सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर पकडू लागलीय. राज्य सरकारदेखील त्या दृष्टीने सकारात्मक असून लवकरच सर्वांसाठी लोकल वाहतूक खुली होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. वास्तविक कोरोना संसर्गाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नसला तरी लोकांच्या मनातील या विषाणूची भीती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास ९५ टक्के व कमी मृत्यूदर ही कारणे याला आहेत. या पार्श्वभूमीवर लोक स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत असले तरी संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन आगामी काळात करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबईतील दाट लोकवस्ती व प्रवासासाठी सर्वाधिक वापरली जाणारी लोकलसेवा आज गर्दीची सर्वात मोठी ठिकाणे आहेत. व्यवसाय, रोजगार, उद्योगधंदे सुरू झाल्यामुळे, मात्र लोकल बंद असल्यामुळे लोक मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करताना दिसत आहेत. यात सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत असून अनावश्यक वेळदेखील खर्ची पडत आहे. तसेच रस्तेवाहतुकीवरील ताणदेखील गेल्या काही दिवसांपासून वाढलेला दिसत असून सर्वत्र मुंबईत येण्याजाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत स्वस्त व जलद प्रवाशी वाहतूक म्हणून समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होणे अत्यंत आवश्यकच आहे. मात्र सर्वांसाठी लोकल सुरू झाल्यावर पुन्हा एकदा अफाट गर्दी रेल्वेस्थानके व लोकलमध्ये दाखल होणार आहे व या गर्दीत सोशल डिस्टन्स अबाधित राखणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाच्या सकाळ व सायंकाळच्या कामावर जाण्या येण्याच्या वेळेत पूर्वीसारखी गर्दी झाली तर सरकारच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तीन तेरा वाजणार हेदेखील नक्की आहे.
यासाठी अगोदर मुंबईतील सरकारी, बँका व खाजगी आस्थापनांच्या कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा पर्याय पडताळून पाहावा जेणेकरून ठराविक वेळेत लोकलमध्ये होणारी गर्दी विभागली जाईल. वास्तविक या बाबीचा अभ्यास लॉकडाऊन काळात करून एव्हाना कार्यालयांचे वेळापत्रक बदलणे सहज शक्य होते. मात्र दुर्दैवाने त्यादृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे आता लोकल सुरू केली तर परिस्थिती पूर्वीप्रमाणे “जैसे थे” असणार आहे व संसर्गाला रोखण्यासाठी ती परवडणारी नसेल. तसेच सरकारने गेल्या आठ-नऊ महिन्यांत संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरेल व ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’सारखी गत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी लोकलसेवा सर्व घटकांसाठी सुरू करणे परवडणारे नाही. कदाचित यामुळेच लोकल सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्यसरकार अद्यापि घेऊ शकलेले नाही व ती भूमिका रास्तच आहे.
मात्र, चाकरमान्यांची कामावर येण्याजाण्याची वेळ सोडून इतर वेळेत सर्वांसाठी लोकल सुरू करण्यास हरकत नाही. या नियमाचे पालन कटाक्षाने होण्यासाठी सबळ व सक्षम यंत्रणा उपलब्ध असायला हवी. नाहीतर त्याचाही काही उपयोग होणार नाही. सबब, सध्यातरी लोकल सर्वसामान्य लोकांसाठी सुरू करताना संभाव्य गर्दीची शक्यता पडताळूनच सरकारने निर्णय घ्यावा असे वाटते. अन्यथा त्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईस्तोवर थांबावे.
Tumcha pot bharlela distant.
Wonderful write-up, Ive bookmarked this site so hopefully Ill discover more on this topic in the future!