‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा‘ या गाजलेल्या चित्रपटात छोट्या-छोट्या भूमिका करणारे हौशी कलावंत पुंडलिक रामचंद्र पालवे यांचे काल, २५ एप्रिल रोजी, रात्री ११.३० वाजता नाशिक येथील एका रुग्णालयात निधन झाले.
ते गेले १३ दिवस नाशिकमध्ये एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होते. ६७ वर्षांच्या पुंडलिक पालवे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

प्रख्यात लेखक संजय कृष्णाजी पाटील यांच्यासोबत त्यांचा जवळचा स्नेह होता. त्यांच्या ‘दशक्रिया’, ‘बंदिशाळा’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी लहानलहान भूमिका केल्या होत्या. ‘बंदिशाळा’ या चित्रपटात पडद्यामागे राहूनही त्यांनी काम केले होते.
पाठबंधारे विभागात निरीक्षक पदाची नोकरी करताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील नागरिकांसोबत त्यांचे स्नेहपूर्ण संबंध तयार झाले होते. ते गेली ३० वर्षे प्रशासकीय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मित्रत्वाच्या नात्याने संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे सहाय्यक लेखक म्हणून हौसेने काम पाहात होते. मराठी कथा, काव्य, कादंबरी साहित्य वाचनात तसेच त्यावरील चर्चांमध्ये त्यांना विशेष रुची होती.

