Friday, July 12, 2024
Homeपब्लिक फिगरअटल सेतूला अवघ्या...

अटल सेतूला अवघ्या ३ महिन्यांत पडल्या भेगा?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फूट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते. पण महायुती सरकार तर १०० टक्के कमीशनखोर आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे. त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. एक टेकडीही फोडली असून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. वसईच्या खाडीत पाईपलाईनचे काम सुरु असताना एक गरीब कामगार २० मीटर खाली दबला गेला. त्याच्यावर हजारो किलो लोखंड पडले. उच्च न्यायालयाने या सर्व घटनांमध्ये स्वतः लक्ष घालावे. हे सर्व प्रकार मुख्यमंत्री शिंदे यांच्याच खात्यात होत आहेत. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. काँग्रेस या भ्रष्टाचारी सरकारला विधिमंडळाच्या अधिवेशनात जाब विचारेल, असेही नाना पटोले म्हणाले.

भेगा सेतूला नाहीत तर त्याला जोडणाऱ्या रस्त्याला

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने पटोले यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. या भेगा अटल सेतूला पडल्या नाहीत तर त्याला जोडणाऱ्या रस्त्याला पडल्या आहेत आणि त्याच्या दुरूस्तीचे कामही प्रगतीपथावर आहे. उगाचच खोटे आरोप करून अटल सेतूला बदनाम करण्याचे थांबवा, असे भाजपाने म्हटले आहे.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!