केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने नागरिकांना भारतातील शेअर बाजार आणि ट्रेडिंगमध्ये व्यत्यय आणण्याबाबत दावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून येणाऱ्या दुर्वर्तनात्मक दूरध्वनीबाबत (कॉल) सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने असे द्वेषयुक्त दूरध्वनी देशविरोधी घटकांकडून केले जातात. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना अशा क्रमांकांवरून आलेले द्वेषयुक्त दूरध्वनी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी, असे दूरध्वनी आल्यास, दूरसंचार विभागाकडे help-sancharsaathi@gov.in येथे किंवा त्यांच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.