महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक मॅडम, गुंड टोळ्यांची इन्स्टावरील ‘रिल्स’ बंद करण्यासाठी पोलीस पुढाकार कधी घेणार? की अजून कायदाच नाही? खरंतर पोलीस महासंचालक मॅडम रश्मी शुक्ला यांना प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. त्या काहींशा आजारी असून विश्रांती घेत असल्याचे समजले. पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ठाणे शहरात जाऊन पोलीस क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केले, म्हणूनच वरील प्रश्न विचारण्याचे धाडस मी करत आहे. पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याला गेल्या आठवड्यात अटक करून मोक्का कायदाही लावण्यात आला आहे. पोलिसांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे कौतुकच केले पाहिजे.
वास्तविक पाहता पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी याआधीच मारणेला गजाआड करणे गरजेचे होते. सुमारे दीड महिन्यापूर्वी गजा मारणेला पूर्वीच्या गुन्ह्यांत सुटका झाल्यानंतर शोभायात्रा काढण्याप्रकरणी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इंस्टाग्रामवर रिल्सची एकच गर्दी केली गेली होती. ‘यात एकच दादा, गजा दादा..’ अशा घोषणा देऊन मारणे फॅन्स एकच कल्ला करत होते. पॉश गाड्यांचा ताफा काय दिसत होता, अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन्स, शर्टाची तीनचार उघड्या बटणांमधून डोकावत होत्या. अनेक तरुणमंडळी या रिल्समध्ये दिसत होती. पूर्वीचे जाऊ द्या, आता तर गजा अटकेत आहे. मग कालपासून त्याला फेटा बांधत असतानाचे रिल्स इंस्टावर टकण्याचे धाडस या गुण्ड टोळीकडे कसे आले हो, आयुक्त महोदय! मोक्का लावला तरी गजाचे पंटर बाहेर सांगतात की, अरे भाई का फुल्ल सेटिंग है.. थोडेही दिनोंमे राजा बाहर आयेगा! देखना तुम! काय जबर आत्मविश्वास! मुख्यमंत्री महोदय हा जबरी आत्मविश्वास त्यांच्यात आला आहे त्याला कारण तुमच्या उजव्या व डाव्या बाजूस बसणाऱ्या काही मंत्र्यांचे गजाच्या डोक्यावर हात आहेत. मी पूर्ण जबाबदारीनीशी लिहीत आहे की काहींचे युवराज तर काहींचे खास नातेवाईक गजाच्या दरबारात कुर्निंसात करण्यासाठी हजर असतात. (यात नवीन असे काही नाही. कारण मुंबईतही दगडी चाळ, २४ टेनामेंट, पाकमोडिया स्ट्रीट, चेंबूरचे टिळक नगर, मस्का चाल, अँटॉप हिल, ठाण्यातील किसन नगर, कोपरी आदी भागात सर्वपक्षीय नेते जनता झोपलेली असताना जात असते?) मुख्यमंत्री साहेब माझ्यापेक्षा आपली विशेष शाखा आपल्याला अधिक अपडेट देऊ शकेल.

गजा मारणेचे जसे रिल्स येत आहेत अगदी त्याच धर्तीवर मस्साजोगच्या सरपंच हत्त्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडचेही रिल्स तो सध्या पोलीस कोठडीत असतानाही सुखनैव इंस्टावर झळकत आहेत. दादाचे काही होणार नाही, आणि विविध गाणी.. एक गाणे तर ‘आम्हाला कळलंय साक्षीदार निघालाय..’ हे तर उघडउघड आक्षेपार्ह दिसत आहे. सुरेश धसअण्णाचे नगारे बजावणे व नाचगाणे चालूच आहे. या रिल्सबाबत धक्कादायक माहिती हाती आली आहे. कुठल्यातरी नवोदित जाहिरात कंपनी वा एजन्सीला हाताशी धरायचे. पंटर लोक सांगतील तसा कंटेन्ट लिहायचा त्यात एक उडत्या चालीचे गाणे वा धून टाकायची. नंतर या रिल्सला हजारो लाखो लाईकस आणायचे. आणि एकदा का हजारो / लाखो लाईक्स आले की भाई किंवा आकाचे मीटर चालू आणि पैसे काही यायचे बंदच होत नाही. अशा या रिल्सचा धंदा सूरू आहे. नियम वगैरे काहीच माहित नसल्याने युवक त्याला बळी पडत आहेत.
यामध्ये महिलाही मागे नाहीत. लेडी डॉन आता नवीन राहिलेले नाही. कुणी दीपाली आहे.. ती तर खुलेआम सांगत आहे की ‘तुम्हारे पास तुम्हारा पैसा होगा, मगर मेरे पास मेरी जबान है..’ माझ्या शब्दावर कामे होतात, अशा गुर्मीत ती बोलत असते. कुर्ल्याच्या चिलट नदीमचेही रिल्स अजून कमी झालेले नाहीत. इंस्टासरील पोस्टबद्दल तरी मुंबई पोलीस वा राज्य पोलिसांचा सायबर विभाग कामाला लागेल असे वाटले हॊते. काही हालचाली जरूर झाल्या. परंतु त्या पुरेशा नाहीत. खरंतर असे रिल्स बनवणाऱ्या व्यक्ती वा एजन्सीना बोलावून समज दिली गेली पाहिजे. कायदा कमकुवत असेल तर त्यात जरूर ते बदल केले जावेत असं वाटतं. समाजात एक वर्ग नेहमीच राहिलेला आहे, ज्याला वाटते की “crime to many is not crime, but simply a way of life. If laws are inconvenient ignore them, they do not apply to you”. ही चुकीची धारणा होण्यास आपली न्यायव्यवस्था व सरकारी यंत्रणाही जबाबदार आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागतंय.