Homeबॅक पेजसत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही...

सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांचेही थिरकतात पाय तेव्हा…!

हल्ली रोज समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश येताहेत आणि त्यातून आयुष्य संपविण्याच्या गोष्टींचाच उहापोह करण्याचे उद्योग सुरु असल्याचे जाणवते. याच पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरात दहिसर येथील सत्तरी गाठलेल्या, ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पालवी ज्येष्ठ नागरिक नावाने एक संस्था उभी केली आणि मल्ल्या वराडकर फ्रेंड्स (मित्र मंडळ) या नावाने एक वाद्यवृंद तयार केला. ‘गाणी आपली, गाणी मनातली आणि गाणी आठवणीतली’ या शीर्षकाखाली रवि मल्ल्या यांनी हा जामानिमा समाजासमोर आणला. लेखन, निवेदन त्यांचेच.

विविध क्षेत्रातील निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ स्त्री-पुरुषांनी या वाद्यवृंदाच्या माध्यमातून आपापल्या कलागुणांना वाव दिला. निर्मात्या वृंदा मल्ल्या यांनी बोरीवली पूर्व येथील सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या अभिनव नगरातील ॲम्पी थिएटर येथे भावगीते, भक्तिगीते यापासून तर उडत्या गाण्यांपर्यंतचा नजराणा सादर केला आणि हां हां म्हणता सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांचे पाय थिरकू लागले. संगीता मिरकर, अजित मोरये, मंजिरी आजरेकर, उमेश लाड, रश्मी मुळे, राजन पट्टण या गायकांनी गायिलेली गाणी ऐकताना साक्षात लतादीदी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, महेंद्र कपूर, महंमद रफी, किशोरकुमार, जयवंत कुलकर्णी आदी कसलेले आणि मनामनात घर करुन बसलेले गायकच आपल्या समोर गाताहेत की काय, असा भास होत होता.

घशाच्या त्रासामुळे नाईलाजाने गाणे सोडावे लागलेल्या रवि मल्ल्या यांनी खुमासदार सूत्रसंचालन करताना या कार्यक्रमात जान आणली. भूषण मुळे, शिरीष वराडकर, अजित मोरये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवि मल्ल्या यांच्या खांद्याला खांदा भिडवून परिश्रम घेतले. विशेष म्हणजे आयर्लंडचे दोन वेळा पंतप्रधानपद भूषविलेल्या डॉ. लिओ वराडकर यांच्या मातोश्री माणिकताई वराडकर वयाच्या ९४व्या वर्षीही या सत्तरी ओलांडलेल्या ‘युवकांना’ आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. शिवभक्त राजू देसाई आणि पाणीवाली बाई म्हणून ओळखण्यात येणाऱ्या समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या पठडीत तयार झालेल्या (माणिकताईसुद्धा मृणाल गोरे यांच्या सहकारी म्हणून कार्यरत होत्या) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी अणावकर यांनीही आपल्या उपस्थितीने ज्येष्ठांच्या कार्यक्रमाला दाद दिली. ओंकार स्वरुपापासून पसायदानापर्यंतच्या सादरीकरणात मराठमोळी संस्कृती या कार्यक्रमाने अधोरेखित केलेली दिसून आली. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीपासून मराठमोळ्या चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या गाण्यांचा नजराणा ज्येष्ठांना तारुण्याकडे पुन्हा झुकण्यासाठी खुणावत होता.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content