कोविड-१९ संसर्गाचा यशस्वी उपचार करण्याच्या औषधांच्या मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) पद्धतीचा मुंबई महापालिकेचा प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे मृत्यूदरात तब्बल ७० टक्क्यांची घट आली आहे. त्याचवेळी ऑक्सिजनची गरज ०.५ टक्क्यांवर येत असल्याचे आढळून आले आहे. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी ही उपचारपद्धती फार उपयोगी पडणार असल्याचे कळते.
कोविडची संभाव्य तिसरी लाट आलीच तर ती तातडीने रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. यामध्ये आता भर पडली आहे ती कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या (एण्टीबॉडीज कॉकटेल) उपचार पद्धतीची. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत सुमारे २००पेक्षा अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले असून हा प्राथमिक प्रयोग यशस्वी ठरला आहे.
हे मिश्रित औषध दिल्यानंतर फक्त एकाच (०.५ टक्के) रुग्णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली तर मृत्यू दरामध्ये तब्बल ७० टक्के घट झाली आहे. एवढेच नव्हे तर रुग्णालयातील उपचारांचा कालावधी १३ ते १४ दिवसांवरून कमी होऊन आता ५ ते ६ दिवसांवर आला आहे.
बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावेत म्हणून गेल्या दीड वर्षापासून पालिका निरनिराळ्या औषधोपचारांची चाचपणी करत आहे. याचाच एक भाग म्हणून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात करण्यात आला. हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.
महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह राज्याचे कुटुंब कल्याण आयुक्त रामास्वामी यांच्या पुढाकाराने ही नवीन औषधोपचार पद्धती स्वीकारण्यात आली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार व अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्या निर्देशाखाली त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कोविड बाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर २०२०पासून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोविड बाधित झाल्यानंतर त्यांनादेखील हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये अत्यंत वेगाने सुधारणा झाली.
भारतामध्ये अलीकडेच १० मे २०२१ रोजी केंद्रीय औषधी प्रमाणके नियंत्रण संघटनेकडे (Central Drugs Standard Control Organisation) या औषधांची नोंदणी होऊन भारताचे औषधी महानियंत्रक (Drugs Controller General of India) यांनी त्यास मान्यता दिली आहे. कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब ही प्रतिपिंड औषधी (antibodies medicine) आहेत. या दोन्ही औषधांचा मिश्रित (cocktail) वापर करुन कोविड बाधितांवर उपचार केले जाऊ शकतात.
ज्यांचे वय १२ वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन ४० किलोपेक्षा जास्त आहे अशा बाधित रुग्णांना हे औषध दिले जाते. सौम्य ते मध्यम (mild to moderate) स्वरुपात ज्यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. महत्त्वाचे म्हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्यासारखे श्वसनाचे इतर तीव्र आजार, उच्च रक्तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्याधी इत्यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्य होते.
आजवर २१२ कोविड बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. त्यापैकी १९९ रुग्णांचे उपचारअंती निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या १९९ रुग्णांमध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील १०१ रुग्ण, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील ४५ रुग्ण तर ६० वर्षे वयोगटावरील ५३ रुग्णांचा समावेश आहे. एकूण १९९पैकी ७४ जणांना किमान एक तरी सहव्याधी (co-morbidity) आहे. हे सर्व १९९ रुग्ण सौम्य ते मध्यम बाधा या गटातीलच होते. उपचार सुरू करतेवेळी या १९९ बाधितांपैकी १७९ जणांना ताप, १५८ जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्याचा त्रास होत होता. तसेच ४ रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करावा लागणार होता.
एचआरसीटी चाचणीनुसार वर्गीकरणाचा विचार करता रुग्णांचा सरासरी एचआरसीटी स्कोअर २५ पैकी ७ ते ८ इतका होता. सर्वाधिक एचआरसीटी स्कोअर २५ पैकी ११ इतका होता. उपचाराअंती प्राप्त निष्कर्षांचा विचार करता, कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रण देण्यात आलेल्या बाधितांना रुग्णालयात ५ ते ६ दिवसच उपचार घ्यावे लागले. त्या तुलनेत इतर औषधी घेतलेल्या, पहिल्या व दुसऱया लाटेतील रुग्णांना १३ ते १४ दिवस रुग्णालयात राहवे लागत होते. रुग्ण लवकर बरे होत असले तरी औषधांचे परिमाण अभ्यासण्यासाठी तसेच रुग्णांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवता यावी, यासाठी त्यांना अधिकचा काळ रुग्णालयात ठेवण्यात आले.
निरीक्षण अंती असे लक्षात आले की, मिश्रित औषध दिल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच रुग्णांना ताप येणे थांबले. १९९ पैकी फक्त एकाच व्यक्तीला पुढे प्राणवायू पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे ०.५ टक्के आहे. कोविड बाधितांना एरवी प्राणवायूची भासणारी निकड पाहता, ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही रुग्णावर या मिश्रित औषधांचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्ट्स) आढळलेले नाहीत. तसेच मृत्यूंचे प्रमाणदेखील तब्बल ७० टक्क्यांनी घटले आहे.
सदर मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्या कालावधीत संबंधित रुग्णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्णालयात दाखल करुन न घेता, बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) पद्धतीनेदेखील हे औषध देणे शक्य आहे. रेमडेसिविरसारखी औषधं आणि स्टेरॉईडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्य असल्याने रुग्णांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे.
रुग्णालयात दाखल होण्याची गरज टाळून, प्राणवायू पुरवठा आणि इतर महागड्या औषधोपचारांची आवश्यकता भासत नसल्याने सदर मिश्रित औषधोपचार आर्थिकदृष्ट्यादेखील रुग्णांना फायदेशीर ठरणारे आहेत. वैद्यकीय मनुष्यबळाचा विचार करता, रुग्णाला ओपीडी तत्त्वावर उपचार पुरवणे शक्य असल्याने आणि रुग्णाचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होत असल्याने डॉक्टरांवरील कामकाजाचा ताणही निवळण्यास मदत होणार आहे.

