Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्री महोदय, अशा...

मुख्यमंत्री महोदय, अशा विकासाचे कंत्राट नक्कीच घेऊ नका!!

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी आपल्या राजकीय विरोधकांचा समाचार घेतीवेळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली हे मान्य करावेच लागेल. गेली अनेकवर्षे त्यांची भाषणे, तीही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच, ठाणेकरांनी ऐकली होती. परंतु, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण आपल्या विरोधकांचा समाचार घ्यायला मुळीच मागेपुढे पाहत नाहीत हेच जनतेला कळून आले आहे.

शिंदे मुख्यमंत्री असले तरी ते कंत्राटी कामगारच आहेत, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. तोच धागा अचूक पकडून मुख्यमंत्र्यांनी, होय मी.. राज्याच्या विकासाचे कंत्राट घेतले आहे, असे रोखठोक प्रतिपादन केले. मुख्यमंत्री महोदय, हल्ली ज्याच्यात्याच्या तोंडी विकासाचीच गोष्ट असते. पण प्रत्यक्षात आपल्याला काय दिसते याचाही आता विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच पुणे शहराच्या लगतचा भाग आणि नागपूर परिसरातील काही भाग जरा चकचकीत, जरा आधुनिक वाहने, रेल्वे, मेट्रो, मोठमोठे टॉवर्स म्हणजेच काहो विकास? ही काही १०/१५ शहरे सोडली तर आपणास काय दिसते? फार कशाला आपण मुंबई-ठाणे परिसरातीलच काही उदाहरणे घेऊन चर्चा करू.

ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील उड्डाणपूल काहीसा जुना आहे म्हणून थोडावेळ बाजूला ठेवू. गोकुळ नगर परिसरातील उड्डाणपूल तर दोन-तीन वर्षांपूर्वीचाच आहे. एकदा कोणताही लवाजमा न घेता त्या उड्डाणपुलावरून एक-दोन फेऱ्या तरी मारून बघा. जवळजवळ सर्व पूलभर रस्ता उखडला गेल्याचे दिसेल. शिवाय तेथील खड्डा बुजवला आहे असे अभियंते जरी सांगत असले तरी त्या पुलावर जागोजागी मोठी टेंगळे आल्याचा फिल तुम्हाला येईल. हाच उड्डाणपूल ज्या ठिकाणी खाली येतो तेथेच गॅरेजेस आहेत. तेथे तिन्ही त्रिकाळ अनेक रिक्षा नेहमीच उभ्या असतात. त्यामुळे खालच्या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला नेहमीच त्रास होत असतो.

नौपाडा पोलीसठाण्यासमोरच असलेल्या उड्डाणपुलाजवळ तर कमालच आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना इतकी अरुंद जागा ठेवलेली आहे. त्यातच तेथे नेहमीच पोलीसठाण्याच्या नाकावर टिच्चून गाड्या व रिक्षा पार्क केलेल्या असतात. त्यातच त्या रस्त्याला लागूनच असलेले दुकानदार आपल्याही बाईकस तेथेच लटकवून ठेवत असल्याने दोन मिनिटांच्या प्रवासाला किमान पाच-सात मिनिटे तरी जातातच! हाच तुम्हाला अपेक्षित असलेला विकास आहे का? तुम्ही मुख्यमंत्री आता झालात हे कबूल. पण गेली अनेकवर्षे ठाण्याचे तारणहार म्हणून ओळखले जाता ते काय उगाचच? ठाणे शहराच्याच ढीगभर समस्या आहेत. काय काय सांगू?? कासारवडवली, कापूरबावडी, खोपट, आतील इंदिरा नगर. फार काय तुमच्या ठाण्यातील घराजवळचा सेवा मार्ग… किती काळ त्याचे काम चालू आहे. आपण मुख्यमंत्री झाला नसतात तर हेच काम त्यांनी नवरात्रीपर्यंत खेचले असते. या कंत्राटदारांच्या कानाखाली दिघे स्टाईलने तुम्ही खरे तर मारलेच पाहिजे, अशी शोचनीय अवस्था रस्त्यांची झाली आहे.

