माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचा चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने विनाशुल्क शालेय खेळाडूंची सांघिक सुपर लीग कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त ही स्पर्धा १ ते ४ मेदरम्यान मुंबईत दादर-पश्चिम येथील को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात रंगणार आहे. राज्यातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील निवडक शालेय नामवंत सबज्युनियर कॅरमपटू स्पर्धेत सहभागी होत आहेत. सुपर लीग पद्धतीच्या लढती सहा संघांमध्ये रंगणार आहेत. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, टी शर्ट, आकर्षक चषक पुरस्कारासह स्ट्रायकर आदी स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असेल. सदर उपक्रम पूर्णपणे मोफत राबविला जाणार आहे.
उदयोन्मुख शालेय खेळाडूंना शास्त्रोक्त सरावासह स्पर्धात्मक सामने खेळण्याची मोफत संधी विविध उपक्रमांद्वारे उपलब्ध करण्यासाठी को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांचे संयोजक लीलाधर चव्हाण व प्रमोद पार्टे यांना मार्गदर्शन लाभत आहे. सुपर लीग सांघिक कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे व स्वरा कदम, नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, आयएनजी इंग्लिश स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, पार्ले टिळक विद्यालयाचा मंदार पालकर, सार्थक केरकर, अमेय जंगम, टीआरपी स्कूल-दहिसरचा तीर्थ ठक्कर, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुलकर्णी, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, वेदांत पाटणकर, देविका जोशी, सारा देवन, निधी सावंत, अद्वैत पालांडे, अर्णव गावडे आदी सबज्युनियर कॅरमपटू स्पर्धा गाजविण्यासाठी उत्सुक आहेत. को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन सभासदांच्या शालेय पाल्यांसाठी विनाशुल्क मार्गदर्शनासह निवड चाचणी कॅरम शिबीर २० एप्रिल रोजी दादर-पश्चिम येथे होणार असून त्याचवेळी ड्रॉ जाहीर होईल.