शेवटचा मराठी महिना फाल्गुन. आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी (होली). होळीच्या आठ दिवस अगोदर होलाष्टक सुरू होतं. ते सुरू होताना बाजारात पिचकाऱ्या, फुगे, गुलाल, रंग, बत्ताशांच्या, साखरेच्या गाठ्यांच्या, कुरमुऱ्यांच्या माळांचे स्टॉल्स दिसू लागले की होळीची चाहूल लागायची. होळीमध्ये लहान मुलांच्या गळ्यात साखरेच्या गाठ्यांच्या, बत्ताशांच्या, कुरमुऱ्यांच्या, बिस्किटांच्या माळा घालण्याची पद्धत होती.
हिरण्यकश्यपूची बहीण “होलिका” ही विष्णूभक्त प्रल्हादाची आत्या. तिला मिळालेल्या वराचा तिने दुरुपयोग केला म्हणून अग्नीने तिचं दहन केलं. आणि तिच्या मांडीवर बसलेल्या प्रल्हादाचा जीव वाचवला अशी पौराणिक कथा आहे. दुष्ट प्रवृत्ती, वाईट आणि अमंगल विचारांचा नाश करून चांगली वृत्ती व चांगले विचार बाणावेत हा या सणामागचा उद्देश.
शाळा सुटल्यावर संध्याकाळी मुलं एकमेकांच्या अंगावर फाउंटन पेनमधली शाई उडवू लागले, की समजायचं की आज होळी आहे. घरी आल्यावर पाठीवरचे शाईचे डाग बघून भावंडंपण होळीच्या मूडमध्ये यायची. “लहानपणची होळी” अनेक गोष्टींकरीता कायमची लक्षात राहिली. गल्लोगल्ली पेटणाऱ्या होळीबरोबर येणारी “होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या xxxxx बंदुकीची गोळी” ही आरोळी आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला केलेली अभूतपूर्व दंगामस्ती कधीच विसरता येणार नाही. शाळेतून घरी आल्या आल्या आम्हा मुलांना होळी पेटवायचे वेध लागायचे. प्रत्येक इमारतीतली मुलं आपल्या इमारतीच्या खाली एक खड्डा खणायची.आम्ही मुलं मग लाकडं कुठे मिळतात हे शोधायला बाहेर पडायचो. लोकांनी गॅलरीत ठेवलेलं आणि नको असलेलं लाकडी सामान हे आमचं पहिलं “लक्ष्य” असायचं. लाकडी वस्तू उचलायचं आणि घरमालकाला एक प्रश्न विचारायचा, ज्याचं उत्तर आम्हाला नकारार्थी अपेक्षित असायचं. “काका हे पाहिजे का? त्यांनी “हो’ ” किंवा “नाही’ म्हणायच्या आतच आम्ही लगेच विचारायचो.. “नको ना? होळीत घालू?” अनेकवेळा उत्तर होकारार्थी यायचं. मग आम्ही हात हलवत परत जायचो. पण काही मंडळी खिलाडू वृत्तीने “हो” म्हणायची आणि घरातून काही नको असलेल्या लाकडी वस्तू असतील तर त्याही आणून द्यायची. लहान मुलांचं “उत्साहवर्धन” हा त्या मागचा हेतू असायचा.
कधी कधी “नको असलेल्या लाकडी सामानाबरोबरच” आम्ही मुलं एखादं मालकाला हवं असलेलं, पण “पाय तुटलेलं लाकडी टेबल”ही लंपास करायचो. आणि बेमालूमपणे, अगदी गुपचूप होळीत टाकायचो. मालकाला आपलं गॅलरी ठेवलेलं “हवं असलेलं टेबल” किंवा स्टूल होळीत शहीद झालं आहे, हे दुसऱ्या दिवशी कळायचं. पण तोवर वेळ निघून गेलेली असायची. आणि मालकाच्या हाती मुलांच्या नावाने बोटं मोडत बसण्यापलीकडे काहीही नसायचं. बहुतांशवेळा मालकाच्या मुलांनीच आम्हाला त्या टेबलाची “टीप” दिलेली असायची.

