मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना अभय दातार तबल्याची आणि अनंत जोशी संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

कल्याणी साळुंके, या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे घेतलं. त्यानंतर पं. वसंतराव कुळकर्णी व डॅा. अशोक रानडे यांच्याकडे तालीम घेतली. डॅा. अरूण द्रविड यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. त्या शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. आकाशवाणीच्या त्या अ दर्जाच्या कलाकार आहेत. डॅा. अशोक रानडे यांच्याकडून त्यांनी ‘आवाज जोपासना शास्त्राचे’ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन घेतले आहे. त्या स्वतःही याचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करत असतात. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार तसेच अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.