गहू आणि गव्हाची कणीक किफायतशीर दराला उपलब्ध व्हावी, याकरता केंद्रीय भांडार, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ), अर्थात भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना, आणि नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनएएफईडी), अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना (नाफेड), यासारख्या निमशासकीय आणि सहकारी संस्थांना खुल्या बाजारात विक्री योजने [OMSS(D)] अंतर्गत, गहू खरेदी करून, त्याची कणीक, प्रति किलो रु. 27.50 इतक्या कमाल किरकोळ दरापर्यंत ‘भारत आटा’ ब्रँड अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरीता, 2.5 लाख मेट्रिक टन गहू, प्रति किलो रु.21.50 दराने वितरित करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रीय भांडार, नाफेड, एनसीसीएफ आणि राज्य सरकारांच्या सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष अथवा फिरत्या विक्री केंद्रांवर किफायतशीर दराने गव्हाची कणीक उपलब्ध व्हावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

या संस्थांद्वारे भारत आटा ₹ 27.50/Kg पेक्षा जास्त नसलेल्या किमान किरकोळ दराला विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल, जो कणकेच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमतींपेक्षा कमी आहे. केंद्र सरकारच्या गोदामात 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत 209.85 लाख मेट्रिक टन इतका गव्हाचा साठा होता.

भारत सरकार केंद्रीय/राज्य सहकारी संस्थांच्या देशभरातली प्रत्यक्ष/फिरत्या किरकोळ विक्री केंद्रांच्या माध्यमातून, प्रक्रिया करण्याकरता आणि कणीक बनवून विक्री करण्याकरता गहू उपलब्ध करणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
