Homeब्लॅक अँड व्हाईटअमेरिकन टेनिसमध्ये अरिना,...

अमेरिकन टेनिसमध्ये अरिना, कार्लोसची बाजी!

यंदाच्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले तर पुरुष विभागात स्पेनचा युवा टेनिसपटू २३ वर्षीय कार्लोस अल्कराझने पुन्हा एकदा एका वर्षाच्या अवधीनंतर विजेतेपदाचा चषक उंचावला. या दोघांनी जेतेपदाला गवसणी घालून यंदाच्या मोसमाचा शेवट गोड केला. कार्लोसने २०२२नंतर पुन्हा ही स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. निर्णायक सामन्यात त्याने आपला नेहमीचा प्रतिस्पर्धी अव्वल मानांकित गतविजेता, इटालीच्या यानिक सिनरचा चार सेटमध्ये पराभव करून आपले दुसरे जेतेपद पटकावले. या दोन युवा खेळाडूंमधील अंतिम लढत‌ फारशी रंगली‌ नाही. या दोघांत याअगोदर यंदा फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत फायनल मुकाबला रंगला होता. ते दोन्ही सामने अटीतटीचे झाले होते. फ्रेंच स्पर्धेत कार्लोसने तर विम्बल्डन स्पर्धेत सिनरने जेतेपद पटकावले होते. त्या तुलनेत अमेरिकन स्पर्धेची अंतिम लढत काहीशी एकतर्फी झाली. त्यामुळे टेनिसप्रेमींची काहीशी निराशा झाली. दुसरा सेट जिंकून सिनरने सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु अल्कराझच्या‌ सफाईदार आणि अचूक खेळासमोर पुढील दोन सेटमध्ये सिनरकडे उत्तर नव्हते. या विजयाबरोबर कार्लोसने विम्बल्डन स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली.

उभय खेळाडूंत आतापर्यंत १५ सामने झाले आहेत. त्यात अल्कराझने‌ १० तर सिनरने ५‌ सामने जिंकले आहेत. कार्लोसने आता‌ एकूण सहा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकी दोन फ्रेंच, दोन विम्बल्डन, दोन अमेरिकन स्पर्धांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांतील आठ ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धांत प्रत्येकी चार-चार विजेतेपदं या ‌दोघांनी मिळवली आहेत. त्यामुळे आता फेडरर, नादाल, जोकोविच यांच्याप्रमाणे‌ अल्कराझ, सिनर युगाची टेनिस विश्वात नांदी सुरू झाली आहे, असेच म्हणावे लागेल. भावी काळ या दोघांचाच असणार आहे असे चित्र सध्यातरी दिसत आहे. उपांत्य फेरीत कार्लोसने जोकोविचला नमविले. त्यामुळे ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील विक्रमी २५व्या जेतेपदाचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. वाढत्या वयाचा परिणाम आता जोकोविचच्या खेळावर होऊ लागला आहे. दुखापतीमुळे काहीसा त्रस्त असलेल्या जोकोविचसमोर पूर्ण फिटनेसबाबतदेखील प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे त्याच्या विक्रमी २५ ग्रॅन्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी दिसतेय. दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये सिनरने कॅनडाच्या अलियासिम अगरला नमविले. त्याअगोदर उपांत्यपूर्व फेरीत कार्लोसने लेहेकाचा, सिनरने मुसेलीचा, अगरने डी. मिनॉरचा आणि जोकोविचने अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचा पराभव केला. जोकोविचचा टेलरवर हा सलग अकरावा विजय होता. सिनर, मुसेलीने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून इटलीसाठी नवा इतिहास रचला.ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदा इटलीच्या दोन खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुरुष विभागात काही धक्कादायक निकालांची नोंद झाली. या स्पर्धेतील रशियाचा माजी विजेता मेदवेदेवला पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याला जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानावर असलेल्या बेंजामिन बोंझीने सरळ तीन सेटमध्ये नमविले. यंदाच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत एकदंर‌‌ मेदवेदेवची कामगिरी खराब झाली. फ्रेंच, विम्बल्डन स्पर्धेत तो सलामीला पराभूत झाला तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत त्याचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले होते. २०२१मध्ये तो अमेरिकन स्पर्धेत विजेता होता तर २०१९, २०२३मध्ये मेदवेदेव उपविजेता होता. विश्व क्रमवारीत १२व्या क्रमांकावर असलेल्या कॅस्पर रुडला दुसऱ्या फेरीत हार खावी लागली. बेल्जियमच्या रॅपर कॉलिजनने रुडला अटीतटीच्या साडेतीन तासांच्या लढतीत ५ सेटमध्ये नमविले. रुडने तीनवेळा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. त्यात अमेरिकन स्पर्धेचादेखील समावेश होता. पाचवे मांनाकन देण्यात आलेल्या जॅक ड्रॅपरने दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीतील सामन्यातून माघार घेतली. तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या तिसरे मांनाकनप्राप्त अलेक्झांडर झ्वेरेव तसेच चौदावे मांनाकनप्राप्त टॅमी पॅल तिसऱ्याच फेरीत पराभूत झाले. कॅनडाच्या फेलिक्स अगरने झ्वेरेवला तर अॅलेक्झांडर बुब्लिकने टॅमी पॉलला पराभूत केले. चौथ्या फेरीत फेलिक्स अगरने आणखी एक सनसनाटी विजय मिळवताना रशियाच्या पंधरावे मांनाकनप्राप्त आंद्रे रुबलेवचा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. फेलिक्सचा आंद्रेवर‌ केवळ दुसरा विजय होता. उभय खेळाडूंत आतापर्यंत झालेल्या ९ लढतीत आंद्रेने ७ सामने जिंकले. फेलिक्सने २०२१मध्ये अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. जोकोविचने यंदाच्या चारही ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून नवा विक्रम केला. ३८ वर्षीय जोकोविच चार‌ही ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. अमेरिकन स्पर्धेची तब्बल १९व्यांदा तिसरी फेरी गाठून जोकोविचने फेडररचा १८ वेळा तिसरी फेरी गाठण्याचा विक्रम मोडीत काढला. तब्बल ६४ वेळा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचादेखील आगळा पराक्रम जोकोविचने केला.

