्या पत्र्याच्या भिंतीवरच्या कोल्ड ड्रिंक्सच्या रंगीत बाटल्या दिसू लगायच्या. जिंजर, गोल्ड स्पॉट, लेमन, रिमझीम, कोका कोला आणि गुलाब. उन्हातून आल्यावर त्यांच्याकडे पाहूनच तहान भागवावी लागे. कधीकाळी जिंजरची चव चाखायला मिळत असे. आजोबांचं पोट बिघडलं की ते डॉक्टरकडे न जाता, आम्हाला जिंजरची बाटली घेऊन यायला सांगत. पिवळसर हिरवा रंग. आजोबांच्या हातात ती बाटली दिली जाई. बरोबर किणी काकांनी दिलेल्या ओपनरने आजोबा बाटलीवरचा बिल्ला उघडत. निळा प्रिंट असलेला बिल्ला आम्ही आमच्या ताब्यात घेत असू. गोट्यांबरोबर खेळण्याची एक संपत्ती होती ती. बाटलीतुन आजोबा जिंजर आमच्यासाठी कपात भरीत. नंतरच ते स्वतः पित. प्यायल्यावर आजोबांना आराम पडत असे. रिकामी झालेली बाटली आणि ओपनर परत घेऊन जाणे आणि डिपॉझिटचे पैसे परत आणणे ह्यातही एक मजा होती. जिंजरची आठवण झाली की आजोबांच्या तब्येतीची चौकशी आम्ही करीत असू. अशावेळी आजोबांना नातवंडांबद्दल आपुलकी वाटे. खुश झाले की एखादी गुलबकावलीची गोष्ट सांगत. आलं, लिंबू सोडा ह्याचं मिश्रण असलेलं ते पेय आता दिसत नाही.

एखाद्या रवीवारी रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ होत असे. करामती करुन झाल्यावर थाळी फिरवली जाई. थाळीत जमलेली संपत्ती घेऊन डोबाऱ्याचं कुटूंब धाव घेत असे ते हिंदू विश्रांती गृहाकडे. दारातच गटाराच्या पत्र्यावर बसून उसळपाव, बटाटावडा खाऊन तृप्त होऊन डोंबारी कुटूंब पुढच्या खेळासाठी निघत असे. एकवेळेची भूक भागली, आता रात्रीच्या जेवणासाठी नवा खेळ. असे गरिबांना खाऊ घालण्याचे काम हिंदू विश्रांती गृह करीत असे. कडकलक्ष्मी, गारूडी, जादूचे खेळ करणरा, खेळ संपला की जमुऱ्याबरोबर येथेच येत असत. चांगले पैसे मिळाले तर फाफडा जिलबीचा स्वाद घेत असे. दुपारच्या वेळेस फाटकात उभ्या असलेल्या ट्रकचे ड्रायव्हर आणि क्लिनर आपल्याकडील भाकरी ह्याच हॉटेलच्या उसळीबरोबर खात. तृतीय पंथीयांचा थवा दुपारच्या जेवणाला येथेच आश्रय घ्यायचा. किणी काकांचा त्यांच्याशी वेगळ्याच भाषेत संवाद चाले. हे बोलणे ऐकून कुतूहल वाटे. नंतर कळलं ह्यांच्याकडून त्यांना सुट्या पैशांची चिल्लर मिळत असे.

दुपारी धावपळ थांबून सगळीकडे शांतता पसरे. अशावेळी एक अवलिया हॉटेलच्या दारात बसून आपली भूक भागवी. त्यानंतर घटकाभर बसून त्याने वाजवलेल्या बासरीचे मधुर सूर कानावर पडत. त्यात हमखास ऐकलेलं गाणं, दोस्ती सिनेमातलं.

