ठाणे राज्यातील असे शहर आहे की, या शहरात दिवाळी असो-नसो बाराही महिने रात्री-अपरात्री फटाके वाजतच असतात. गेल्या काही दिवसांतील मध्यरात्रीनंतरच्या फटाके वाजवण्याच्या प्रकाराची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यापुढे फटाके आणि बँडबाजा रात्री दहा वाजल्यानंतर वाजवल्यास सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. ठाणे शहर व आसपासच्या परिसरात महिन्यातील जवळजवळ सर्वच दिवशी रात्री दहा वाजल्यानंतर फटाके तसेच बँडबाजा व डीजे वाजवणे ‘कॉमन’ झाले आहे. काल मध्यरात्रीनंतर एक वाजता यासंबंधात आम्ही एक पोस्ट लिहिली हॊती. राजीव काळे, या अन्य ज्येष्ठ पत्रकारानेही त्याला वाचा फोडून पोलीस नियंत्रण कक्षाचे वाभाडे काढले होते. यात भर म्हणूनच की काय गेल्या काही दिवसांपासून या फटाक्यासंबंधात जनतेच्या तक्रारी वाढल्यामुळे पोलीस आयुक्तांनी यापुढे अशांची गय करू नका, कायद्यान्वये जितकी कडक कारवाई करता येईल तितकी करा, असा आदेश सर्व पोलीसठाण्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचे एका अधिकाऱ्याने सूचित केले.
विवाह समारंभ, त्याआधी साखरपुडा, हळदी समारंभ, हल्ली नव्याने सुरु झालेले ‘संगीत’ फॅड आणि बारशाच्या वेळीही रात्री दहानंतर फटाके वाजवून धिंगाणा घालण्याला सर्वसामान्य ठाणेकर वैतागला आहे. एकतर नोकरी-धंद्यासाठी वाहतूककोंडीत अडकू नये म्हणून नोकरदार ठाणेकर सकाळी नऊ वाजताच घर सोडत असतो. नोकरीवरून परतताना त्याला वाहतूककोंडीला सामोरे जावेच लागते. वाहतूककोंडीशी मनातल्या मनात चडफडत, सामना करत तो थकूनभागून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात पोहोचतो. पोहोचतो काय, तो धापा टाकत कधी अंगाचे मटकुळे खुर्चीत टाकतो ते त्यालाच कळत नाही. घाईगर्दीत दोन घास पोटात ढकलून तो बेडवर शरीर झोकूनच देतो. त्यात पुन्हा हे फटाके, बँडबाजा व डीजे यांनी त्याच्या डोक्याचा पार ‘लोच्या’ झालेला असतो. त्याची तक्रार कुणाकडे करणार? समाजसेवक/लोकप्रतिनिधीकडे? छे छे.. तिकडे तर जाताच येत नाही. कारण फटाके वाजवणारे लोक या प्रतिनिधींचेच कार्यकर्ते असतात तर डीजेवाला त्याचे अर्थकारण सांभाळत असतो. राहता राहिला समाजसेवक! याला आजकाल कुणीच विचारत नाही. वर्तमानपत्रे व माध्यमे? अरे, हे तर रोजचेच झाले आहे. त्याला ‘वृत्तमूल्य’ नाही व याचा खुलासाही येईल, या भीतीने ही मंडळी ‘की बोर्ड’ चालवतच नाहीत. शेवटी चडफडत, तडफडत तो या कुशीवरून त्या कुशीवर होत निद्रादेवीला शरण जातो.
खरंतर सर्वोच्च न्यायालयाने याआधीच रात्री दहा वाजल्यानंतर फटाके वाजवण्यास बंदी व वाहतुकीला अडथळा न आणता मिरवणूक व पालख्यांना परवानगी द्यावी असा असा आदेश दिलेला असतानाही संबधित पोलीसठाणी कारवाई करण्यास का कचरत होती? असे विचारले असता जवळजवळ सर्वांनीच लोकप्रतिनिधी वा त्यांच्या पंटर्सकडे न बोलता अंगुलीनिर्देश केला. एक दिवस फटाके वाजल्याने काही त्रास होत नाही हे आहेत कार्यकर्त्यांचे उदगार! यावर काय बोलणार कपाळ!! संपूर्ण ठाणेभर अनेक ठिकाणी, रुग्णालये, छोटी नर्सिंग होम्स, विशेष रुग्णालये, काही ठिकाणी तर वृद्धाश्रमही आहेत, हे ही मंडळी सोयीस्कररित्या विसरतात. शिवाय घरातील आजारी मंडळी, लहान मुले आदी यांच्या डोक्यातच येत नाहीत. पोलीस आयुक्तांचा उशिराने काढलेला आदेश चांगला असला तरी आतापर्यंत कारवाई का केली नाही याची विचारणा जरूर करावी, अशी मागणी करून काही ज्येष्ठ म्हणाले की, ज्या व्यक्तींनी कारवाईत अडचण निर्माण केली त्यांची नावे जनतेला समजलीच पाहिजेत.

