वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.
वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या सुधारणांविरूद्ध आजच्या नमाजनंतर देशभरात मुसलमानांनी निदर्शने करावी, असे आवाहन अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच त्यांच्या धर्मगुरूंनी केले आहे. त्यामुळे आता नमाज संपल्यानंतर मुसलमानांकडून निदर्शने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच व्यक्तींनी वक्फ बोर्ड कायद्याच्या सुधारणांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या सर्व याचिकांवर एकत्रितपणे १६ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या सुधारणांविरूद्ध सह्यांची मोहीमही राबविण्यात येत असून सुमारे एक कोटी सह्या याकरीता गोळा केल्या जाणार आहेत.