अनेक वेगवेगळ्या पुराणकथा आणि धारणा असल्या तरी दिवाळी अथवा दीपावली हा मूळ शेती-संस्कृतीशी संबंधित सण आहे. हा धान्य-लक्ष्मीचा सण आहे, तीच पर्यायाने धनलक्ष्मीही असते. हा तिच्या स्वागताचा उत्सव आहे. महाराष्ट्रासारख्या मूळ मातृप्रधान संस्कृतीने प्रभावित प्रदेशात दिवाळी उत्सवाचे हेच स्वरूप सुस्पष्ट होते. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वापलीकडे, दिवाळीचा भारतातील शेती आणि कापणीच्या हंगामाशी दृढ संबंध आहे. आपण दिवाळी आणि शेती यांच्यातील घनिष्ठ संबंध जाणून घेऊया.
या काळात सर्वत्र सुगीचे दिवस सुरू झालेले असतात. नव्या धान्याचा दरवळ घर-दारे, शेत-शिवारांत दरवळत असतो. शेतकरीही मनातून आनंदून गेलेला असतो. अशावेळी तो आनंद व्यक्त करण्याच्या उद्देशाने कृती करतो. ज्याने आपल्याला झोळी भरभरून दिली, त्या या जगातील अज्ञात सर्वश्रेष्ठ शक्तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानेच ही दीपोत्सवाची रचना केली गेली असावी, असे मानले जाते. दिवाळी साजरी करण्याचा काळ आणि तिच्याशी संबंधित प्रथा-परंपरा यांचा अभ्यास केल्यानंतर अनेक अभ्यासक हेच सत्य पुढे येत असल्याचे सांगतात.
मान्सूननंतरच्या कापणीचा हंगाम
हिंदू दिनदर्शिकेनुसार, दिवाळी सामान्यतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. ही वेळ महत्त्वाची आहे. ती मान्सूननंतरच्या कापणीच्या हंगामाशी पूर्णपणे जुळते. हा सण कृषी समुदायांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि उत्सवाचा काळ असतो. या काळात शेतकरी त्यांच्या मेहनत अन् श्रमाचे फळ घेत असतात. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतात, बियाणे पेरतात, पिकांची काळजी घेतात आणि भरपूर उत्पादनाची आशा करतात. दिवाळी हा या अथक प्रयत्नांचा कळस असतो. कारण याच सणाच्या काळात, उन्हाळी लागवड केलेल्या तांदूळ, गहू, ऊस आणि डाळींसारख्या खरीप पिकांची कापणी केली जाते. ग्रामीण भारतातील अनेक कुटुंबांसाठी, हा फुरसतीचा, निवांत, फावला काळ असतो. प्रत्येकाकडे भरपूर वेळ असतो. धान्याची कोठारे हंगामातील उत्पादनांनी भरलेली असतात.

शेती आणि दिवाळी यांच्यातील संबंध
दिवे आणि सजावट: दिवाळीचा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे दिव्यांची रोषणाई आणि रंगबिरंगी रांगोळीसह अंगणाची सजावट. कृषीप्रधान समाजात, प्रकाशाचे खूप महत्त्व आहे, कारण ते अंधार दूर करून समृद्धी आणते. शेतकरी पिकांचे कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी आणि यशस्वी कापणी साजरी करण्यासाठी त्यांच्या शेतात दिवे लावतात.
फराळ: दिवाळी हा असा काळ आहे, जेव्हा कुटुंबे आणि समुदाय एकत्र येऊन फराळ आणि मिठाई यांची देव-घेव करतात. दिवाळीदरम्यान भरपूर विविधतेचे खाद्यपदार्थ कापणीच्या हंगामात येणाऱ्या कृषी समृद्धीचे थेट प्रतिबिंब आहे. अनेक पारंपरिक दिवाळी मिठाई या भात, गूळ आणि दूध यासारख्या घटकांपासून बनवल्या जातात, जे भारतीय शेती, पूरक व्यवसायाचे मुख्य उत्पादन आहे.
लक्ष्मी पूजा: धन आणि समृद्धीची देवता, देवी लक्ष्मीची पूजा ही दिवाळीची एक सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. देवी लक्ष्मी फक्त धनाची नव्हे तर धन-धान्याची देवता आहे. ती स्वच्छ, साफसूफ घरांना भेट देऊन त्यांना प्रकाशमान आणि समृद्ध करते, असे मानले जाते. शेतीच्या संदर्भात सांगायचे तर, देवी लक्ष्मीचे आशीर्वाद केवळ भौतिक संपत्तीसाठीच नव्हे, तर समृद्ध शेती हंगाम आणि समृद्ध पिकासाठी मागितले जातात.
गुरेढोरे आणि पशुधन: ग्रामीण भारतात, गुरेढोरे आणि इतर पशुधन शेतीसाठी आवश्यक आहेत. दिवाळी हा असा काळ आहे, जेव्हा या प्राण्यांना आंघोळ घातली जाते, रंगबिरंगी सजवले जाते आणि शेतकरी कुटुंबाचा भाग म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. कृषी प्रक्रियेत त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले जातात.

फटाके: पर्यावरणाच्या कारणास्तव दिवाळीचा हा वादग्रस्त पैलू झालेला असला तरी, त्यांचा शेतीशी ऐतिहासिक संबंध आहे. प्राचीन काळी, मोठा आवाज आणि तेजस्वी दिवे कीटकांना दूर करतात आणि पिकांचे संरक्षण करतात, असे मानले जात असे.
शेतीत टिकाव धरण्यात दिवाळीची भूमिका
अलीकडच्या वर्षांत, शाश्वत शेती पद्धतींच्या गरजेबद्दल जागरूकता वाढत आहे. दिवाळी हा सण शेती आणि पर्यावरण यांच्यातील सहजीवन संबंधांची आठवण करून देतो. लोक कापणीचा उत्सव साजरा करत असताना, शाश्वत शेतीपद्धती, जबाबदारपणे पाण्याचा नेमका वापर आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन यांचे महत्त्व मान्य करणे,अत्यंत महत्त्वाचे आहे.
भावी पिढ्यांना भरपूर पिकांचे आशीर्वाद
एकूणच, दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नाही तर शेती आणि कापणीच्या हंगामात रुजलेला सण आहे. हा असा काळ आहे, जेव्हा शेतकरी, त्यांचे कुटुंबे आणि ग्रामीण कृषी समुदाय भूमातेने दिलेल्या विपुलतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. दिवाळी साजरी करताना, आपण शाश्वत शेतीपद्धती आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वदेखील लक्षात ठेवूया, जेणेकरून भावी पिढ्यांना भरपूर पिकांचे आशीर्वाद मिळत राहतील.