Homeब्लॅक अँड व्हाईटद्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा...

द्वारकानाथ संझगिरीः स्वतःचा हुकमी चाहतावर्ग असलेला चतुरस्र लेखक!

पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे. त्यांना ते पटकन कसे सुचते आणि ते अनेक उपमा, अलंकार, अनेक जुने-नवे संदर्भ देत देत लेख कसा खुलवतात याचे विशेष कौतुक वाटे. एकदा का संझगिरींच्या लेखावर नजर पडली की शेवटच्या ओळीपर्यंत आपण त्यांच्या लेखनाशी जोडले जाणारच. तीच त्यांची खासियत स्टेजवरुन कार्यक्रम सादर करण्यात, मुलाखती घेण्यात असे. उपग्रह वाहिनीवर एकाद्या चर्चेत सहभागी होण्यातही त्यांची तीच सहजता पाहयला मिळे. एबीपी माझा, या वृत्तवाहिनीवर “शोले”वरील चर्चेत एकदा आम्ही दोघे होतो. आणखीनही एकदोनदा तसा योग आला. अश्विन बापटने एबीपी माझा वृत्तवाहिनीवर काही वर्षं रविवारी सादर केलेल्या चित्रपट गीत-संगीताच्या “फ्लॅशबॅक”मध्ये आम्ही दोघेही अधूनमधून चित्रपट गाण्यांच्या आठवणी सांगत असू.

समाजातील तळागाळापर्यंत वेड असलेल्या अशा कसोटी ते आयपीएल क्रिकेट व सिंगल स्क्रीन थिएटर्स ते ओटीटीवरील चित्रपट, या हुकमी दोन विषयांवर लिहिणे जितके सोपे वाटते, तितकेच ते अवघड. कारण अनेक क्रिकेटप्रेमी व चित्रपट रसिकांचे याबाबतचे ज्ञान पक्के असते आणि अशावेळी महत्त्वाची गोष्ट असते ती ओघवती शैली. ती शिरीष कणेकर यांजकडे होती. त्यानंतर व्दारकानाथ संझगिरी यांजकडे होती. देश-विदेशात स्वतःचा हुकमी चाहता वाचक व प्रेक्षकवर्ग निर्माण होणे वा करणे हे सोपे नाही. त्यासाठी वेळेची पर्वा न करता केवढे तरी सातत्य कायम ठेवावे लागते. संझगिरी यांच्यात ती क्षमता होती. ते मोबाईलवरुनही अख्खा लेख बोलता बोलता गप्पांच्या ओघात सांगत. अशी व इतकी मास्टरी त्यांनी मिळवली होती.

संझगिरीबाबत माझ्या काही खास आठवणी आहेत.

एक म्हणजे देव आनंदच्या निधनाच्या (३ डिसेंबर २०११) दुसर्‍याच दिवशी लोकसत्तेत आलेला माझा मोठा विशेष लेख वाचून संझगिरी यांचा मला फोन आला. राजू भारतन, अमिन सयानी आणि त्यांच्यासोबत तू अशा तिघांसोबत देव आनंदवर गप्पा असा यशवंत नाट्यगृहात एक विशेष कार्यक्रम आयोजित करतोय, तुम्हा तिघांना मी बोलते करणार आहे. माझ्यासाठी हा अतिशय सुखद धक्का व मोठीच संधी होती. पाली हिलवरील झिकझॅक रोडवरील आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओतील प्रशस्त कार्यालयात मी देव आनंदची रविवार नवशक्तीसाठी सविस्तर मुलाखत घेतली होती. त्या आठवणी मी सांगाव्यात आणि जाॅनी मेरा नामनंतरचा देव आनंद, असा माझा फोकस असावा असे संझगिरींचे म्हणणे होते. तरी माझ्यावर राजू भारतन यांच्या स्टेजवरील उपस्थितीचा विलक्षण दबाव होता. दुसर्‍याच दिवशी सकाळीच सझगिरींचा फोन. ते म्हणाले, तू फार चांगलं बोललास. मला तुझे थोडे टेन्शन होते. लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्समधील या कार्यक्रमाची जाहिरात वाचून चित्रपटावर लिहिणाऱ्या एकादोघांचा मला फोन आला. दिलीपला नीट बोलता येत नाही. त्याला कशाला घेतले? पण अशा गोष्टींकडे तू फारसे लक्ष देवू नकोस. सझगिंरीचा मी मानलेला सल्ला मला बराच मानवला आणि मग बोलतच सुटलोय.