“कोई जब राह ना पाये मेरे संग आये

के पग पग दीप जलाये

मेरी दोस्ती मेरा प्यार

मेरी दोस्ती मेरा प्यार”

बासरीतल्या ह्या गाण्याचे सूर कानी पडले की आम्हा बलमित्रांच्या खांद्यावरचे हात नकळत एकमेकांना जास्त जवळ घेत. तसेच त्या काळात गाजलेले आणखी एक गाणे त्याच्या बासरीतून ऐकायला मिळे. ते म्हणजे…

“अकेली मत जइयो राधे जमुना के तीर

ओ जी ओ 

तू गंगा की मौज मैं जमुना का धारा

हो रहेगा मिलन, ये हमारा

हो हमारा तुम्हारा रहेगा मिलन

ये हमारा तुम्हारा”

ह्याला त्याच्या राधेची आठवण आली असेल का? एवढं सुंदर बासरीवादन करणाऱ्या माणसाला आम्ही मुलं मात्र लांबूनच चिडवून पळत असू.

“एऽ एऽ नारायण पागल!”

ह्या सगळ्याचे साक्षीदार होते मालक श्रीनिवास किणी. साडेपाच सहा फूट उंची. काळा वर्ण. भव्य कपाळ. गल्यावर कॅशियर म्हणून बसलेले दिसायचे. पांढरा स्वच्छ अंगरखा, तेवढाच शुभ्र पंचा. हाच त्यांचा पोषाख. हसरा चेहरा, बोलके डोळे आणि समाधानी असलेली गरीबी. संसार चालवण्यासाठी चालवलेले हॉटेल. त्यात त्यांना भावाची सोबत होती. त्यांचा भाऊ ऑर्डरप्रमाणे टेबलावर खाद्यपदार्थ आणून ठेवीत असे. गल्ल्यावर बसलेल्या किणी काकांनी गल्ल्यावरची बेल टपली मारुन वाजवली की, एका हातात वड्यांची प्लेट आणि एका हातात तीन-चार चहाच्या कपबश्यांचा टॉवर घेतलेला भाऊ जोरात ओरडत असे. “पुढे ऐंशी पैसे. मागे पांढरा शर्ट एक रूपया, त्याच्या मागे पन्नास पैसे.”

त्यावेळी स्वस्ताई होती. तिच्या जोडीला गरीबीचं साम्राज्यही. चार मुलं, त्यांची शिक्षणं. ह्या सगळ्यांचा ताळमेळ साधण्याची कसरत होती. महागाई वाढली होती. नव्या अर्थव्यवस्थेचे वारे बोरीवलीत वाहू लागले. त्याबरोबर स्पर्धा वाढली. किणी काकांना हॉटेल चालवणे कठीण जाऊ लागले. शेवटी जड अंतःकरणाने निर्णय घ्यावा लागला. हॉटेल काही वर्षांच्या कराराने दुसऱ्यांना चालवायला द्यावे लागले. पिवळ्या बॅकग्राऊंडवर लाल अक्षराने लिहीलेला “हिंदू विश्रांती गृह” नावाचा फलक खाली उतरवला गेला. नविन फलक लागला “हॉटेल सतिश”.

काही वर्षं चांगली गेली. मुलं मोठी झाली. ठरलेल्या वर्षात हॉटेल परत मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. ह्या काळात किणी काका संध्याकाळी मारूतीच्या देवळाच्या मागे उभं राहून बराच वेळ हनुमानाची आळवणी करताना दिसायचे. मारूतीरायाने प्रार्थना ऐकली. हॉटेल सतिशची मालकी पुन्हा मिळाली. मुलींची लग्नं झाली. सतिश आणि अशोक ही दोन्ही मुलं हॉटेलचा कारभार सचोटीने पाहात आहेत. किणी काका हयात नसले तरी जिथे असतील तिथून समाधानाने हे पाहात असतील!

सबवेच्या भुयारामुळे रेल्वेलाईन ओलांडायचा धोका राहिला नाही, तरीही दत्तपाड्यातील हौशी लोक आता पश्चिमेला शिंपोली गावात जाण्याचे टाळू लागले. त्याचं एकमेव कारण म्हणजे, “हॉटेल सतिश”!

संपर्क- ९८२०३७२६७१

Continue reading

error: Content is protected !!
Skip to content