जन्मापासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कितीतरी खर्चांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, नोकरी, स्वतःचे घर, विवाह, मुले, त्यांचे शिक्षण… एक ना अनेक! विविध स्वरूपात खर्चाचे रहाटगाडगे आपले सुरूच असते! आपली मिळकत आणि खर्चाचा मेळ घालण्यासाठी काटेकोर नियोजनाची गरज असते. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाचे फॅमिली बजेट असणे आणि त्यानुसार खर्चाची तरतूद करणे केव्हाही श्रेयस्कर! पण हे फॅमिली बजेट कसे आखावे, वयाच्या कोणत्या टप्प्यावर बचतीचा मार्ग निवडावा, खर्च करताना नेमके प्राथान्य कशाला द्यावे, विवाहादी मोठ्या खर्चाबरोबरच आणखी कोणत्या खर्चासाठी नियोजन आवश्यक आहे, कुटुंबाचा आरोग्य विमा कसा आवश्यक आहे, बचतीचे नवीन पर्याय कोणते, अशा विविध गोष्टींचे सखोल मार्गदर्शन सर्वसामान्यांना मिळाले तर त्यांना त्यांच्या फॅमिलीचे बजेट व्यवस्थित आखता येईल आणि त्यामुळे त्यांचे आयुष्य अधिक सुखकर होऊ शकेल, या विचारांतून हे पुस्तक आकारास आले आहे. सर्वसामान्य कुटुंबांबरोबरच दिव्यांगांसाठी आर्थिक आखणी, आधुनिक विचारसरणी असलेल्या तरुण तरुणींनी आपल्या खर्चाची विभागणी कशी करावी, त्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, याचा उहापोह या पुस्तकात केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्हिंग विल, वाढत्या खर्चाचे नियोजन याबद्दलही मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. थोडक्यात, जुन्या-नव्या सर्वांनी कौटुंबिक अंदाजपत्रकाचा आराखडा आखण्यापूर्वी विचारात घ्यावयाचे टप्पे सांगणारे आणि कुटुंबाच्या आनंदाची, समाधानाची चौकट नव्याने आखून देणारे आर्थिक समुपदेशक विनायक कुळकर्णी लिखित मार्गदर्शक पुस्तक- फॅमिली बजेट!
फॅमिली बजेट या आपल्या पुस्तकाविषयी लेखक आपल्या मनोगतात म्हणतात- मी लिहीत असलेल्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ वर्तमानपत्रातून नवीन वर्षासाठी आर्थिक सदर हवे आहे, असा फोन आला. दोन दिवसांनी मुंबईच्या निवासी संपादकांनी फोन करून यावेळी लेखन जरा ‘हटके’ आणि वाचकांशीच संवाद होत असल्यासारखे होऊ दे, असे सुचवले. सदराचे नामकरण ‘फॅमिली बजेट’ असे केले होते. संवादी शैलीतून आर्थिक व्यवहारांवर गुंतवणुकींवर पहिल्या काही लेखांतून मी केलेले भाष्य सर्वांना आवडले. पहिल्या दोन महिन्यांतच फॅमिली बजेटमधील ‘श्रीकाका’ वाचकांच्या घरात आणि मनात वसल्याची पोचपावती मिळू लागली होती. ‘फॅमिली बजेट’साठी विषय कसे मिळतात, असे ओळखीचे तसेच अनोळखी लोकही विचारत. अर्थात, काही वाचकांचे व्यक्तिगत प्रश्न आणि माझ्या व्यावसायिक अनुभवातून आलेले प्रश्न यांचा मेळ घालून हे कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर अधिकतर भाष्य करणारे ‘फॅमिली बजेट’ जन्माला आले.
अनिवासी भारतीय मित्र आणि नातेवाईक भारतात परत येत असल्याची चाहूल २०२२पासूनच लागली होती. त्यातील काही जणांनी माझ्याशी संपर्क साधून जेव्हा त्यांच्या प्रश्नांची चर्चा केली, त्यावेळी हा विषय हाताशी आला होता. माझ्या एका अमराठी ज्येष्ठ ग्राहक मित्राच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाले. दोन्ही मुलांनी परदेशांचे नागरिकत्व स्वीकारल्याने त्याला एकटेपणा जाणवत होता. त्याच्याच एका नातेवाईकाने त्याला उतारवयात साथीदार निवडण्यास सांगितले. त्यासाठीच्या आर्थिक बाबी आणि काही प्रमाणात कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी तो माझ्याकडे चर्चा करण्यासाठी आला आणि मला नवा विषय देऊन गेला.

गुंतवणूक आणि आर्थिक समुपदेशक म्हणून माझ्या चार दशकांच्या व्यावसायिक अनुभवातून मिळालेली अनुभूतीच जणू ‘फॅमिली बजेट’मधील लेखांची जननी आहे, असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही. सर्व काही व्यवस्थित असतानाही वृद्धाश्रमात स्वतःहून जाण्याची तयारी केलेले वयोवृद्ध जोडपे माझ्या पुस्तकांचे वाचक होते. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या मुलाला पुढे इंजिनीअरिंगमध्ये एम.एस. करण्यासाठी अमेरिकेत शिकायला पाठवण्याकरिता आर्थिक तयारी कशी करायची, हे विचारायला आलेल्या पालकाने मला दोन लेखविषय मिळवून दिले होते. सामाजिक संस्थांत वावरणाऱ्या मित्राकडून समलिंगी व्यक्तींचे विश्व समजून घेता आले आणि त्यांच्यासाठी आर्थिक नियोजन किती आवश्यक आहे याची जाणीव सर्वसामान्य लोकांना करून देता आल्याचा आनंद मला घेता आला. एका ग्राहकाला ‘लिव्हिंग विल’ समजून देताना ही काळाची महत्त्वपूर्ण गरज आहे, हे अधोरेखित झाले होते. दिव्यांग मुलांचे प्रश्न त्यांच्या पालकांना चिंतातूर करतात आणि याबाबत चर्चा करताना हृदयावर दगड ठेवून व्यावहारिक निर्णय घेणारे पालक बघून नकळत हात जोडले गेले आणि डोळ्यांत अश्रू साठले.
एका कुटुंबाच्या बजेटपुरते हे सदर मर्यादित राहिले नाही, याचा एकीकडे आनंद आहे; तर दुसरीकडे समाजाच्या कौटुंबिक बजेटचा आलेख आणि आवाका लक्षात घेता आल्याने, त्यातून काही सामाजिक, कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे शोधता आल्याने मिळालेले आत्मिक समाधान खूपच मोठे आहे. अर्थात, यात माझ्या वाचकांचा वाटा खूपच मोलाचा आहे.
फॅमिली बजेट
लेखक: विनायक कुळकर्णी
प्रकाशक: सकाळ प्रकाशन
मूल्य: २००/- रुपये टपालखर्च: ५० /- रुपये

पुस्तक खरेदीसाठी संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9702070955)
(लेखक साहित्यप्रेमी ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

