राजकारणात तुम्हाला वारंवार तुमची उपयुक्तता सिद्ध करावी लागते. ज्यावेळी तुमची उपयुक्तता संपते त्यावेळी तुम्हाला संपवण्यासाठी तुमचे विरोधक आणि मित्र म्हणून वागवणारे तुम्हाला संपवतात. उपयुक्तता संपली की उपद्रवमूल्य, हे हत्यार बाहेर काढावे लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गत अशीच झाली आहे. एकवेळ त्यांना डोक्यावर घेणारे भाजपवाले आता त्यांची शक्ती क्षीण करण्याच्या मागे लागले आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांनीही आपले उपद्रवमूल्य काढले तरच भाजपवाले शिस्तीत त्यांचा स्वीकार करतील. नगरपरिषद निवडणुकीत बदलापूर आणि अंबरनाथमध्ये काय घडले हे सर्वश्रुत आहे. परंतु एकनाथ शिंदे मात्र बधले नाहीत. त्यांनीही भाजपला जशास तसे उत्तर दिले. त्यामुळेच भाजपला ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करावी लागली. अन्यथा भाजपला या दोन्ही महानगरपालिकांमध्ये स्वतंत्रपणे लढून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धडा शिकवायचा होता. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्वतंत्रपणे लढून बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने भाजपने शिवसेनेशी युती केली. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेत वन मंत्री गणेश नाईक यांनी स्वतंत्रपणे लढून भाजप सत्तेवर येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिल्याने तेथे शिवसेनेला एकटे सोडण्यात आले. गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळला आणि स्वबळावर नवी मुंबईत बहुमत मिळवले.

मुंबई महानगरपालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकसंघ शिवसेनेशी युती न करता 82 जागा मिळवल्या होत्या. यावेळी शिवसेना सोबत असतानासुद्धा त्यांचा घोडा 89वरच अडकला. शिवसेनेने 90 जागा लढवून फक्त 29 जागी विजय मिळवला. आमची शिवसेना खरी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिवसेना आमची, असा दावा शिंदे नेहमी करतात. त्याचबरोबर निवडणूक आयोगानेही शिंदे यांचा पक्ष मूळ शिवसेना असे गृहीत धरून त्यांना धनुष्यबाण, ही निशाणीही बहाल केली. तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेत त्यांचा घोडा 29 जागांवर अडकला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांची मजल 71 जागांपर्यंत गेली. परंतु एआयएमआयएम, या पक्षाला मनसेपेक्षा दोन जागा जास्त म्हणजे आठ जागा मिळाल्या. एआयएमआयएम या पक्षाची महाराष्ट्रात गेल्या लोकसभेपासून ताकद घटत चालली होती. परंतु मुंबईव्यतिरिक्त छ. संभाजीनगरमध्ये त्यांनी 33 जागांपर्यंत मजल मारली आहे. मालेगाव, भिवंडीमध्ये समाजवादी पार्टीपेक्षा एआयएमआयएम या ओवेसी बंधूंच्या पक्षाला मुस्लिम बांधवांनी पसंती दिली.

उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांचा व्यवस्थित वापर केला. मात्र शिंदे यांना पक्ष, निशाणी, सत्ता सर्व काही देऊनही ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवू शकलेले नाहीत, हे भाजपच्या सहा महिन्यांपूर्वीच लक्षात आले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजीपार्क येथील राष्ट्रीय स्मारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात दिले. खरी शिवसेना शिंदे यांची आहे असा दावा मुख्यमंत्री फडणवीस नेहमी करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कुणा एका कुटुंबाचे नव्हते तर उभ्या महाराष्ट्राचे दैवत होते. त्यामुळे त्यांचे स्मारक एकतर राज्य सरकारने स्वतःच्या ताब्यात ठेवून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा अध्यक्ष या स्मारकाचा असायला हवा होता. परंतु सत्तेत असूनही ठाकरेंच्या मर्जीतले तिघेजण अर्थात उद्धव ठाकरे अध्यक्ष, या स्मारकाचे सचिव शिवसेना (उबाठा) नेते सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे या समितीवर आहेत. फक्त औपचारिकता म्हणून शिवसेनेचे शिशीर शिंदे यांना या स्मारकावर घेतले आहे. याचा अर्थ खरी शिवसेना कुणाची हे भाजपनेच न बोलता कबूल केले आहे.

मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेने महापौरपदासाठी बिनशर्त पाठिंबा द्यावा ही अपेक्षा ठेवली आहे. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना भाजपचे निवडक नगरसेवक असताना त्यांनी कधी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता. उपमहापौरपद आणि वैधानिक समित्यांपैकी सुधार समिती आणि बेस्ट समिती या समित्या घेतल्या होत्या. त्याचबरोबर स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती आणि शिक्षण समिती या चारही वैधानिक समित्यांवर सदस्यपदे मिळवली होती. मात्र शिवसेनेने स्थायी समितीची मागणी केल्याने आता घोडे अडले आहे. अजूनही उद्धव यांची शिवसेना भाजपला आपला मुख्य शत्रू मानत नाही. त्यांचा मुख्य शत्रू अजूनही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने उद्धव यांची शिवसेना आयत्यावेळी कोणताही निर्णय घेऊ शकते. त्यामुळेच दररोज शिवसेना नेते खासदार संजय राऊत महापौरपदाबाबत वेगवेगळी वक्तव्यं करत आहेत. शिंदे यांची शिवसेना ही भाजपची नैसर्गिक भागी दार असल्यामुळे ते फक्त दबावाचे राजकारण करत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली येथेही त्यांना महापौरपदाबाबत अडचणी येऊ नयेत म्हणूनच हे दबावाचे राजकारण सुरू आहे. शिंदे यांनी मुंबईतल्या आपल्या सर्व नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये यासाठी ठेवले होते की त्यांना नगरसेवक फुटण्याची भीती विरोधकांकडून नव्हे तर भाजपकडून होती. फोडाफोडीच्या राजकारणात पारंगत असलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपची चाल माहीत असल्यामुळेच त्यांनी तीन दिवस आपल्या नगरसेवकांसाठी पंचतारांकित पाहुणचार केला. भाजपकडून ग्वाही मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या नगरसेवकांना घरी जाण्याची परवानगी दिली. महापौरपदासाठी आरक्षणही जाहीर झाले. मात्र, भाजप व शिवसेनेपैकी कोणीही अजून त्यांच्या गटाची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र वा एकत्रित नोंदणी केली नाही. याचा अर्थ रस्सीखेच अजूनही सुरूच आहे!
(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार तसेच राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

