नागपूरच्या मौदा तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामाचे भूमीपूजन झाल्यामुळे रामटेक आणि मौदा हे तालुके उमेरड आणि कुही तालुक्यांना जोडले जातील तसेच या पुलामुळे नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना कनेक्टेव्हिटी मिळून येथील व्यवसायालादेखील चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल मौदा येथे केले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग 53वरील नागपूर वैनगंगा ब्रिज सेक्शनवर मौदा वाय जंक्शनच्या सहा लेन उड्डाणपूलांच बांधकाम, गोवरी कोरगाव राजोला मौदा येथे कन्नड नदीवरील पुलाच बांधकाम, रामटेक-मौदा मार्गाचे चौपदरीकरण त्याचप्रमाणे माथनी गावाजवळ कन्नड नदीवरील पुलाचं मजबुतीकरण या तब्बल 200 कोटींच्यावर निधीच्या तरतुदीने करण्यात येणाऱ्या चार कामांचं भूमिपूजन मौदा वाय जंक्शन त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील गोवरी या ठिकाणी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. या सहा लेन उड्डाणपुलाला मौदा भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत महादेव वाडीभस्मे यांचे नाव देण्याचे आश्वासनदेखील गडकरी यांनी यावेळी दिले.
उमरेड ते अंभोरा आणि पवनी ते भंडाराकडे जाणाऱ्या रस्त्यालासुद्धा पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्याने चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भूमीपूजन झालेल्या बांधकामामुळे मौदामधील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटची दुरस्ती होणार होईल, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं की, या भूमिपूजनामुळे या तालुक्यातील दळणवळणाची सुविधा चांगली होणार असून हा मौदा, बुटीबोरी, उमरेड, कुही तालुक्याकरिता आनंदाचा क्षण आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी या चारही प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
या चारही प्रकल्पामुळे दळणवळणाची सुविधा देणाऱ्या अत्याधुनिक रस्त्यांचे जाळे निर्माण होऊन यामार्फत सुलभ सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार आहे तसेच वेळ आणि इंजिनाची बचत होऊन वाहतुकीची कोंडीसुद्धा टळणार आहे.