महिला गटात बेलारुसच्या २७ वर्षीय अरिना सबालेंकाने आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले. यंदा ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच स्पर्धेत अरिनाला अंतिम फेरीत हार खावी लागली होती. अखेर अमेरिकन टेनिस स्पर्धेत मात्र पराभवाची मालिका खंडीत करत अरिनाने ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील आपले चौथे विजेतेपद पटकाविले. याअगोदर तिने दोनवेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन, अमेरिकन स्पर्धेत सबालेंकाने महिला दुहेरीतदेखील प्रत्येकी एकदा विजेतेपद मिळवले आहे. अंतिम फेरीत अरिनाने यजमान अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. दीड तासातच अरिनाने बाजी मारली. पहिला सेट अरिनाने आरामात घेतला. दुसऱ्या सेटमध्ये अमांडाने थोडीफार झुंज दिली. पण अरिनाच्या आक्रमक खेळासमोर अमांडाची मात्रा फारशी चालली नाही. सुरूवातीपासूनच अरिनाने सामन्यावर चांगले नियंत्रण मिळवले. आपल्या वेगवान सर्विसला तिने फोरहॅन्ड, बॅकहॅन्ड फटक्यांची चांगली जोड दिली. त्यामुळे अमांडा हतबल झाली. सेरेना विल्यम्सनंतर सलग दोन अमेरिकन स्पर्धा जिंकणारी सबालेंका केवळ दुसरी खेळाडू ठरली. सेरेनाने २०१३, १४मध्ये दोनवेळा ही स्पर्धा जिंकली होती. अमांडा, सबालेंकामध्ये एकूण ९ लढती झाल्या. त्यामध्ये अमांडाने ६ तर सबालेंकाने ३ सामन्यांत विजय मिळवला. यंदा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांत तीनवेळा दोघी आमनेसामने आल्या. त्यात सबालेंका २-१ अशी आघाडीवर आहे.

यंदा जेतेपद मिळवताना सबालेंकाचा फारसा कस‌ लागला नाही. उपांत्य फेरीचा सामना वगळता इतर सर्व सामने सबालेंकाने सहज जिंकले. उपांत्य फेरीत जेसिका पेगुलाने पहिला सेट जिंकून सामन्यात जोरदार सुरूवात केली. पण पुढच्या दोन सेटमध्ये संबलेकाने आपला खेळ कमालीचा उंचावून जेसिकावर बाजी उलटवली. दुसऱ्या सामन्यात अमांडाने माजी विजेत्या नाओमी ओसाकाला चुरशीच्या लढतीत तीन सेटमध्ये पराभूत करुन फायनलचे तिकिट पक्के केले. पहिले दोन सेट टायब्रेकरमध्ये गेले. तिसऱ्या सेटमध्ये मात्र अमांडाने आपला खेळ अधिक वेगवान करत भराभर गुण वसूल करत सामना खिशात टाकला. उपांत्यपूर्व फेरीत माजी विम्बल्डन विजेती मार्केटा दुखापतग्रस्त असल्यामुळे कोर्टवर उतरली नाही. त्यामुळे सबालेंकाला सामना न खेळता उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. अमांडाने इगा स्वियातेकला नमवून आपल्या विम्बल्डन स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. विम्बल्डन स्पर्धेत इगाने अमांडाचा अंतिम सामन्यात ६-०, ६-० असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला होता. इगाने यंदा प्रथमच अमेरिकन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. इतर सामन्यात ओसाकाने ११वे मांनाकनप्राप्त कॅरोलिना मुचोवाचा तर जेसुका पेगुलाने दोन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा विजेत्या बार्बरा क्रेजोसोविकिचा पराभव केला. ओसाकाने तिसरे मांनाकन देण्यात आलेल्या माजी विजेत्या कोको गॉफचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०२३मध्ये कोकोने अमेरिकन स्पर्धा जिंकली होती. तब्बल ५ वर्षांनतर ओसाकाने अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फर्नांडेझने १२वे मांनाकनप्राप्त एकतेरिना अलेक्झांड्रावोचा दोन सेटमध्ये सनसनाटी पराभव केला. दोनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या व्हिनस विल्यमसला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. कॅरोलिना मुचोवाने सलामीच्या लढतीत व्हिनसला बाहेरचा रस्ता दाखवला.

