Homeएनसर्कलअनुराग ठाकूर यांनी...

अनुराग ठाकूर यांनी केले भारत सरकारच्या दिनदर्शिका 2024चे अनावरण!

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी “हमारा संकल्प विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित भारत सरकारच्या दिनदर्शिका 2024चे नुकतेच अनावरण केले. दिनदर्शिका 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली आखण्यात आलेली लोकस्नेही धोरणे तसेच विविध योजना आणि उपक्रमांच्या योग्य अंमलबजावणीद्वारे भारतातील लोकांच्या जीवनात घडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तनाचे चित्रण करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले की, भारताने आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने प्रचंड प्रगती केली आहे. मोबाईल फोनचा जगात दुसरा सर्वाधिक आयातदार असलेला आपला देश  आज जगातला दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनला आहे. पूर्वी लस आयात करणारा आपला देश आता लस मैत्री उपक्रमाअंतर्गत संपूर्ण जगाला लस वितरित करत आहे. भारत आज उत्पादन निर्मिती क्षेत्रातला प्रमुख देश आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या क्षेत्रांमध्ये भारताचे अस्तित्व नव्हते अशा ठिकाणीही स्वतःला प्रस्थापित करण्याची ताकद आज भारतामध्ये आहे आणि हेच स्पष्ट करताना उदाहरण देत ते म्हणाले की, भारत आज तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम (परिसंस्था) आहे.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हे सरकारचे ध्येय आहे आणि सरकारच्या याच नीतिमत्तेनेच भारताला एके काळी नाजूक स्थिती असलेल्या पाच अर्थव्यवस्थांमधून आज जगातील पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोचवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही मूल्यभावना अधिक उच्च पातळीवरून प्रमाणित होते आहे, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप एका आशादायी विचाराने करताना, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 2023 हे वर्ष आता संपत असताना 2024 हे नवे वर्ष विविध संधींची नवी पहाट घेऊन येत आहे. संपूर्ण जग आज भारताकडे मोठ्या आशेच्या भावनेने पाहत आहे, भारताला जगाचे नेतृत्व करताना जगाला पाहायचे आहे.

यावेळी मंत्री महोदयांनी “हमारा संकल्प विकसीत भारत” या विषयावरील प्रदर्शनाचे उद्घाटनही केले.

कॅलेंडरविषयी

प्रत्येक महिना गेल्या 9 वर्षात भारत सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या माध्यमातून महिला, युवा, मध्यम वर्ग, शेतकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर खुललेल्या आनंदाच्या स्मितहास्याचे दर्शन घडवत आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी सरकारी संस्था आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना केलेले हे अभिवादन आहे.

जानेवारी

नव्या वर्षात प्रवेश करत असताना आपण ‘ क्षमतेचा पुरेपूर वापर, भारताला स्वयंपूर्ण बनवणे’ या संकल्पनेसोबत पहिल्या महिन्यासाठी  नवोन्मेष आणि चिवट वृत्तीचा अंगिकार करत आहोत. भारताने ‘ मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ यांसारख्या उपक्रमांद्वारे अभूतपूर्व यश मिळवले आहे आणि जानेवारी महिन्याची ही संकल्पना आपल्याला स्वयंपूर्ण आणि सक्षम भविष्याकरिता आपल्या एकत्रित प्रयत्नांची आठवण करून देत आहे. 

फेब्रुवारी

पुढे वाटचाल करत आपण “ राष्ट्रीय विकासाकरिता युवा शक्ती” या संकल्पनेसह फेब्रुवारी महिना साजरा करत आहोत. उद्योजकतेला चालना देण्यापासून तंत्रज्ञान आत्मसात करण्यापर्यंत, हा फेब्रुवारी महिना युवा वर्गाच्या योगदानात आणखी वाढ करण्याची, एका तेजस्वी आणि अधिक समावेशक भविष्याच्या दिशेने देशाला घेऊन जाण्याची हाक देत आहे.

मार्च

गरिबांची सेवा आणि वंचितांचे पुनरुत्थान या मोदी सरकारच्या सर्वोच्च प्राधान्याच्या बाबींपैकी एक आहेत. ‘वंचितांना प्राधान्य’ या संकल्पनेसह मार्च महिना, आपल्या कृती आणि आपली धोरणे यांचे प्रतिबिंब समावेशकता आणि न्याय यामधून प्रतिबिंबित होत असल्याचे सुनिश्चित करून ज्यांना खरी गरज आहे त्यांना पाठबळ उपलब्ध करून देण्यातच खरी प्रगती आहे याची आठवण करून देत आहे.

