भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’चे पुनरुज्जीवन तसेच त्यांचे अस्तित्व तपासणार आहे. शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा पैलू आहे. याशिवाय ते टार्डिग्रेड्ससारख्या एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांचे पुनरुज्जीवन, निभाव आणि पुनरुत्पादन याविषयी प्रयोग करतील, अशी माहिती केंद्रीय अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिल्लीत सांगितले.
गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन शुक्ला हे एक आहेत. प्रशांत नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन हे या पथकातले इतर अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन नायर यांना अॅक्सिओम-4 मोहिमेसाठी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारताची पहिली मानवासह अंतराळ यान मोहीम गगनयानची, सध्या चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम 2027च्या सुरुवातीला पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अशाप्रकारच्या अंतराळगमनाचे प्रयोग भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल.
डॉ. सिंह यांनी मानवासह यान पाठवून, अवकाश आणि खोल समुद्र संशोधनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले. भारतीय किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही सागरी अर्थव्यवस्था अद्याप पूर्णतः कार्यक्षम नाही. खोल समुद्र अभियान सागरी क्षमतेचा उपयोग करण्यासाठी राबविले जात आहे, असे त्यांनी नमूद केले. नागरी हवाई वाहतुकीबाबत ते म्हणाले की, सर्वसामान्य नागरिक आता सहजतेने हवाईप्रवास करू शकतात. अनेक नवीन विमानतळांचे उद्घाटन झाले असून विमानचालकांना वाढती मागणी आहे. यासाठी सीएसआयआर-एनएएलने दोन-आसनी प्रशिक्षक विमान विकसित केले असून खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने इलेक्ट्रिक हंसा – (ई-हंसा)चे उत्पादन वाढविण्याचे काम सुरू आहे.