मुंबईतल्या पाचही प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी तसेच एसटी आणि शाळांच्या बससाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज, १४ ऑक्टोबरला मध्यरात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी होईल.
मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हलकी वाहने, शाळेच्या बसेस आणि एसटी बसेस यांना पथकरातून सूट राहील. सायन पनवेल महामार्गावर वाशी येथे, लालबहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व द्रूतगती मार्गावर मुलुंड येथे ऐरोली पुलाजवळ, पश्चिम द्रूतगती मार्गावर दहिसर येथील पथकर नाक्यावर याची अंमलबजावणी होईल. पथकरातून सूट दिल्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळास द्याव्या लागणाऱ्या भरपाईसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या टोलमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर साधारण पाच हजार कोटींचा बोजा पडेल.