शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एकाचवेळी दिल्ली दौरे केले. उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तर एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली दौरा केला. उद्धव ठाकरे यांचा दौरा अजूनही आपण इंडिया आघाडीच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी होता तर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश देण्यासाठी होता.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भारतीय जनता पार्टीशी जवळीक वाढल्याचे राज्य विधिमंडळाच्या मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांना उद्धव ठाकरे यांच्या आमदारानी कसे लक्ष्य केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. विशेष म्हणजे ठाकरे सेनेच्या आमदारांनी भाजपावर नाममात्र टीका केली. त्यामुळे सावध ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यापूर्वी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन गुप्त भेट घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्यातर उद्धव ठाकरे भाजपाच्या बाबतीत बरेच सौम्य झाल्याचे लक्षात येत आहे.

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र आल्यानंतर इंडिया आघाडीची काय भूमिका असेल? याचा अंदाज घेण्यासाठी ठाकरे कुटुंबीय दिल्लीला गेले होते. आपण इंडिया आघाडीसोबत असल्याचे उद्धव ठाकरे दाखवत असले तरी उद्या राज ठाकरे आणि त्यांची युती झाल्यास ते इंडिया आघाडीतून बाहेर पडण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्यासोबत जाण्यास राज्यातील महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीला आक्षेप घेतल्यास ती गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. सध्या राज ठाकरे यांच्यासोबत महानगरपालिका निवडणुका लढवून पुढे भाजपासोबत जाण्याचा एक प्रवाह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना बाजूला केल्यास भविष्यात उद्धव ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात अशीही एक चर्चाही आहे. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या सेनेने जिल्हानिहाय सरकारविरोधात आंदोलने केली. या आंदोलनात फारशी आक्रमकता दिसली नाही. यापूर्वीची आंदोलने एव्हढी प्रखर असत की सरकारला धडकी भरत असे. परंतु ही आंदोलने नावाला होती हे या आंदोलनांवरून लक्षात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची अवस्था सध्या नाजूक आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांच्या मंत्र्यांविरोधात झालेले आरोप आणि परवाच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मोर्चात भाजपाऐवजी त्यांना केलेले टार्गेट पाहता हे कुणाच्या सांगण्यावरून चालले आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी त्यादरम्यान दोन वेळा दिल्लीला धाव घेतली. यापूर्वीही शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तरीही काही फारसा फरक पडलेला नाही. त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून त्रास सुरूच आहे. यावेळी त्यांनी सहकुटूंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचसोबत आपल्या खासदारांसोबत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. परंतु या भेटीतून फारसे काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

दिल्लीत जाऊन आल्यानंतरही महाराष्ट्रातल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. नाशिकचे पालकमंत्रीपद शिवसेनेचे दादा भुसे यांना तर रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना हवे आहे. परंतु 15 ऑगस्टच्या झेंडावंदनासाठी नाशिकला पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना तर रायगडच्या झेंडावंदनासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना संधी मिळाली. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवल्यानंतर एकनाथ शिंदे अस्वस्थ होते आणि आता 15 ऑगस्टला झेंडावंदनासाठी आपल्या दोन मंत्र्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. शिंदेंची ही अस्वस्थता आणखी किती वाढते हे पाहयचे!
संपर्कः 9820355612