जगात दर सहा मिनिटांनी एक माणूस क्षयरोगाने मृत्युमुखी पडतो. तुम्ही हा लेख वाचून पूर्ण कराल, तोपर्यंत जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात एक जीव संपलेला असेल, तेही एका बरे होण्यासारख्या आजाराने. हे वाचून धक्का बसला ना? बसायलाच हवा. कारण क्षयरोग (टीबी – टीबरक्युलॉसिस) हा आजार आजही जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य मारेकरी आहे, आणि भारत या लढाईच्या केंद्रस्थानी आहे. २४ मार्च हा दिवस १८८२ साली डॉ. रॉबर्ट कॉख यांनी क्षयरोगास कारणीभूत जिवाणूचा शोध जाहीर केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी पाळला जातो. त्या एका वैज्ञानिक घोषणेने लाखो जीव वाचवण्याचा मार्ग खुला केला. पण दीडशे वर्षांनंतरही हा आजार अजून आपल्या आयुष्यात कायम आहे, हेच आपल्याला आजही थांबून विचार करायला लावते. यंदाचे जागतिक क्षयरोग दिवसाचे घोषवाक्य आहे- “होय, आम्ही सर्व मिळून टीबी संपवू शकतो, लोकांच्या साथीने, सर्व देशांच्या पुढाकाराने!” ही केवळ घोषणा नाही. हे एक आव्हान आहे. आणि भारत ते स्वीकारताना दिसत आहे.
जग काय सांगते- आकड्यांची भाषा
२०२४मध्ये जगभरात सुमारे १०.७ कोटी लोक क्षयरोगाने आजारी पडले. यात ५.८ कोटी पुरुष, ३.७ कोटी महिला आणि १.२ कोटी मुलांचा समावेश आहे. त्याच वर्षी १२.३ लाखांहून अधिक जणांनी या आजाराने प्राण गमावले. जगातील निम्म्याहून अधिक क्षयरुग्ण केवळ आठ देशांमध्ये आढळतात- बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपाइन्स आणि दक्षिण आफ्रिका या यादीत भारताचे नाव आहे आणि भारत त्यातून बाहेर पडण्यासाठी झुंजतो आहे.
भारताची स्थिती- चिंताजनक, पण आशादायी
भारतात क्षयरोगाची परिस्थिती एकाचवेळी दोन चेहरे दाखवते- एक काळजी वाढवणारा, एक उमेद देणारा. काळजी वाढवणारा चेहरा भयावह आहे. २०२४मध्ये नि:क्षय पोर्टलवर भारतात २६,३०,०२१ क्षयरोगाचे रुग्ण नोंदवले गेले. हे आजवरचे सर्वाधिक नोंदणीकृत प्रमाण आहे. महाराष्ट्र या यादीत उत्तर प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान महाराष्ट्रात १,८८,६५३ क्षयरुग्ण नोंदवले गेले. दुसरीकडे, एक उमेद देणारा चेहराही आहे. भारताचा क्षयरोग दर २०१५मधील प्रति लाखामागे २३७ वरून २०२४ मध्ये १८७ वर आला आहे, हे २१ टक्के घट दर्शवते. हा घसरणीचा वेग जागतिक सरासरी दरापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. २०१५मध्ये उपचाराबाहेर राहणाऱ्या ‘मिसिंग केसेस’ची संख्या १५ लाख होती, ती २०२४मध्ये एक लाखाहून कमी झाली आहे. हे एक मोठे यश आहे.