फटाके वाजवणाऱ्याला पोलीसठाण्यात बोलवावे व सकाळपर्यंत बसवून ठेवावे व दंडसंहितेनुसार खटला भरावा तसेच बँडबाजा व डीजे जप्त करून कोर्टात जमा करावा. तसेच कारवाई करू नका वा त्यांना सोडून द्या, असे सांगणाऱ्या नेत्यांची नावे माझ्याकडे द्या असे सांगण्यासही आयुक्त विसरले नाहीत, अशी पुस्तीही एका अधिकाऱ्याने जोडली. फटाके वाजवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, असा जनहिताचा आदेश देतानाच आयुक्तांनी शहरातील वाहतूककोंडी हा काही एकट्या वाहतूक पोलिसांचा प्रश्न नसून ठाणे पोलिसांनीही आपला सहभाग त्यात नोंदवावा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्याचेही अन्य एका अधिकाऱ्याने माझ्याशी बोलताना सूचित केले. उदाहरणादाखल त्यांनी कापूरबावडी पोलीसठाण्याबाबत सांगितले की, कापूरबावाडी चौकातली कोंडी सोडवण्यासाठी जवळ पोलीसठाणे असूनही कधीही हवालदार रस्त्यावर दिसलेला नाही. म्हणूनच वाहतुकीसाठी जेमतेम अडीच लेन उपलब्ध होतात व बाकी रस्त्यावर खासगी वाहने व रिक्षा उभ्या राहतात. अशा वाहनांच्या चालकांनी सांगून ऐकले नाही तर अशा गाड्या खुशाल उचला (टो करा). कारण रस्ता पुरेसा मोठा असूनही वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाही हे न पटणारे आहे. अशीच काहीशी स्थिती कासारवडवली व कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेटच्या आतील भागात आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी व शहरातील वाहतूककोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळवून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केल्याचे समजते.
वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी जनता विशेषकरून वाहनधारकांनीही वाहतूक पोलिसांशी सहकार्य करणे गरजेचे आहे, असे ठाणे शहरात फिरल्यावर लक्षात येते. सिग्नलला गाड्या उभ्या करतानाही वाहनधारक पुढेपुढे येत कधी अर्धवर्तुळात पुढे जाऊन उभे राहतात ते कळत नाही. माजिवाडा चौकात लाल सिग्नलला गाड्या थांबल्या की सर्वच गाड्या पुढेपुढे सरकत जातात, कॅडबरी चौकातही हे पाहावयास मिळते. बाईकस्वार तर पुढेपुढे येत कधी अर्धवर्तुळ पूर्ण करतात तेच लक्षात येत नाही. त्यामुळे वाहतुकीच्या प्रवाहास अडथळा निर्माण होतो हे वाहनधारकांच्या लक्षात कसे येत नाही? हा प्रश्नच आहे. तसेच गोकुळ नगर, मुक्ताई नगरात रस्तारुंदीकरण जरूर झाले आहे. मात्र वाढलेली रुंदी वाहतुकीसाठी उपयोगीच पडत नाही, तेथे सरांर्स फेरीवाले तरी असतात वा गाडया पार्क केलेल्या तरी असतात. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या आजूबाजूला तर पदपथावर जाण्यासाठीही जागा ठेवली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. (शहरातील सर्वच पक्ष कार्यालयाच्या आजूबाजूला हीच परिस्थिती आहे.) कॅसल मिलसमोरील चौकात तर एका हॉटेलभोवती रिक्षा व गाड्या अशाप्रकारे उभ्या केलेल्या असतात की बसला वळण घेताच येत नाही. पुन्हा या गाड्या टो केल्या की, मुर्दाबाद.. जिंदाबाद.. मुर्दाबाद.. होणार. हे सर्व टाळण्यासाठी वाहधारकांनी काही प्रमाणात शिस्त पाळलीच पाहिजे.
“People sleep peacefully in their beds at night only because rough men stand ready to do violence on their behalf” असं ठाणेकरांना वाटेल तो सुदिनच म्हणावा लागेल. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, पोलीस आयुक्तांना सहकार्य करत ठाणेकरांची झोपमोड न करण्याचे आदेश द्यावेत. इतके झाले तरी मिळवले म्हणायचे!

