Friday, February 14, 2025
Homeडेली पल्सशेवटच्या चढाईवर बीपीसीएल,...

शेवटच्या चढाईवर बीपीसीएल, टीएमसीने गाठली देसाई कबड्डीची उपांत्य फेरी!

क्षणाक्षणाला रंग बदलणारा गुणफलक आणि पिछाडीनंतरही बाजी मारण्याचा थरार कबड्डीप्रेमींना स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त अनुभवायला मिळाला. शेवटच्या चढाईपर्यंत रंगलेल्या सामन्यात चढाईपटूची अफलातून पकड करत भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि ठाणे महानगरपालिका (टीएमसी) या संघांनी विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता बीपीसीएलची गाठ बँक ऑफ बडोदाशी पडेल तर ठाणे महानगरपालिका अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सशी भिडेल.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतल्या कबड्डीभूमीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना कबड्डीच्या लौकिकाला साजेसा चढाओढीचा-पकडापकडीचा रोमांच अनुभवता आला. गतविजेत्या आणि प्रो कबड्डीतील स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या बीपीसीएलला अक्षरशा घाम फुटला होता. मुंबई बंदरच्या युवा खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत मध्यंतरालाच २१-१६ अशा आघाडी घेत सनसनाटी निर्माण केली होती. मात्र उत्तरार्धात बीपीसीएलने मुंबई बंदरची बरोबरी साधण्यासाठी जोरदार संघर्ष केला आणि अखेर शेवटच्या मिनीटाला बरोबरी साधली आणि सामन्याची शेवटची चढाई करत असलेल्या मुंबई बंदरच्या सौरभ राऊतची पकड करत अनपेक्षितपणे उपांत्य फेरी गाठली. शेवटची २ मिनिटे असताना मुंबई बंदर ३१-२९ असा आघाडीवर होता. शेवटच्या क्षणी निलेश शिंदेच्या नेतृत्त्वाने बीपीसीएलला विजय मिळवून दिला.

ठाणे महानगरपालिका (टीएमसी) आणि एपीएमसी यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा थरारही विलक्षण रंगला. या सामन्यात टीएमसीने १०-९ अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. त्यानंतर दोघांमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. एकवेळ टीएमसीने सामन्यावर आपली पकड मजबूत करत २६-२१ अशी आघाडी घेतली होती. त्यातच एपीएमसीवर लोणची नामुष्की होती, तेव्हा अजित चौहानने सुपर रेड करत टीएमसीच्या दोघांनाही आपल्या ताकदीच्या बळावर बाद करून एपीएमसीला २७-२६ अशी एका गुणाची आघाडी मिळवून सामन्याचा थरार टोकाला नेला. पण सामना संपायला शेवटची दोन मिनिटे असताना एपीएमसीच्या चढाईपटूची पकड करत टीएमसीने पुन्हा आघाडी मिळवली आणि सामना २९-२८ असा आपल्याकडे राखला.

तसेच आज झालेल्या अन्य उपांत्यपूर्व लढतीत बँक ऑफ बडोदाने ८-१५ अशा पिछाडीनंतरही मध्य रेल्वेला उपांत्यपूर्व फेरीच्या ट्रॅकवरून खाली उतरवले. मध्य रेल्वेच्या ज्ञानेश्वर जाधव, भरत भंवर यांच्या खेळाने मध्य रेल्वेला आघाडी मिळवून दिली. पण ऋषिकेश भोसले, परेश हरड आणि साहिल राणे यांनी मध्यंतरानंतर रेल्वेवर चढाईंचे जोरदार हल्ले चढवत लोणची करामत केली आणि सामन्यावर आपली पकडही मजबूत केली. अत्यंत रंगतदार सामना बडोदा बँकेने २८-२५ असा जिंकला. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्ससुद्धा रिझर्व्ह बँकेविरुद्ध १३-१९ अशी मागे होती, पण दुसर्‍या सत्रात जयेश यादव, अक्षय मकवाना, गणेश महाजन यांनी अ‍ॅश्युरन्सला गुणांची कमाई करून देत विजयाचेही अ‍ॅश्युरन्स दिले. अखेर हा सामनाही त्यांनी ३४-२८ असा फिरवला.

