`बँक म्हटले की घोटाळा’ असे आता समीकरणच झाले आहे. परिणामी, सज्जन आणि सरळ माणसे बँकेच्या संचालक मंडळापासून दूर राहू लागली आहेत. नसती ब्याद नको म्हणून सरळमार्गी लोक बँक अथवा पतपेढ्या यांच्या निवडणुका लढविण्याच्या भानगडीतदेखील पडत नाहीत. आमचे वडील `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे हे अशा सज्जन लोकांपैकी एक होते. ते म्हणत, `आर्थिक विषय आला की त्यापासून आपण दूर राहवे.’ म्हणूनच अनेकदा संधी येऊनदेखील त्यांनी कोणत्याही सहकारी बँकेचे संचालकपद कधी स्वीकारले नाही.
मुंबईतल्या ठाकूरद्वार येथील मराठा समाजाच्या एका सहकारी बँकेला बँकिंगचा परवाना त्यांनी मिळवून दिला. पण संचालकपदापासून मात्र ते सदैव दूर राहिले. हे सारे आज आठवण्याचे कारण असे की, रायगड जिल्ह्यातील माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांना कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातून नुकतेच दोषमुक्त करण्यात आले. बँकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधव यांनी हा निर्णय एका आदेशाद्वारे जाहीर केला. त्यामुळे रामशेठ यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांना जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे.
दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वाटणारे आणि गरजूंना मदतीचा हात देणारे रामशेठ ठाकूर हे एखाद्या बँक घोटाळ्यात असू शकतील, याची कल्पनादेखील करवत नाही. मग हे कसे घडले? रामशेठ ज्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे संचालक होते त्या बँकेत 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपयांचा घोटाळा कसा घडला? त्यामुळे बँकेच्या खातेदारांचेही आर्थिक नुकसान कसे झाले? हे सारे पाहण्यासारखे आहे. या बँकेवर संचालक म्हणून काम केलेल्या 38 जणांना चौकशीची नोटीस पाठविण्यात आली होती. त्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही नाव होते. या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँकेच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीवर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे.
कर्नाळा बँकेची नोंदणी 2 मार्च, 1996 रोजी झाली. या कर्नाळा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 26 जून, 1996 रोजी परवाना दिला आणि बँकेचे कामकाज 5 ऑगस्ट, 1996 रोजी सुरू झाले. रामशेठ ठाकूर हे 2 मार्च, 1996 पासून संचालक होते. मात्र कार्यबाहुल्यामुळे वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च संचालक म्हणून काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून 11 जून, 1997 रोजी कमी करण्यात आले. सारांश, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बँकेवर संचालक म्हणून केवळ 1 वर्ष 3 महिने 9 दिवसच काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही कर्नाळा बँकेचे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून बँकेच्या कारभारात सहभाग घेतला नाही.
लेखा परिक्षणातील निरीक्षणांनुसार कर्नाळा बँकेतील भ्रष्टाचार हा 2013पासून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा या बँकेतील घोटाळ्याशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. या साऱ्या प्रकरणात रामशेठ यांनी दाखविलेल्या दूरदृष्टीची करावी तितकी स्तुती थोडी आहे. रामशेठ यांना समाजसेवेची आवड आहे. गरीब, गरजू, असहाय्य लोकांचे ते तारणहार आहेत. रंजल्या-गांजल्या लोकांना आपले म्हणणारे ते संत पुरुष आहेत. बँकेच्या माध्यमातून तर फार मोठी लोकसेवा करता येते. पण हे ठाऊक असतानाही त्यांनी कर्नाळा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा देणे पसंत केले. बँकेचा चेअरमन होण्याचा अथवा बँक ताब्यात घेण्याचा मोह त्यांना झाला नाही. लोकांना सदैव सढळहस्ते मदत करत असताना बँकेपासून मात्र ते दूर राहिले. यातच रामशेठ यांचे मोठेपण दिसून येते.
पूर्वी विविध समाजाचा सहकारी बँका स्थापन होत असत. मराठा समाज, भंडारी समाज, वैश्य समाज, सुवर्णकार समाज अशी विविध उदाहरणे या संदर्भात देता येतील. त्याकाळी सहकारी बँक स्थापन करण्याचा उद्देश हा आपल्या समाजातील गरीब बांधवांना मदत करणे हाच असायचा. त्या बँकांमध्येदेखील संबंधित समाजाचे लोक कर्मचारी म्हणून भरती केले जायचे. त्यामुळे समाजाची विविध मार्गाने उन्नती व्हायची. पण काळ बदलला, तसे लोक बदलले. सहकाराची जागा स्वाहाकाराने घेतली आणि बँकांमध्ये घोटाळे होऊ लागले. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बँका धुऊन खाऊ लागले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सत्ताधारी पुढारीदेखील अशा लोकांना पाठिशी घालू लागले. स्वच्छ चारित्र्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर मात्र अशा भ्रष्टाचारी लोकांपासून दूर राहिले याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!