खाडीच्या किनाऱ्यावर जाऊन झाडाची छोटी खोडं, वाळलेल्या काटक्या जमा करणे हेही एक काम असायचं. मुंबईत विक्रोळीच्या कन्नमवार नगरच्या रस्त्यांच्या कडेला काही स्टॉल्स असायचे. त्या स्टॉल्सच्या आजूबाजूला काही नको असलेलं लाकडी सामान मिळतं का हे आमच्या भिरभिरत्या नजरा शोधायच्या. मोडलेला जुना पलंग, लाकडी टेबल- खुर्च्या, वाळलेले गवत, झाडाची खोडं, सुकलेल्या फांद्या, असं बरंचसं सामान जमलं, की आम्ही ते सगळं खड्ड्यात नीट रचून ठेवायचो आणि मोठ्यांच्या ताब्यात द्यायचो. हार, फुलं आणि दिव्यांनी “होलिका देवीची” आरती केली जायची. आणि मग होळी पेटवली जायची. सर्वजण पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालायचे. होळीत नारळ टाकले जायचे. गाऱ्हाणी घातली जायची. आरोळ्या ठोकल्या जायच्या. होळी पेटल्यावर मोठी माणसं काठ्या वापरून अर्धवट जळलेले नारळ बाहेर काढायचे. मग ते थोडे थंड झाल्यावर फोडले जायचे आणि त्यातलं खोबरं प्रसाद म्हणून वाटलं जायचं. त्यादिवशी गुलाल उधळला जात नसे. तर गुलालाचा टिळा प्रत्येकाच्या कपाळावर लावला जायचा आणि हलकेच दोन बोटं गुलाल गालावर फासला जायचा. थोड्या वेळाने मोठी माणसे निघून जायची. पण आम्ही मुलं होळी विझेपर्यंत तिथेच घुटमळायचो. होळीच्या जास्त जवळ जायचं नाही असे आदेश असतानासुद्धा धगधगत्या ज्वालांच्या जवळ जाऊन काय होतं हे बघण्यात एक वेगळीच मजा होती.
होळीच्या आगीचे लोळ आणि आसमंतात पसरलेल्या धुराने कॉलनी न्हाऊन निघायची. इमारतीच्या गच्चीवरून पाहिलं तर सगळीकडे आग लागली आहे की काय असं वाटायचं. दुसऱ्या दिवशी धुळवडीला कसा धिंगाणा घालायचा याचे मांडे मनात रचत आम्ही झोपी जायचो.
दुसऱ्या दिवशी, सकाळी उठल्यावर गॅलरीत येऊन “खाली कोण कोण आलं आहे ते बघायचो”. स्पीकरवर होळीची गाणी वाजायला लागली की खाली उतरायचो. “जखमी दिलो का बदला चुकाने आए है दिवाने दिवाने” (जखमी), “रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे” (सिलसिला), “होली के दिन दिल खील जाते है रंगो मे रंग मिल जाते है” (शोले), भर दे गुलाल मोहे, आई होली आई रे” (कामचोर) ही त्यावेळची “होळी स्पेशल” गाणी होती. त्यातल्या राजेश खन्नाच्या गाण्यातील “आज ना छोडेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली” या ओळीत “हिप्पा ही! हीप्पा ही! असे शब्द यायचे. ते आम्ही मुलं जोरजोरात म्हणायचो आणि नाचायचो.
टी.व्ही.वरच्या छायागीत/चित्रहार/चित्रगीत/शो टाईम या कार्यक्रमांमध्येसुद्धा ही गाणी दाखवली जायची. ही गाणी पाहताना आमच्या सर्वांच्या मनात येणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे “धुळवडीत रंगाने रंगून जायचं आहे, हे माहीत असूनसुद्धा सिनेमातले हिरो आणि हिरोइन्स रंगपंचमी खेळायला मळलेले-चुरगळलेले-जुने डागाळलेले कपडे घालून जाण्याऐवजी चक्क ठेवणीतले वाटणारे कडक इस्त्री केलेले आणि निरमा वॉशिंग पावडरने धुतल्यासारखे पांढरे शुभ्र शर्ट-पॅन्ट, साड्या, पंजाबी ड्रेस घालून कसे काय जातात?? कसं काय परवडतं यांना हे सगळं?? वर या सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या स्टाईलबाज पिचकाऱ्या कशा काय असतात? एकाच्याही हातात आमच्या नाक्यावर विकली जाणारी प्लास्टिकची छोटी पिचकारी कशी काय नाही? बरं! आम्ही होळी खेळल्यावर ओळखू येणे ही अशक्यप्राय गोष्ट असायची. आम्ही हिंस्र पशुंसारखे दिसायचो. रंगात माखलेले आम्ही घरी गेलो की आमच्या मिचमिचणाऱ्या डोळ्यांमधील भाव बघून आमच्या आया आम्हाला ओळखायच्या आणि आमच्या पाठीत रट्टा घालायच्या. आणि इथे बघावं तर हे सगळे हिरो हिरोइन्स रंगपंचमी खेळून झाल्यावरसुद्धा चांगले ओळखूही यायचे आणि यांच्या कपड्यांची घडीसुद्धा फारशी विस्कटलेली नसायची. यांची हेअर स्टाईलसुद्धा तश्शीच!