भारत पेट्रोलियम, बँक ऑफ बडोदाचे डबल धमाके

त्याआधी, स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकानिमित्त विशेष व्यावसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी गतविजेत्या भारत पेट्रोलियम आणि बँक ऑफ बडोदा यांनी सलग दोन विजयांची नोंद करत बादफेरीत मजल मारली. तसेच युनियन बँक आणि मुंबई महानगर पालिकेनही प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव केला.

आज कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीतील गिरीश इरनाक, रिशांक देवाडिगा, निलेश शिंदेसारख्या खेळाडूंचा खेळ पाहता आला. मात्र या तगड्या खेळाडूंसमोर दुबळे संघ असल्यामुळे त्यांचा आक्रमक खेळ पाहाण्याची संधी मिळाली नाही. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत सीताराम चव्हाण क्रीडानगरीत बीपीसीएलने ठाणे महानगरपालिकेला या सामन्यात कसलीच संधी दिली नाही. टीएमसी ना पकड करू शकले ना चढाईचे गुण मिळवू शकले. बीपीसीएलच्या चढाईपटूंना ना ते रोखू शकले. त्यांचे चढाईपटू बीपीसीएलचा कडेकोट बंदोबस्त भेदण्यात यशस्वी ठरले. बीपीसीएलने हा एकतर्फी सामना ३०-१० असा जिंकला तर दुसर्‍या सामन्यात जेएसडब्ल्यूचाही त्यांनी २६-१० असा फडशा पाडला. आकाश रुडले आणि शुभम शेळकेच्या चढायांचे जेएसडब्ल्यूकडे उत्तरच नव्हते. प्रतिस्पर्धी कमकुवत असले तरी बीपीसीएलचे दिग्गज त्यांच्यावर तुटून पडले नाहीत.

बँक ऑफ बडोदानेही मिडलाईन आणि आरबीआयचा पराभव करत बाद फेरीत सहज स्थान मिळवले. बँक ऑफ बडोदाने परेश हरड साहिल राणे यांच्या वेगवान खेळामुळे आरबीआयचा ३७-१७ असा धुव्वा उडवला. बडोद्याने पहिल्या सत्रातच १९-९ अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. मिडलाईन अ‍ॅकेडमीविरुद्धही बँक ऑफ बडोदाने ३१-१४ अशी विजयी आघाडी घेतली  होती. मात्र दुसर्‍या सत्रात मिडलाईनच्या आदित्य ताठे, सुमीत गवळीने आक्रमक चढाया करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपेक्षित यश लाभले नाही आणि बँक ऑफ बडोदाने ४५-३५ असा विजय मिळवला.

अन्य लढतीत मुंबई महानगरपालिकेने अजित चौहान, अनुज गावडे यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर एपीएमसीला ४३-३१ असे नमवले. तसेच युनियन बँकेने पुण्याच्या संत सोपान सहकारी बँकेचा ४४-२१ असा फडशा पाडला. विजयी संघाच्या शुभम गायकवाड आणि अभिषेक निंबाळकर यांनी सुसाट खेळ केल्यामुळेच त्यांना मोठा विजय नोंदविता आला.

Continue reading

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...

जे. जे. उड्डाणपुलाखाली उभ्या राहणार बेस्टच्या ३ कालबाह्य डबलडेकर!

मुंबईतल्या कुतुब-ए-कोंकण मकदूम अली माहिमी म्हणजेच जे. जे. उड्डाणपुलाखालील संपूर्ण २.१ किलोमीटर लांबीच्‍या रस्‍ता दुभाजकाचे संकल्‍पना आधारित (थीम बेस्‍ड्) सुशोभिकरण करावे, तेथे ध्‍वनीप्रदूषणास प्रतिबंध ठरू शकणारी झाडे लावावीत, आकर्षक बागकामे (लॅण्‍डस्‍केपिंग) करावी, एकसमान रचनेचे मजबूत संरक्षक कठडे (रेलिंग) उभारावेत,...
Skip to content