मुख्यमंत्री

अगदी काही दिवसांपूर्वीच रस्ते मार्गाने कर्जतला गेलो होतो. तेथे शेडुंग टोल नाक्यानंतर काही अंतर गेले की, एक बसस्टॉप आहे. तो जरा साहेब एकदा जाऊन बघाच. नाहीतर तुमच्या भारत गोगावले यांना सांगा. देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हा स्टॉप पाहून मला माझीच लाज वाटली. हा स्टॉप काहीसा उंचावर आहे. तेथे बसण्यासाठी खालचा पत्राही दीनवाणा झाला आहे. तेथे एक माऊली उभी होती. तिला विचारले किती वेळ झाला तुला? म्हणाली साहेब, पाऊण तास झाला. या बस आणि एसटीचा काहीपण भरवसा नाही. येण्याची वेळच ठरलेली नाही. वरती छप्पर नसलेला हा स्टॉप आणि सध्या सुरू असलेला पाऊस. हाच का आपला विकास साहेब?

तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या पलावा नगरीत (डोंबिवली) येथे जाण्याचाही योग आला होता. त्यांची पलावा नगरी सुरू होते तेथेच सकाळ-संध्याकाळ प्रचंड वाहतूककोंडी होत असते. आपले दुसरे सहकारी रवींद्र चव्हाण यांची याबाबत साक्ष काढता येईल. या लोढा साहेबांनी पलावाची दुसरी फेजही तयार केली असून त्याला न्यू सिटी असे गोंडस नाव दिले आहे. इमारती चकाचक आहेत. परंतु वाहतूकव्यवस्थेचा पत्ताच नाही. रिक्षा तब्बल १५० रुपये मागतात. लोढा साहेबांनी दर तासाला एक बस ठेवलेली आहे. त्याचे भाडे ३०/४० रुपये असते. आता मला सांगा, कर्जाचे हफ्ते फेडत बसणाऱ्या नोकरदारांना हे परवडणारे आहे काय? हा तर आपला विकास नाही?

मुंबईच्या मेट्रोचे तुमचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फार कौतुक आहे. आम्हालाही आहे. पण वरून जाताना आकाशाकडे तरी किती वेळ पाहणार. कधीतरी खाली बघावेच लागते आणि डोळ्यांना काय दिसते? प्रचंड मोठी झोपडपट्टी आणि त्यांच्या विळख्यातील मोठमोठे टॉवर्स! हाच का आपला विकास? आपण म्हणाल मी आताच मुख्यमंत्री झालोय. बरोबर आहे. मुख्यमंत्री आता झाला असाल. पण नगरविकास मंत्री म्हणून फार आधीपासून आपण काम पाहतच होतात!! एकनाथजी, पक्षप्रमुखांबरोबर आपले मतभेद होते हे आपण एका मर्यादेपर्यंत कोणालाही कळू दिले नाहीत हे योग्यच होते. परंतु आता हे सर्व मागे सारून पुढे चालत राहिलात तरच काहीतरी भरीव कामगिरी करून दाखवता येणार आहे. विरोधी पक्ष टीका करणारच. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलात तर कारभार कोण करणार?? आपले दुःख समजू शकते. प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याची उर्मीही समजू शकते. राजकारणात मौन पाळले तर आरोप खरा असतो असे समजले जाते. तरीही याकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.

“सिर्फ सच और झूठ की मीजान मे रख्ये रहे

हम बहादुर थे मगर मैदान में रख्ये रहे”

अशी काहीशी आपली अवस्था होती हे अमान्य करण्यात हशील नाही. परंतु आता ते घरही सोडून बाहेर आले आहात. नव्या बांधिलकीचा विचार करा आणि पुढे चला…

“जिंदगी भर अपनी गुंगी धडकनो के साथ साथ

हम भी घर के किमती सामान में रखे रहे”

हे दुःख विसरता म्हणू विसरता येणार नाही. तसेच पुढे चालताना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कालांतराने ‘यू टू ब्रुटस!’ असे उद्गार काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हीच सदिच्छा!!

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content