ज्ञानाई फाऊंडेशनच्या वतीने जागतिक मैत्री दिनानिमित्त काव्य मैफिलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यातील नरके पॅलेसमधील ज्ञानाई फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या काव्य मैफिलीच्या अध्यक्षस्थानी कवयित्री वसुधा नाईक, प्रमुख पाहुणे म्हणून कवी समाधान लोणकर, योगेश हरणे, शाम लाटकर इत्यादी मान्यवर हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले. काव्य मैफिलीची सुरूवात ज्येष्ठ ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी आषाढाचा पाऊस मनामनाची पुरवितो हौस अन् मैत्री कशी जपावी ही रचना सादर केली. पोलिस अधिकारी समाधान लोणकर म्हणाले की, ‘संघर्षाच्या या वाटेवरती, सुखं माझे ओलीस आहे, हळव्या मनाचा कवी मी, पण पेशाने पोलीस आहे’. त्यांच्या ह्या ओळींचे सभागृहातील प्रत्येकाने टाळ्या वाजवून स्वागत केले.
जिंदादिल कवी योगेश हरणे यांनी क्षितीजाच्या पलिकडे ही आपली रचना अप्रतिम सादर केली. शाम लाटकर यांनी जगावे पावसासारखे होऊ नको रे पारखे ही रचना सादर केली. गीतकार जनाबापू पुणेकर यांनी, ‘दोन्ही घरचा लाविते दिवा, आई, बाबा मला वाचवा’ मुलगी वाचवा हा संदेश देणारी रचना सादर करताच रसिकांची मनं गहिवरून आली. छगन वाघचौरे यांनी प्रेमगीत सादर केले. अमित भांडे यांची खान्देशी मायबोलीची रचना मनामनाचा वेध घेणारी ठरली.
लोककवी सीताराम नरके यांनी तुझ्यासाठी.. ही रचना सादर करताच शिट्ट्या-टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याप्रसंगी दिनेश गायकवाड, पांडुरंग म्हस्के, सुवर्णा वाघमारे, सुमित हजारे, दिनेश कांबळे, देवेंद्र गावंडे, प्रतिभा किर्तीकिर्वे, आनंदा भारमल, बाळासाहेब गिरी, काशीनाथ गवळी, दिप्ती नेहर अशा तीस कवींनी रचना सादर केल्या.
अध्यक्षीय भाषणात वसुधा नाईक म्हणाल्या की, मैत्रीभाव जपले पाहिजेत. आपुलकीचा ठेवा जतन करत माणुसकी जिव्हाळा असला तरच मैत्री जिवंत ठेवता येईल. मैत्री दिनाच्या शुभेच्छा सार्थक होतील. मैत्री दिन वृद्धींगत होईल. या काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार, दमदार आवाजात शीघ्र शैलीत चारोळ्या, चुटकुले, शेरोशायरी, विनोद पेरत रंगतदार काव्य मैफिल सजविली. आभारप्रदर्शन करताना मच्छिंद्र नरके म्हणाले की, आभाराचे भार कशाला, तुमच्या आमच्या घराला दार कशाला.. मी अन् ज्ञानाई फाऊंडेशन आपल्या ऋणानुबंधात राहू इच्छितो. त्यानंतर मैत्री दिनाच्या काव्य मैफिलीची सांगता करण्यात आली.