मुंबईत झालेल्या श्रीकांत चषक आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत निर्णायक क्षणी अचूक फटकेबाज खेळ करणारा विवा कॉलेज-विरारचा भव्या सोळंकी विजेता ठरला. पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरला अंतिम फेरीत भव्या सोळंकीने सहज नमविले.
विजेत्या-उपविजेत्यांना श्रीकांत चषक व स्ट्रायकर पुरस्कार देऊन माजी नगरसेवक ठाकूर सागर सिंह, उद्योजक शैलेश दलाल, तेजस शाह, संदीप आयरे, चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील ज्युनियर ४८ खेळाडूंनी भाग घेतला होता.
कांदिवली-पूर्व येथील कानकश्री सभागृहामध्ये झालेल्या उपांत्य फेरीत पुष्कर गोळेला भव्या सोळंकीने चकविले तर सार्थक केरकरने श्रीशान पालवणकरचे आव्हान संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली. उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार पुष्कर गोळे व श्रीशान पालवणकर यांनी; उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार वेदांत राणे, अथर्व म्हात्रे, प्रसन्ना गोळे, नील म्हात्रे यांनी आणि उपउपांत्यपूर्व उपविजेतेपदाचा पुरस्कार अर्णव गावडे, तृशांत कांबळी, रेहान शेख, ओमकार वडार, अंश जाधव, अवैस खान, शेख अब्दुल, वेदांत पाटणकर यांनी मिळविला.
शालेय-कॉलेज खेळाडूंच्या आग्रहास्तव आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व सुमती सेवा मंडळ-दहिसरतर्फे माहीम ज्युवेनील स्पोर्ट्स क्लब सहकार्याने माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल, १६ सप्टेंबर रोजी आनंदराव अडसूळ अमृतमहोत्सवी चषक शालेय-कॉलेज प्रमुख ज्युनियर खेळाडूंची सुपर लीग कॅरम स्पर्धा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आली. सुपर लीगमध्ये गणाधीश चषक व श्रीकांत चषक कॅरम स्पर्धेमधील १६ खेळाडूंना प्रवेश दिला गेल्याचे सुमती सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी सांगितले.