एप्रिल

महिला समाजाचा एक अविभाज्य घटक आहेत, त्यांच्या प्रगतीशिवाय समाजाची सर्वंकष प्रगती ठप्प होऊन जाईल. एप्रिल महिन्याची संकल्पना सर्व क्षेत्रात महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याला प्रोत्साहन देत आहे, ज्या क्षेत्रांमध्ये त्यांचे नेतृत्व आणि योगदान, निर्णय प्रक्रियेचा आणि शाश्वत विकासाचा अविभाज्य भाग असेल.

मे

समर्पित वृत्तीने परिश्रम करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या असामान्य  कार्याचा गौरव करण्यावर या महिन्याची संकल्पना आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी सरकारने राबवलेली धोरणे, शाश्वत पद्धतींना दिलेले पाठबळ आणि जे देशाचे पोषण करतात त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केलेले प्रयत्न हा महिना अधोरेखित करत आहे.

जून

गेल्या दहा वर्षात पीएम स्वनिधी, पीएम विश्वकर्मा आणि मुद्रा योजना यांसारख्या अनेक सरकारी उपक्रमांमुळे रोजगारांच्या संख्येत, स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये आणि भारतातील व्यापारामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. “ वाढत्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी ”  या संकल्पनेसह हा महिना रोजगारनिर्मितीवर आणि उद्यमशीलतेवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि त्यामुळे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा संदेश देत आहे.

जुलै

जुलै म्हणजे आपल्या समाजाचा कणा असलेल्या मध्यमवर्गीय घटकाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा महिना. देशाच्या मध्यमवर्गीयांच्या मेहनतीतूनच नव्या भारताच्या जडघडणीचे चैतन्य परिभाषित होत असते, आणि हा घटकच देशाचा विकास आणि नवोन्मेषाला पुढे नेण्यात आघाडीवर असतो. म्हणूच आपल्या सरकारने मध्यमवर्गीयांचे हित लक्षात घेऊन ‘दैनंदिन जगणे सुलभ’ (‘Ease Of Living’) करण्यासाठी सातत्याने काम केले आहे.

ऑगस्ट

ऑगस्ट महिना म्हणजे जागतिक आर्थिक पटलावर भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करणारा महिना. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल यांसारख्या महत्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने आपला देश जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.

सप्टेंबर

अत्याधुनिक सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधांमधल्या अत्यावश्यक गुंतवणुकीपासून ते वाहतुकीच्या विस्तृत जाळे उभे करण्यापर्यंत, देशाच्या प्रागतीक वाटचालीसाठीचा कोणत्याही परिस्थितीत टिकाव धरू शकणारा मजबूत पाया तयार करण्याकरता गेल्या दहा वर्षांत देशाने केलेल्या परिवर्तनशील प्रगतीची साक्ष देणारा महिना म्हणजे सप्टेंबर महिना.

ऑक्टोबर

ऑक्टोबर महिना म्हणजे आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात आणि नागरिकांना त्या परवडणाऱ्याही असाव्यात यादृष्टीने, आयुष्मान कार्ड, जन औषधी केंद्रे आणि नव्या एम्स आणि जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून देशातल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या उद्देशाने केलेल्या प्रगतीवर भर देणारा, आणि त्याचवेळी आरोग्यदायी भारताचे स्वप्न साजरे करण्यासाठी उद्युक्त करणारा महिना आहे.

नोव्हेंबर

आपल्या चराचरातील चैतन्यपूर्ण संस्कृतीचा अभिमान बाळगण्यापासून ते आपल्याकडील वैविध्यपूर्ण कलांना चालना देण्यापर्यंत तसेच आपल्या सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन करून आपल्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्यापर्यंत, अशा गोष्टींच्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्याकरता आपली मूल्ये आणि संस्कृती जोपासणे हीच नोव्हेंबर या महिन्याची संकल्पना आहे.

डिसेंबर

वसुधैव कुटुंबकम अर्थात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या ब्रीदवाक्याला धरून आणि मिशन लाईफसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारताने जगाचा मित्र अर्थात विश्वमित्र म्हणून स्वत:चे नवे स्थान निर्माण केले आहे.

या दिनदर्शिकेचे स्वरुप असे ठेवले गेले आहे, की त्यातून आपल्याला देशाच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःच्या समर्पणाची दररोज आठवण करून दिली जाऊ शकेल. या दिनदर्शिकेतून सर्वांना निर्धार, एकता आणि एकसामायिक दृष्टीकोनातून काम करत राहण्याची, आणि सर्व भारतीयांना सर्वांसाठी समृद्ध आणि विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळत राहील.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content