बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय लष्कराच्या मुंबईतल्या मुख्यालयांतर्गत (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभाग) १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाकडून आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह येथे किलाचंद चौक (हॉटेल मरीन प्लाझासमोर) येथे सामरिक धून (मार्शल ट्यून) वादन होणार आहे.
भारतीय लष्कराच्या शिस्त आणि शौर्यासोबतच लष्करी वाद्यवृंदाची ओळख नागरिकांना व्हावी. लष्करी वाद्यसंगीताची अनुभूती नागरिकांना घेता यावी, या उद्देशाने भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाइप बँड पथकाकडून सामरिक धून वादनाचे कार्यक्रम मुंबई महानगरात विविध ठिकाणी आयोजित केले जात आहेत. यापूर्वी पालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) आणि स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे पाइप बँड पथकाने सामरिक धून सादर केली होती. त्यास मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
नागरिकांकडून मिळणारा हा प्रतिसाद पाहून आज सायंकाळी ६.०० ते ८.०० वाजेदरम्यान किलाचंद चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लष्करी वाद्यवृंदाच्या सादरीकरणाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
लष्करी पाइप बँडची देदिप्यमान परंपरा
भारतीय लष्कराच्या १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाची स्थापना १५ जुलै १९८७ रोजी मेघालयाची राजधानी शिलाँग येथे झाली. हा पाइप बँड उत्कृष्टता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. यापूर्वी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत मिळून या बँडने विविध ठिकाणी सादरीकरण केले आहे. त्यामध्ये मुंबईतील राजभवन, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), षण्मुखानंद सभागृह, महालक्ष्मी रेसकोर्स आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईकरांनाही या बँडच्या सादरीकरणाची अनुभूती घेता यावी, यासाठी यंदा प्रथमच भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरात विविध ठिकाणी सादरीकरण केले जात आहे. सुमारे २० सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाद्वारे गौरवशाली आणि सुमधुर रचना सादर केल्या जातात. यात प्रामुख्याने पाइप आणि ड्रम या दोन वाद्यांचा समावेश असतो.