पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत जबाबदारीचा विसर पडणे, या गोष्टींमुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांच्यावर शुक्रवारी विधानसभेत नाचक्की ओढवून घेण्याची वेळ आली.
विधानसभेत गुरुवारी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ नियमान्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी बाकांवरील अनेक सदस्यांनी नावेही दिली होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. हे लोक नावे देऊन सभागृहात उपस्थित नसल्याने त्यावर केलेली टिप्पणी तुपे यांना भोवली. त्यावर विरोधकांनी विधानसभेत शुक्रवारी दुपारी आक्षेप घेतला. गुरुवारी शिवसेना उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी उद्भवलेल्या दुःखद प्रसंगामुळे अनेक सदस्य सभागृह सोडून त्यांच्याकडे गेले होते. त्यामुळे चर्चेसाठी नावे देऊनही त्यांना सभागृहात उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, त्याबद्दलची माहिती न घेता तुपे यांनी अनुपस्थित सदस्यांबद्दल शेरेबाजी करताना राजकीय स्वरूपाचे भाष्य केले होते.

तुपे यांनी त्यावेळी केलेल्या वक्तव्याचा लेखी तर्जुमाच कॉँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात वाचून दाखवला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, तरी कामकाज सुरू ठेवले होते. पण काही सदस्य उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली. असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्षपदाची एक गरिमा आहे असे असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही. आपण तीस वर्षं या सभागृहाचे सदस्य असून तीस वर्षांत असा प्रकार घडलेला नाही असंही काँग्रेस विधिमंडळ नेते असलेले विजय वडेट्टीवार म्हणाले.
शिवसेना उबाठाचे भास्कर जाधव तसेच कॉँग्रेसचे नाना पटोले यांनीही तुपे यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संविधानाने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्ष या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही, असे आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी यावेळी दिले. तसेच, तालिका अध्यक्ष या नात्याने कोणाही व्यक्तीने केलेल्या वक्तव्याबद्दल सभागृहात चर्चा केली जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच आपण आपल्या दालनात यासंबंधी योग्य ती कार्यवाही करू, असेही नार्वेकर यांनी सभागृहाला सांगितले.