Monday, February 3, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजदादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता...

दादरच्या फेरीवाल्यांमध्ये आता ‘आपलेतुपले’ सुरू!

मुंबईच्या दादर (प.) परिसरातील फेरीवाल्यांची गर्दी पाहतच मी मोठा झालो आणि आता म्हाताराही! येथील गर्दी काही हटत नाही. उलट ती दिवसागणिक वाढतच जात आहे. तशातही काही पोलीस व महापालिकेचे अधिकारी फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असतात हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. पण या कौतुकातही ‘आपले तुपले’ असल्याने केवळ नाईलाजाने आज हे लिहावे लागत आहे. सणवार मग तो हिंदूंचा असो की मुसलमानांचा की ख्रिस्ती बांधवांचा.. दादरला नेहमीच जत्रेचे स्वरूप येते हे काही नव्याने सांगायला नको. सध्या या संबंधात खटलाही उच्च न्यायालयासमोर आहे. यात सर्वच यंत्रणा मुंबई शहर फेरीवालामुक्त असावे असे एकमुखाने सांगत असल्या तरी प्रत्यक्षात जमिनी हकीकत वेगळीच आहे हे मुंबईकर जाणून आहेत.

दादरच नव्हे तर शहरातील तसेच दोन्ही उपनगरातील अनेक रेल्वेस्थानकांचे परिसर म्हणजे मोठे मार्केट परिसरच झालेले आहेत. दादर येथे जवळजवळ सर्वच बाजार असल्याने पश्चिमेला जरा प्रचंडच गर्दी असते हे मान्यच करावे लागेल. सर्वच सरकारी यंत्रणा आपापल्या मते फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत असतात हेही मान्य केले पाहिजे. परंतु त्यामानाने फेरीवाल्यांचा उपद्रव काहीसा कमी असलेला विभाग म्हणजे पोर्तुगीज चर्चचा परिसर. येथे काही खाऊगल्ल्या रात्रीच कार्यरत असतात. त्यांचा तसा कुणालाही त्रास नसतो, आता खाताना काही खवय्ये मोठ्याने बोलत असतील तेव्हडेच!

या आवाजाव्यतिरिक्त मोटारचे हॉर्न, बसेसचे कर्णकर्कक्ष ब्रेकचे आवाज, मधूनच एखाद्या रुग्णवाहिकेचा सायरन आदी अनेक आवाज पोर्तुगीज चर्च परिसरात होतच असतात. त्यात नवीन काहीच नाही. पण याच परिसरात म्हणजे उदय टेलर असलेली इमारत व जवळच असलेल्या कृष्णकुंज इमारतीतील एका माजी क्रिकेटपटूच्या दूरच्या नातेवाईकाला आवाजाचा वा फेरी धंद्याचा त्रास होतो म्हणून क्रिकेटपटूच्या नावाचा संदर्भ देत शिवाजीपार्क पोलीसठाण्यात तक्रार झाली तर त्या बिचाऱ्या टपरीवर कारवाई होणारच! बरे

त्यांनी गाडी न लावता खाण्याच्या ऑर्डरी पुऱ्या करायचे ठरवले तर कोपऱ्यावर ठेवलेल्या वस्तूंचा फोटो काढून पोलीसठाण्याला पाठवणारे महाभागही आहेतच! जसं काही त्या परिसरात दुसरं काही चालतच नाही. याच इमारतीपासून दहा-पंधरा पावलावर एक-दोन मोठे ठेलेही आहेत. त्यांचा त्रास मात्र होत नाही, हे न पटणारे तर्कशास्त्र आहे. येथूनच अजून दहा पावले दूर कुणी ठेलेवाल्याने पूर्वीचा टेलिफोन बूथ सोडून मोठा आईस्क्रीम स्टॉल टाकलेला यंत्रणेला कसा चालतो? तोही आपला मूळ आकार सोडून सर्व पदपथ आपल्यात सामावून घेणारा? प्रत्येक वेळी गरीब फेरीवाला दंडाचे 1200 रुपये कुठून आणणार?

महिला नेत्याने बिर्याणी रस्त्यात ओतली!

याच दादर परिसरात बंगाली मुस्लिम फेरीवाले वाढल्याची तक्रार एका राष्ट्रीय पक्षाच्या स्थानिक महिला नेत्यानी केली होती. वास्तविक बेकायदा बंगाली घुसखोरांना शोधण्याचे काम मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे असताना व गृह मंत्री त्यांच्याच पक्षाचे असताना त्यांनी जाहीर भाषणात आरोप का करावा हा येथील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. या महिला नेत्याने अगदी काही दिवसांपूर्वी याच परिसरात असलेल्या महानगर टेलिफोन कार्यालयाबाहेरील पदपथावर एका मुस्लिम फेरीवाल्याचा बिर्याणी भरलेला टोप रस्त्यावर उपडा करून सर्व बिर्याणी रस्त्याला खाऊ घातल्याचा किळसावाणा प्रकार केल्याचेही अनेकांनी या प्रतिनिधीला सांगितले. या देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री ‘सर्वधर्म समभाव’चा राग आळवत असताना या रागात हा बेसूर कशाला, असा सूरही काहींनी लावला.

आम्ही गर्दी करून जनतेला सतवणाऱ्या फेरीवाल्यांची बाजू घेत नाही तर काही ठराविक समुदायावर डुख ठेवून जी कारवाई होत आहे त्याचा निषेधच करू. दादर साफच करायचे असेल तर ते सर्व दादर साफ करा. एक कोपरा साफ करण्याचे नाटक नको, अशी जनतेची भावना आहे. शिवाय आता सणावाराचे दिवस असताना गरिबांवर कारवाई करताना सांभाळून कारवाई करा, असा खुद्द मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सल्ला असताना गरिबांनाच हिसका दाखवण्याचा ‘तेजस्वी’ बाणा नको..

Continue reading

काय काय नाही पाहिले क्रॉफर्ड मार्केटच्या पोलीस प्रेसरूमने!

चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात (महात्मा फुले मंडई असे नामकरण झालेले असले व त्यालाही अनेक वर्षे उलटून गेलेली असली तरी प्रचलित नाव क्रॉफर्ड मार्केट असेच आहे) गेलो होतो. तसे हुतात्मा चौक परिसरात अजून प्रसंगानुरूप जाणे होत असतेच. पण...

हा पाहा मालाड रेल्वेस्थानकाचा मेकओव्हर!

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मालाड स्थानकाची दुरुस्ती वा मेकओव्हर गेली तब्बल सात-आठ वर्षे सुरु आहे. (काहींनी तर हे काम सुरु होऊन दहा वर्षे तरी झाली असावीत असा अंदाज व्यक्त केला आहे.) मालाड, कांदिवली व बोरिवली ही वाढणारी रेल्वेस्थानके आहेत हे...

बीडच्या आयपीएसला गायब केले, तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?

गेल्या २०/२५ वर्षांत बीड - परळी परिसरात याहूनही काळी कांडं घडली.. अहो आयपीएसला गायब केले गेले.. तेव्हा घशात शेंदूर घातला होतात का?.. "करा रे खुशाल करा हवा तो राडा धमाल करण्याचा जमाना आहे बिनधास्त करा, बलात्कार -भ्रष्टाचार - अत्याचार - भरसभेत -...
Skip to content