मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग व शिष्यवृत्ती विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून पीएम-वायएएसएएसव्हीआय (यंग आचीव्हर्स स्कॉलरशिप ॲवार्ड स्कीम फॉर व्हायब्रेट इंडिया) या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक (इ. 9 वी व 10 वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11 वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://scholarship.gov.in या संकेतस्थळावर सादर करावा. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, जातवैधता (लागू असल्यास), उत्पन्न प्रमाणपत्र, आधार-लिंक बँक खाते, बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, आधार प्रमाणीकरणासह 75 टक्के उपस्थितीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी याकामी विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे, असे आवाहनही रविकिरण पाटील यांनी केले आहे.