द्वारकानाथ

तशीच एक चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. असाच एकदा संझगिरी यांचा फोन आला. लंडनमध्ये राहणारे लेखक मिहीर बोस हे पन्नास वर्षांतील हिंदी चित्रपट यावर इंग्रजीत एक अनेक संदर्भ, माहिती, तपशील यासह भलेमोठे पुस्तक लिहीत आहेत. त्यांना मुंबईतून माहिती मेल करणारा चित्रपटप्रेमी वा पत्रकार हवा. अश्विन बापटने तुझे नाव मला सुचवलेय. मलाही वाटते तू हे कर. चांगले मानधन मिळेल. यावर मी नाही म्हणणे शक्यच नव्हते. आठवड्यातून तीन-चारदा मजकूर पाठवायचा होता. मिहीर बोस यांच्याशी व्हाॅटस अप काॅलवर बोलून कामाला सुरुवात केली आणि काही महिन्यांतच कोरोना आला. मात्र हे काम सुरु असले तरी अन्य कामे थांबली होती. पैशाची गरज होतीच. अशातच या पुस्तकाचे काम पूर्ण झाल्याचे मी संझगिरी यांना कळवताच त्यांनी मिहीर बोस यांच्याशी संपर्क साधून मला मानधन मिळवून दिले.

व्दारकानाथ संझगिरी यांच्याबद्दल बरेच काही सांगता, बोलता येईल. लाॅकडाऊन काळातही ते गप्प बसून राहिले नाहीत. त्यांनी फेसबुक ऑनलाईन शो सुरु केले. अलिकडच्या आजारपणातही ते झपाटल्यासारखे लिहीत. मनसोक्त मनमुराद आनंद व आस्वाद घेत घेत लिहिणे आणि त्यात इतरांनाही म्हणजेच वाचक व प्रेक्षकवर्गाला सामावून घेणे ही त्यांची खासियत. गतवर्षीच सचिन तेंडुलकरवर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. प्रकाशन सोहळ्यात काही चित्रपट कलाकारांचे सचिन तेंडुलकरविषयी काही व्हिडिओज दाखवावेत असे त्यांना मनोमन वाटत होते. आपण त्यात काही सहकार्य करावे म्हणून काही सेलिब्रिटीजना मी तसा मेसेज केला. त्यावर हो अथवा नाही असे कोणीही कळवले नाही हे संझगिरी यांना सांगताना मला कससंच वाटले. पण आपण वस्तुस्थिती सांगणे योग्य वाटले. तेवढे तेही व्यावसायिक वृत्तीचे होते.

शिरीष कणेकर, व्दारकानाथ संझगिरी यांनी कलेच्या क्षेत्रात विविध माध्यमातून इतके व असे अफाट काम केले आहे की त्यांच्या पंचवीस टक्के जरी काम जमले तरी ते फार म्हणता येईल असे मला तरी वाटतंय…

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

शाहरुखचा डीडीएलजेः सिंगल स्क्रीन ते ओटीटी.. आणि समीक्षक ते ट्रोल!

"तुम्ही दोन नोव्हेंबरला या. त्यादिवशी दरवर्षी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगेला (डीडीएलजे) जवळपास हाऊसफुल्ल गर्दी असते. शाहरुख खानचा वाढदिवस असतो ना.. त्या दिवशी... दक्षिणमध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहाचा डोअरकिपर मला अतिशय उत्साहाने सांगत होता. डीडीएलजे २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित...

‘मंदिर’ हा काही सिंगल स्क्रीन थिएटरचा अनमोल ठेवा!

सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगात वाढलेल्या माझ्या पिढीला आज मुंबईतील जुन्या काळातील चित्रपटगृहे आठवणीचा भाग झाली आहेत. अगदी चित्रपटाच्या प्रमाणपत्रावर अठरा रिळ असे वाचले तरी थिएटरच्या अंधारात हमखास टाळी व शिट्टी पडणारच. नेहमीच्या तिकीटात जास्त मोठा चित्रपट पाहयला मिळणार अशी...

९२ वर्षांचे झाले कुलाब्याचे रिगल!

अलिकडे वारंवार रिगल चित्रपटगृहात जायची संधी मिळतेय. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांच्यावरील माहितीपटाच्या निमित्ताने रिगलला रमेश सिप्पी दिग्दर्शित "शोले" (१९७५)च्या खास खेळाचा अनुभव एकदम भन्नाट. रिगलवर लवकरच पोहोचलो तेव्हा बाहेरची लांबलचक रांग पाहून जुने दिवस आठवले. मी माझ्या...
Skip to content