Tuesday, September 17, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजलढवय्या सलामीवीर शिखर...

लढवय्या सलामीवीर शिखर धवन!

भारताचा माजी डावखुरा लढवय्या सलामीवीर, ३८ वर्षीय शिखर धवनने अखेर आपल्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. गेल्या २ वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघासाठी शिखरला दरवाजे बंद झाले होते. दुखापती, खराब फॉर्म आणि गिल-जयस्वाल या युवा सलामीच्या जोडीचे भारतीय क्रिकेट संघात यशस्वी आगमन झाल्यामुळे शिखरसाठी आता भारतीय संघात स्थान मिळविण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे त्याने आपली बॅट “म्यान” करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल. आपल्या धडाकेबाज आणि फटकेबाज फलंदाजीचा ठसा शिखरने उमटवला. सोनेट क्लब, पश्चिम दिल्ली येथून आपला क्रिकेटचा श्रीगणेशा करणाऱ्या शिखरकडे वेगवान गोलंदाजी खेळण्याचे तंत्र फारसे चांगले नव्हते. तरीदेखील जबरदस्त जिद्दीच्या आणि बेधडकपणाच्या जोरावर कायम सकारात्मक असलेल्या शिखरने भारतीय संघातील स्थान निश्चित केले हीदेखील बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल.

तारक सिन्हा, मदन शर्मा यांच्या तालमीत शिखर तयार झाला. धडकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीकर विरेंद्र सेहवागची भारतीय संघातील जागा घेणाऱ्या शिखरने मग त्याचाच वसा पुढे कायम ठेवला असे म्हटले तर वावगे ठरू नये. एखाद्या कुस्तीपटूप्रमाणे मजबूत शरीरयष्टी लाभलेल्या शिखरच्या फटक्यात विविधता बघायला मिळाली. पूर्ण ताकदीने मारलेले त्याचे अनेक फटके सीमारेषा कधी पार करायचे ते क्षेत्ररक्षकांना कळत नसायचे. गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवायला शिखरला नेहमीच आवडायचे. गोलंदाजांना कधीच वरचढ होऊ द्यायचे नाही अशीच शिखरची देहबोली असायची. “गब्बर” या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण मात्र खराब होते. सलामीच्या दोन वनडे सामन्यात त्याला भोपळादेखील फोडता आला नाही. त्यामुळे पुन्हा संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला काही काळ झगडावे लागले.

२०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने मोहाली कसोटीत पदार्पण केले. सेहवागला डावलून त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष असलेल्या मुंबईकर माजी कसोटीवीर संदीप पाटील यांनी धवनला त्या कसोटीत खेळण्याची मोठी संधी दिली. त्या संधीचे शिखरने सोने केले. त्याने तुफानी १८५ धावांची जबरदस्त शतकी खेळी केली. अवघ्या ८५ चेंडूत त्याने शतक ठोकले. कसोटीत पदार्पणात एवढ्या कमी चेंडूत शतक काढणारा शिखर पहिला फलंदाज ठरला. हा कसोटी सामना भारताने सहज जिंकला होता. यावेळी नशीबदेखील त्याच्यावर खूष होते. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्टार्क गोलंदाजी करताना त्याच्या हाताला लागून सुटलेला चेंडू थेट यष्टिवर आदळला होता. त्यावेळी नॉनस्ट्रायकर एंडला उभा असलेला शिखर क्रीझच्या बाहेर होता. त्यावेळी त्याच्या नावावर फारशा धावादेखील नव्हत्या. नियमाप्रमाणे शिखर बाद होता. परंतु ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील न केल्याचा फायदा शिखरला मिळाला. मग मात्र शिखरने मागे वळून बघितलेच नाही.

पुढील ७-८ वर्षे भारतीय संघातील त्याचे स्थान पक्के झाले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत त्याने अनेक महत्त्वपूर्ण भागिदाऱ्या करून भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली. संघ जिंकावा यासाठीच शिखरची नेहमी धडपड असायची. विशेषतः आयसीसी क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याची बॅट खूप चालली. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात शिखरची मोठी भूमिका होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढताना त्याने सर्वोत्तम खेळाडूचा मानदेखील मिळवला होता. इतरांना नेहमीच मदतीचा हात देणारा शिखर झेल टिपल्यावर मांडीवर हात मारून कबड्डीपटूंप्रमाणे जल्लोष करणारा क्रिकेटप्रेमींना नेहमीच मैदानावर बघायला मिळाला. तो क्रिकेटमध्ये नसता तर चांगला कबड्डी अथवा कुस्तीपटू म्हणून पुढे आला असता.