यंदा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणाऱ्या मेडिसीन किजलादेखील सलामीला गारद व्हावे लागले. मेक्सिकोच्या रेनाटा झाराझुआने किजला तीन सेटमध्ये नमविले. किजने अनेक चुका या सामन्यात केल्यामुळेच तिला हार खावी लागली. रेनाटा विश्व क्रमवारीत ८२व्या स्थानावर आहे. फिलिपाईन्सची ऑलक्कझांड्इला आणि इंडोनेशियाच्या वेरोनिका कुडरमेटोव्हा या दोघींनी सलामीचे सामने जिंकून आपल्या देशासाठी नवा इतिहास रचला. ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत पहिला सामना जिंकणाऱ्या त्या दोघी ठरल्या. भारताच्या युकी भांबरीने पुरुष दुहेरीत न्युझीलंडच्या मायकेल व्हिनसच्या साथीत आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मजल‌ मारली. पण या जोडीला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या जोए सालिसबरी, नील स्कुपस्की यांच्याकडून हार‌ खावी लागली. पहिला सेट जिंकून, दुसऱ्या सेटमध्ये सुरूवातीला आघाडी घेऊनदेखील युकी, मायकेलने हा सामना नाहक गमावला.

मिश्र दुहेरी स्पर्धा यंदा प्रथमच नव्या स्वरुपात मुख्य स्पर्धेपूर्वी एक आठवडा अगोदर  खेळवली गेली. अवघ्या दोन दिवसात मिश्र दुहेरीतील सामने उरकण्यात आले. खेळाडूंच्या एकेरीतील   क्रमवारीनुसार मिश्र दुहेरीतील मांनाकन या स्पर्धेत देण्यात आले होते. जॅक ड्रॅपर आणि जेसिका पेगुला जोडीला पहिले मांनाकन देण्यात आले होते. गतविजेत्या सारा इरानी, आंद्रिया व्हावसोरी जोडीला यंदा विशेष प्रवेश देण्यात आला होता. या जोडीने‌ आपले ‌जेतेपद कायम राखण्यात यश मिळवले. अंतिम फेरीत या जोडीने‌ चुरशीच्या लढतीत इगा स्वियातेक, कॅस्पर रुड जोडीचा तीन‌ सेटमध्ये पराभव केला. या स्पर्धेत या दोघांनी विजेतेपद पटकावून भरघोस‌ ८ कोटी  ७४ लाख रुपयांची घसघशीत कमाई केली. नियमित ३२ जोड्यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात येत असे. यंदा मात्र १६ जोड्यांनांच प्रवेश दिला गेला. सामने दोन सेटचे प्रत्येकी चार, चार गेमचे. फक्त अंतिम फेरीत सहा गेमचा सेट. आठ जोड्या एकेरीतील क्रमवारीनुसार पात्र. इतर आठ जोड्यांची निवड अमेरिकन टेनिस संघटनेने केली. मिश्र दुहेरीतील या नव्या पद्धतीबाबत टेनिसप्रेमींनी मात्र नाराजी व्यक्त केली. दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडूंचा बळी देण्यात आला. त्यांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले. या सामन्यात दिग्गज खेळाडू हवेत तर सामने रंगतदार होतील. अन्यथा हे सामने मनोरंजनाचे आणि प्रेक्षणीय ठरतील अशा तिखट प्रतिक्रीया टेनिसविश्वात उमटल्या. आता पुढील वर्षी न जिंकलेले खेळाडू ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.

Continue reading

फलंदाजांना झुकते माप देणारे क्रिकेट पंच डिकी बर्ड!

हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला‌ तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे‌ एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध...

आशियाई चषकाने शुभमन गिलवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!

विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ आता युएई‌ येथे झालेल्या‌ आशियाई‌ चषक टी-२०‌ क्रिकेट स्पर्धेत‌ भारताने जेतेपदावर सहज कब्जा करुन क्रिकेटजगतावर आशियातदेखील आम्हीच राज्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून‌ दिले. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ यंदादेखील जिंकणार हे भाकित करायला कोणा...

पेनल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणाऱ्या खेळाडूंची भारताकडे वानवा

बिहारमधील राजगीर शहरात झालेल्या दहाव्या आशियाई‌ चषक हॉकी स्पर्धेत हरमनप्रीत सिंगच्या यजमान भारतीय हॉकी संघाने जेतेपदाचा शानदार विजयी चौकार लगावला. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावून भारताने पुढील वर्षी हॉलंड, बेल्जियम येथे होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम...
Skip to content