सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नेहमीप्रमाणे ड्यटीऐवजी डबलड्युटी केली. साताऱ्यातल्या दरे, या आपल्या गावी, गावातल्या घरी गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतानाच तेथे गेलेल्या शंभुराज देसाई, दादा भुसे या मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चाही केली. इतकेच नव्हे तर दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटाराही केला.
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून त्यांचा नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला. याचसंदर्भात त्यांनी काही सूचनाही दिल्या.
सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबतचे निर्देश दिले.