आम्ही खाली धुळवड खेळायला जाणार, नखशिखांत रंगून येणार हे माहीत असल्यामुळे आमची आई आधीच जुने कपडे शोधून ठेवायची. आम्ही हे चुरगळलेले, डागाळलेले, जुने कपडे घालून होळी धुळवड खेळायला जायचो. सकाळी नऊ-दहा वाजता घराबाहेर पडल्यावर दुपारी उशिरापर्यंत मनसोक्त होळी खेळायचो. रंगीत पाण्यांनी भरलेल्या पिचकाऱ्या, रंग, फुगे यांची रेलचेल असायची. आधी इमारतीच्या खालीच एकमेकांवर रंग उधळायचो. काहीजण फक्त गुलालाने होळी खेळायचे. पण काही महावीर चित्रविचित्र रंग आणायचे. त्यात चंदेरी आणि सोनेरी रंग मुलांमध्ये प्रिय होते. इमारतींमधून पाण्याने भरलेले फुगे टाकले जायचे. इमारतीखाली खेळून झाल्यावर आम्ही मुलं दोन्ही बाजूंना असलेल्या रस्त्यांवरून होळी खेळतखेळत इतर इमारतींमधल्या आणि शाळेतल्या मित्रांबरोबर भटकंती करायचो. मग मैदानांवर जाऊन तिथे साचलेल्या पाण्याच्या डबक्याकडे जाऊन “हर हर गंगे करायचो”.
शर्टावर मागच्या बाजूला हिरव्या रंगाचे हाताचे ठसे, पुढल्या बाजूला लालपिवळे ठसे, मानेला चॉकलेटी रंगाचे पट्टे, केसांमध्ये भरलेला गुलाल, नेमकी कोणत्या रंगाची आहे हे ओळखू न येणारी कॉलर, कानशिलावर सोनेरी-चंदेरी आणि इंद्रधनुषी रंग, सर्व प्रकारच्या रंगांच्या भाऊगर्दीमुळे ओळखू न येणारा चेहरा अशा अवतारात आम्ही “रंगपंचमी संपली” या दुःखासह घरी परतायचो. दोन-तीन तास वेगवेगळ्या रंगांमध्ये नखशिखांत बुडून गेल्यावर हळूच दबक्या पावलांनी घरी यायचो. वटारलेल्या डोळ्यांनी आई स्वागत करायची आणि बाथरूममध्ये पिटाळायची. मग स्वतः येऊन आम्हाला पाटावर बसवून घासूनपुसून आंघोळ घालायची. चांगली घसघशीत आंघोळ झाल्यावरसुद्धा आंघोळीनंतर आणि नंतर दोन-तीन दिवस अंगाला लागलेले रंग बरेचसे तसेच राहायचे. दुपारी उशिरा पुरणपोळी खाऊन पुन्हा गॅलरीत येऊन उभे राहायचो.
कधीकधी आमची होळी काकांकडे कांजूर मार्गला असायची. तिथे आमचे सख्खे शेजारी असलेले शालिग्राम मिश्रा हे गृहस्थ “होळीची भांग” बनवून ठेवायचे. आणि आम्हा मुलांना बदाम पिस्ते घालून बनवलेली थंडाई पाजायचे. थंडाईमध्ये थोडीशी भांग असायची. ती पिऊन काहीजणांना चढायची. काहीजण भांग पिऊन बराच वेळ हसत बसायचे. काहीजण भांग पिऊन बडबड करायचे. काहीजणांना भांग प्याल्यावर गाणी म्हणायची हुक्की यायची आणि ते तारस्वरात गाणी म्हणायचे. लहानपणी शाळेतल्या ज्या सवंगड्यांबरोबर होळी खेळलो, त्यातले काही सवंगडी आम्हा मित्र-मैत्रिणींची मैफिल अर्ध्यावर सोडून गेले. ते आज आमच्याबरोबर होळी खेळायला नाहीत. पण त्यांच्या आठवणी मात्र आहेत. हे मित्र या होळीला आमच्याबरोबर नसणार म्हणून या होळीत एकप्रकारची खिन्नता जाणवेल. त्यांच्या आठवणींनी व्याकूळ झालो की “सुनील दत्त”च्या “जखमी”मधल्या गाण्याची ओळ आठवते..
दिल मे होली जल रही है..
हमको छोडकर जानेवाले मेरे बचपन के दोस्तो..
तुम्हारे बचपन के यादों की बारात अभी भी..
हमारे दिल में चल रही है…
दिल मे होली जल रही है..