महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील आमचे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून माथेफिरूंचे समर्थन होत आहे. दिल्लीतल्या हिंसेचे ते उघडपणे समर्थन करत आहेत. म्हणून त्यांना सांगावेसे वाटते की, कुठे फेडाल ही पापे?, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आज केली.
राजधानी दिल्लीत काल प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारावर या पक्षांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ते बोलत होते. महाराष्ट्रतील आणि मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून जर बोट ठेवले तर तो महाराष्ट्र द्रोह होतो अशी भाषा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून केली जाते. मग दिल्लीच्या कालच्या घटनेमध्ये पोलिसांवर ट्रॅक्टर घातले गेले, पोलिसांचे ट्रॅक्टर बळी घेण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्या विरोधात कुणी चकार शब्दही काढला नाही. रोज वचवच करणारे खासदार संजय राऊत आज देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.

कधीकाळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार, तुमची फेसबुक पोस्ट आज या पोलीस आणि जवानांच्या बाजूने का आली नाही? म्हणूनच आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, या आंदोलनामध्ये वावर आणि वास अन्य लोकांचा चालू आहे. त्याचे समर्थक शरद पवार आणि संजय राऊत तुम्ही स्वतः आहात? आणि म्हणून तुमची तोंडे आज का शिवली आहेत? हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारत आहोत, असेही शेलार म्हणाले.
2014पासून 2020पर्यंत केंद्र सरकारने जनहिताचे निर्णय घेतले की, कधी लाँग मार्च तर कधी लाँग आंदोलन, कधी पुरस्कार वापसी, कधी पुरस्कार वापसीचे समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि मोदीविरोधकांनी घेतलेली आहे. आम्ही पाहिले की, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर नेमला की आंदोलन सुरू, जेएनयूमध्ये बर्सी कुणाची साजरी केली जाते, त्याला विरोध केला की दिवस-दिवस आंदोलन.. देशात नागरिकांना अभय मागणार्यांना केंद्र सरकारने सीएए कायद्यातून अभय दिले त्यावर रस्ते बंद करून आंदोलन.. म्हणून राजकीय सूडापोटी, मोदी द्वेषापोटी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दुर्दैवाने शिवसेना या देशात अराजकता माजवू पाहत आहेत. देशवासीय यांना सोडणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

कालच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस आणि जवानांनी जो परम्मोच्च संयम दाखवला तो त्यांच्या पराकोटीच्या देशभक्तीचा परिचय होता. केंद्र सरकार संयमाने या आंदोलनाला सामोरे गेले. तो केंद्र सरकारचा पराकोटीच्या देशभक्तीचा परिचय होता. विरोधकांना काय हवे होते? गोळीबार हवा होता का? आंदोलन चिघळलेले हवे होते का? माथी भडकवण्याचे काम पवार साहेब तुमच्याकडून अपेक्षित नाही. या विषयात न्यायालयात खटले आहेत. सरवोच्च न्यायालयाचे आम्ही ऐकणार नाही. न्यायालयाच्या समितीसमोर आम्ही जाणार नाही. समितीच्या सदस्यांवर आम्ही प्रश्न विचारू, तासन-तास दिवसेंदिवस कृषिमंत्री अत्यंत नम्रतेने चर्चा करू इच्छितात त्यांची आम्ही हेटाळणी करू, हे सगळे कशाचे द्योतक आहे? त्यामुळे संयमाची भाषा तर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने करू नये आणि माथेफिरूंचे समर्थक म्हणून काम करू नये, असेही ते म्हणाले.
पोलिसांनी चौकशी करून या संपूर्ण प्रकरणातील जो दोषी असेल त्याला पकडावा आणि माथेफिरूच्या समर्थकांतपर्यंतही पोलिसांनी पोहोचावे असे आमचे म्हणणे आहे. ज्यांचे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसर्यावर आरोप करू नये. जे सत्य आहे ते काल देशाने पाहिले. जे सत्य आहे ते चौकशीसमोर येईलच. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणे कुठल्या देशभक्तीत बसते? हे पवार आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे. पोलिसांवर लाठ्या उचलल्या, जवानांना लाथाबुक्क्यांनी मारणे, तलवारी काढणे, हे कुठल्या देशभक्तीमध्ये येते? हे पवार आणि संजय राऊत यांनी सांगावे. या आंदोलनाला ज्यांनी तीव्र रूप दिले त्यांची चौकशी तर होईलच, झालीच पाहिजे त्यासोबत ज्यांनी या हिंसेचे समर्थन केले त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शेलार यांनी केली.