२००४मध्ये ढाका येथे झालेल्या १९ वर्षांखालील विश्व क्रिकेट स्पर्धेसाठी शिखरची निवड सुरुवातीला भारतीय संघात करण्यात आली नव्हती. त्यावेळी बीसीसीआयच्या टॅलेंट सर्च डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर होते. त्यांनी निवड समिती सदस्यांकडे तेव्हा शिखरच्या निवडीसाठी आग्रह धरला. वेंगसरकरांचा मान राखून शिखरला भारतीय संघात स्थान मिळाले. मग ही स्पर्धा शिखरने चांगलीच गाजवली. त्याने ७ सामन्यात ८४.१६च्या सरासरीने ५०५ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे संदीप पाटील आणि दिलीप वेंगसरकर या दोघांचे ऋण शिखर कधीच विसरू शकत नाही. ३४ कसोटी, १०७ वनडे आणि ६८ टी-२० सामने तो भारतातर्फे खेळला. वन डे सामन्यात ५ हजारपेक्षा जास्त धावा करणारा, ४०पेक्षा जास्त सरासरी असणारा आणि ९०पेक्षा जास्त स्ट्राइकरेट असणाऱ्या विश्वातील अव्वल फलंदाजांमध्ये शिखरचा समावेश आहे. धोकादायक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखरला २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला होता. क्रिकेटचे “बायबल” समजल्या जाणाऱ्या “विस्डेन” मासिकानेदेखील शिखरची दखल घेतली. आयसीसीचा सर्वोत्तम फलंदाजाचा पुरस्कारदेखील शिखरला मिळाला. प्रथम दर्जाच्या सामन्यात तो दिल्ली आणि पंजाबतर्फे खेळला तर आयपीएल स्पर्धेत दिल्ली, मुंबई, पंजाब, हैद्राबादचे त्याने प्रतिनिधित्त्व केले.

२०१६ साली हैद्राबाद संघाने आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्या विजयात शिखरचा वाटा मोठा होता. आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखर दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत २२२ आयपीएल सामने खेळणाऱ्या शिखरने ६७००पेक्षा जास्त धावा फटकावल्या. त्यात २ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. तब्बल सव्वाशे कोटींचा धनी असलेला शिखर पुढे काय करणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. प्रशिक्षक, बॉलिवुड अथवा व्यवसायिक यामध्ये तो आपली भावी कारकीर्द करू शकतो असा अंदाज आहे. या लढाऊ बाणा असलेल्या फलंदाजाच्या वाट्याला फारसे कौतुक मात्र आले नाही. तसेच दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी शिखरला मिळाली नाही. बऱ्याचदा छोट्या दौऱ्यांसाठी ज्येष्ठ खेळाडू उपलब्ध नसताना कर्णधारपदाची जबाबदारी शिखरकडे दिली जात होती. शिखरने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान मात्र भारतीय क्रिकेटप्रेमी विसरू शकणार नाही.

Continue reading

पॅरालिम्पिक: भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला सलाम

पॅरिस येथे संपन्न झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करुन नवा इतिहास रचला. भारताने या स्पर्धेत प्रथमच ७ सुवर्ण, ९ रौप्य, १३ कांस्य अशी एकूण २९ पदके मिळवून पदकतालिकेत १८वा क्रमांक मिळवला. गेल्या टोकियो स्पर्धेत भारताने १९ पदके...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्येदेखील महत्त्वाच्या पदावर अनेक भारतीयांनी स्थान...

भारतीय हॉकीचा दर्जा उंचावणे आवश्यक

भारतीय हॉकी संघाला आगामी काळात प्रमुख आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांत चांगली कामगिरी करायची असेल तर भारतीय हॉकी संघाच्या खेळात आणखी सुधारणा होणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक राखण्यात भारतीय हॉकी संघाला यश आले. परंतु गेली...
error: Content is protected !!
Skip to content