“नि:क्षय” – नावातच आहे उत्तर
भारत सरकारने क्षयरोग व्यवस्थापनासाठी एक डिजिटल यंत्रणा उभी केली- नि:क्षय पोर्टल. “नि:क्षय” हे संस्कृतमधून आले आहे — “नि:” म्हणजे निर्मूलन करणे, आणि “क्षय” म्हणजे क्षयरोग. नावातच ध्येय आहे. या पोर्टलवर रुग्णाची नोंदणी, निदान, उपचार आणि पाठपुरावा हे सगळे एकाच ठिकाणी होते. सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयांचा यात समावेश आहे. याशिवाय, नि:क्षय पोषण योजनाअंतर्गत प्रत्येक क्षयरुग्णाला उपचाराच्या संपूर्ण कालावधीत दरमहा १,००० रुपये पोषण अनुदान थेट बँक खात्यात दिले जाते. एप्रिल २०१८पासून आतापर्यंत १.३७ कोटी लाभार्थ्यांना ४,४०६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र- लढाई जिंकण्याच्या मार्गावर
महाराष्ट्राने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रतिष्ठित प्रक्रियेत सर्वोच्च नामांकन व पुरस्कार मिळवले आहेत. राज्यात १२,१८० Ni-kshay Mitras नोंदणीकृत आहेत, त्यांनी ३,१४,७६७ पोषण किट क्षयरुग्णांना पुरवले आहेत. राज्यात बिझी लसीकरणाचा विस्तार करण्यात येऊन सप्टेंबर २०२४पासून १८ वर्षांवरील व्यक्तींनाही अतिरिक्त बीसीजी डोस देण्यास सुरुवात झाली. जानेवारी २०२५पर्यंत १५,५८,८२६ जणांना हा डोस देण्यात आला. ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ अभियानाद्वारे ग्रामीण स्तरापर्यंत जनजागृती नेण्याचे काम सुरू आहे.

क्षयरोग कोणाला होतो? हा ‘गरिबांचा आजार’ नाही!
एक सर्वात मोठा गैरसमज मोडून काढणे गरजेचे आहे की, क्षयरोग हा केवळ गरीब किंवा झोपडपट्टीतील लोकांना होतो. असे बहुतेकांना वाटते. पण हे चुकीचे आहे. १९४७मध्ये ब्रिटिश लेखक जॉर्ज ऑर्वेल, ज्यांचा जन्म बिहारच्या मोतिहारीमध्ये झाला होता, त्यांनी क्षयरोगाशी झुंजत त्यांचे महाकाव्य ‘१९८४’ पूर्ण केले. खोकताना रक्त पडत असतानाही ते लिहित राहिले. पुस्तक पूर्ण झाले आणि वर्षभरातच त्यांचे निधन झाले. हवा हे माध्यम आहे. श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण भेद नाही. पण कुपोषण, दाटीवाटी राहणे, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती यामुळे धोका वाढतो हे खरे.
लक्षणे ओळखा – वेळेत उपचार घ्या
खालील लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असतील तर लगेच क्षयरोग तपासणी करा:
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, रात्री घाम येणे, भूक न लागणे आणि वजन कमी होणे, ही सर्व लक्षणे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. सरकारी रुग्णालयात तपासणी व उपचार दोन्ही मोफत आहेत.
जबाबदारी फक्त सरकारची नाही. यंदाच्या घोषवाक्याचा गाभा हाच आहे – देश नेतृत्व करतील, पण खरी शक्ती जनतेतून येईल.
तुम्ही काय करू शकता?
जवळच्या कोणालाही दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असेल तर आग्रह करा, तपासणी करा. टीबी रुग्णाला ‘टाळू’ नका, साथ द्या. नि:क्षय मित्र व्हा, एखाद्या रुग्णाचे पालकत्व घ्या. टीबीबद्दलचा कलंक मिटवा- हे पाप नाही, आजार आहे.
शेवटी एक प्रश्न
२०२४मध्ये जगात क्षयरोगावर उपचार घेतलेल्या रुग्णांच्या कुटुंबांपैकी सुमारे ५०% कुटुंबांना उपचारासाठी घरच्या उत्पन्नाच्या २०%पेक्षा जास्त खर्च सहन करावा लागतो. हा आजार केवळ फुफ्फुसांवर हल्ला करत नाही, तो आर्थिक स्थैर्यावर, कुटुंबांवर, स्वप्नांवर हल्ला करतो. पण आता औषधे आहेत. तंत्रज्ञान आहे. सरकारी योजना आहेत. बाकी आहे, तो फक्त आपला सहभाग. “टीबीमुक्त भारत” हे स्वप्न नाही, ते ध्येय आहे. आणि ते आपल्या सगळ्यांच्या मिळून लढण्यातूनच साकार होईल.
Dr. Swati & Parikshit Baviskar,
Arushree Hospital, Criticare Trauma Care Centre, Near Mahesh Pragati Hall, Ringroad, Jalgaon 425001
9373318222 / 8788804233 / 7775014569 / 9405142857

