Homeहेल्थ इज वेल्थमणक्याची क्षयरोगग्रस्त अंथरूणावर...

मणक्याची क्षयरोगग्रस्त अंथरूणावर खिळलेली महिला १० दिवसांत लागली चालू!

मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या, त्यातून अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मिळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे करण्याची किमया बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विष्‍णूप्रसाद नंदराय (व्ही.एन.) देसाई रूग्‍णालयाने स्पाइन क्लिनिकच्या सहकार्याने साध्य करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्‍या दहा दिवसात ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सांताक्रुझ (पूर्व)च्या व्ही. एन. देसाई महानगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांनी सांगितले की, मणक्‍याच्‍या व्‍याधीने ग्रस्‍त एक २२ वर्षीय तरुणी मागील आठवड्यात व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रूग्णालयात दाखल झाली. या महिलेला चालता येत नव्‍हते. पायांची हालचाल करता येत नव्‍हती. महिनाभर त्या अंथरूणास खिळून होत्या. त्यामुळे मुत्राशय आणि ओटीपोटावरदेखील परिणाम झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक ढोंगी वैद्याकडून झालेल्या बनावट उपचारांमुळे या तरुणीचा हा आजार बळावला होता.

अगदी तरुण वयात आजाराने बेजार झालेल्या ह्या तरुणीच्या आजाराचे संपूर्ण निदान करण्यासाठी एम.आर.आय. (MRI) तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार, या तरुणीला मणक्याचा क्षयरोग झाल्‍याचे तसेच त्यामुळे मणक्यातील विविध नसांवर दाब निर्माण झाल्याचे आढळले. एकंदरीत, आजाराने धारण केलेले तीव्र रूप हे क्वचित आढळणारे असे होते. 

या आजारातून तरुणीला संपूर्णपणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय समोर होता. मात्र तो अत्यंत खर्चिक होता. रुग्णाची आर्थिक स्थितीदेखील साधारण स्वरूपाची होती. अशा स्थितीत स्पाइन फाऊंडेशनने, रूग्णालयात कार्यरत स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून सहकार्याचा हात पुढे केला. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तसेच स्पाइन क्लिनिकचे रुग्णालयातील मानद वैद्यकीय सल्लागार, मणक्यांच्या विकारातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद यांनी संयुक्तपणे ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानंतर, या तरुणीच्या मणक्यावर डिकॉम्प्रेशन व हार्टशील फिक्सेशन शस्‍त्रक्रिया (Spine Decompression and Hartshill fixation surgery) यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ही तरुणी स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकली, तर अवघ्‍या दहा दिवसांत त्या कमीतकमी आधार घेऊन चालू लागल्या आहेत. रुग्णाचे मुत्राशय व ओटीपोट पूर्ववत झाले आहे. तरुण महिला आजारातून पूर्णपणे बरे सावरून चालू लागली.

पाठीचे विशेषतः मणक्याचे कोणतेही विकार, दुखणे असल्यास विशेषज्ञ अशा वैद्यकीय तज्ज्ञांचा तातडीने सल्ला घ्यावा. स्थानिक भोंदू लोकांकडून उपचार घेऊ नयेत, अन्यथा आजार बळावतात, त्यातून दुर्धर स्थिती होऊ शकते, असे आवाहन यानिमित्ताने व्ही. एन. देसाई महानगरपालिका रुग्णालयाने केले आहे.

व्ही. एन. देसाई रुग्णालयातील स्पाईन क्लिनिकमध्ये सन २००९पासून आजवर मणक्‍याच्‍या ३७ हजार रूग्णांवर यशस्‍वी उपचार, तर १ हजाराहून अधिक शस्त्रक्रियादेखील यशस्वी केल्या आहेत. मणक्याचे आजार कोणत्याही व्यक्तीसाठी अत्यंत त्रासदायक आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यात अडथळे आणणारे ठरतात. वाढत्या धकाधकीच्या जीवनात धावपळीमुळे तरुण पिढीलादेखील मणक्याच्या विविध विकारांना सामोरे जावे लागत आहे. मणक्याच्या आजारांवरील उपचार खर्चिक तर असतातच, त्यापुढे जाऊन त्यातून सावरायला खूप वेळदेखील खूप लागतो.

ही बाब लक्षात घेता, मणक्यांच्या विकारातील वैद्यकीय तज्ज्ञ तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात १९८८ ते १९९३ दरम्यान अस्थिरोग विभाग प्रमुख असलेले डॉ. शेखर भोजराज यांनी अस्थिरोग उपचार क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञांना एकत्र आणून स्पाइन फाउंडेशनची स्थापना केली. गरजू रुग्णांसाठी समाजसेवी तत्त्वावर फाउंडेशनकडून उपचार केले जातात. ग्रामीण भागात सेवा पुरवत असताना, मुंबईतील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी समर्पित केंद्र सुरू करण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला. महानगरपालिकेत सेवा बजावलेली असल्याने डॉ. भोजराज यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्ही. एन. देसाई रूग्णालयात सेवाभावी तत्त्वावरील स्पाइन क्लिनिक सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, आणि मणक्यांच्या रुग्णांना विशेषज्ञ सेवा देण्याच्या हेतूने, महानगरपालिकेने रुग्णालयात जागा उपलब्ध करून दिली. सप्टेंबर २००९मध्ये क्लिनिक सुरू झाले. मणक्याच्या विकाराने ग्रस्त, आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना सुपर स्पेशालिटी सेवा अत्यंत नाममात्र दरात प्रदान करणे आणि त्यातून महानगरपालिकेच्या रुग्णालयावरील रुग्ण सेवेचा ताण कमी करणे, हा या क्लिनिकचा उद्देश आहे.

पाहता पाहता २००९पासून आजवर तब्बल ३७ हजार रूग्णांवर व्ही. एन. देसाई रुग्णालयाने या क्लिनिकच्या माध्यमातून उपचार पुरवून बरे केले आहे. तर, सुमारे १ हजार ०५२ अत्यंत कठीण अशा शस्त्रक्रिया रुग्णालयात यशस्वीपणे पार पडल्या आहेत. ऑसिपिटो सर्व्हायकल फ्युजन (occiipito cervical fusion), टॅन्डम (tandem), सर्व्हायकल  (cervical), डिफॉर्मेटी करेक्शन (deformity correction) यासारख्या जोखमीच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे.

नियमित बाह्यरुग्ण विभाग, वैद्यकीय सल्ला, तपासणी, शस्त्रक्रिया, त्यानंतरची वैद्यकीय काळजी आणि पुनर्वसन या सगळ्या आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पद्धतीने, कमीतकमी खर्चात आणि तेही मणक्याच्या शल्यचिकित्सकांच्या संपूर्ण देखरेखीखाली पुरविल्या जातात. ज्या-ज्या वेळी आवश्यक आहे तेव्हा, महानगरपालिका आणि स्पाइन क्लिनिक मिळून विविध सरकारी आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना लाभ पुरवतात तसेच समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वतः निधी उभा करतात. परिणामी गरजू रुग्णांना उत्कृष्ट उपचार तर मिळतातच, आर्थिक दिलासादेखील मिळतो. त्यामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयातील स्पाईन क्लिनिक हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा ‘कणा’ ठरला आहे, असे म्हणता येते.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content