वर्षभर पार्ले महोत्सवातील स्पर्धांची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धकांनी यंदा एकच रंगत आणली असून प्रत्येकजण आपले कसब पणाला लावत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या महोत्सवात वेगवेगळ्या ३२ स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात सदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांचाही सहभाग आहे, हे विशेष. यातील सदृढ बालक स्पर्धेत सहा महिन्यांच्या सात्विक खातू, यशस्विनी सोनार, अरझान खान या बालकांनी बाजी मारली.

६ ते १२ महिन्यांच्या वयोगटात निशिता सिद्पुरा, प्रियांश राड्ये, प्रणशी श्रीकार यांनी पहिल्या तिघांमध्ये तर तनीश व्होरा, विरा पाटेरे, आयर्व यादव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. १ ते २ वर्षे वयोगटात क्रिशिव नाईक, श्रेयाशी कदम, मान व्होरा यांना पहिली तीन तर युविका पटेल, युवान पटेल, शिवम गौरव, आनार्य परमार, युवान चंदालिया, अथेना कांत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

वामन मंगेश दुभाषी मैदान, साठ्ये महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, उत्कर्ष मंडळ सभागृह, सहार गाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी या स्पर्धा सुरु आहेत. सदृढ बालक, कबड्डी, मल्लखांब, बुद्धीबळ, पिकल बॉल, फुटबॉल, सायकलिंग, व्हॉली बॉल, बॉक्स क्रिकेट, शरीरसौष्ठव, कॅरम, गायन, चित्रकला, हस्ताक्षर लेखन, मेहंदी, रांगोळी, आदी स्पर्धा गेल्या दोन दिवसांमध्ये आयोजित करण्यात आल्या.

विविध गटांमधील स्पर्धांची प्राथमिक फेरी झाली असून आता येत्या दोन दिवसांत त्यांच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांची लढत होईल. सध्या तरी या फेऱ्यांसाठी खेळांडूंमध्ये अटीतटीची लढत दिसून येत आहे. स्पर्धांमधील उत्साह हा अत्यंत भारावणारा आहे तसेच या स्पर्धांमधील खेळाडू अथवा स्पर्धक हे नक्कीच भविष्यात आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा लौकिक वाढवतील, असा विश्वास महोत्सवाचे मुख्य आयोजक आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केला.
