भरती परीक्षांचे पेपर फुटणे, त्यातील गैरव्यवहार या विषयावरील प्रश्न काही आमदारांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी एका व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे उपप्रश्न विचारला. वास्तविक, भास्कर जाधव हे अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात आणि संसदीय कार्य खात्याचाही त्यांना अनुभव आहे. पण, उपप्रश्न विचारताना जाधव यांनी मोबाईलवर आलेल्या व्हॉट्सअप संदेशाच्या वाचनानेच प्रश्न उपस्थित केले.
त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, भास्करराव मुळात तुम्ही हा प्रश्न विचारताय, तेच फेक नॅरेटिव्हचेच उदाहरण आहे. एक तर तुम्ही हा प्रश्नच मुळात व्हॉट्सअप संदेशाच्या आधारे विचारला आहे आणि त्या संदेशातील खरेपणाची शहानिशा केलेली नाही. वास्तविक, गेल्या दोन वर्षांत सरकारने एक लाख उमेदवारांना पारदर्शक परीक्षा घेत सरकारी नोकऱ्याही दिल्या आहेत. पण तुम्ही असाच फेक नॅरेटिव्ह पसरवायला मदत करत गैरप्रकारच झाले, हे अवास्तव चित्र रंगवत आहात. आता मी यासंदर्भात गुन्हाच दाखल करणार आहे.
लगेच, स्वतःला सावरत फडणवीस म्हणाले की, भास्करराव तुमच्यावर नाही गुन्हा दाखल करणार. पण हा चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. त्याबद्दल माहिती देताना फडणवीस म्हणाले की, पुण्यात एक संकेतस्थळ आहे आणि ते फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा उद्योग करत आहे. एरवी अभ्यासूपणे नियमांवर बोट ठेवत सत्ताधारी पक्षाला जेरीला आणणारे भास्कर जाधव, फडणवीस यांच्या प्रश्नांना शाळेतल्या मुलासारखे उत्तर देताना दिसत होते. फडणवीस यांनी विचारले की, भास्करराव तुम्ही व्हॉट्सअप मेसेजवरूनच प्रश्न विचारलाय ना.. त्यावर जाधव यांनी हो अशी मान डोलावली. या संदेशाची तुम्ही शहानिशा केलीत का.. त्यावर नाही, अशी मान जाधव यांनी डोलावली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी बाके वाजवत फडणवीस यांना प्रतिसाद दिला.
माझा तर तुमच्याबरोबरपण फोटो आहे..
तुमच्या नेत्यांचे उद्धव ठाकरेंचे घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेबरोबरचे फोटो आहेत.. या भाजपा आमदार नितेश राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, अहो, तुमचे तर अंडरवर्ल्डवाल्यांबरोबर फोटो आहेत.. चौधरी यांच्या या आरोपानंतर नितेश राणे यांनी प्रसंगावधान राखत टिप्पणी केली की, अहो माझे तर तुमच्याबरोबरही फोटो आहेत.. आणि विधानसभेत हास्यकल्लोळ उडाला.
घाटकोपरमध्ये बेकायदेशीर होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आणि नव्वदहून जास्त व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या घटनेवरून सोमवारी विधानसभेत शाब्दिक चकमक बघायला मिळाली. एकाच वेळी ठाकरे गटाचे सुनील राऊत आणि ज्येष्ठ आमदार अजय चौधरी या दोघांनाही अंगावर घेत नितेश राणे यांनी सभागृहात बाजी मारली.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे भावेश भिंडेंबरोबर फोटो आहेत आणि आमदार सुनील राऊत यांची भिंडेबरोबर व्यावसायिक भागीदारी आहे, असा आरोप राणे यांनी केला. त्यावर सुनील राऊत यांनी सभागृहात राणे यांना आव्हान दिले. राऊत म्हणाले की, भावेश भिंडेबरोबर एर रुपयाचाही आर्थिक व्यवहार असल्याचे सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन आणि आरोप खरा नाही झाला तर राणे यांनी राजीनामा द्यावा. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा भिंडेबरोबर फोटो आहे आणि तो मी ट्विट केला होता. त्यावरून बेकायदेशीर होर्डिंग लावून लोकांचे जीव घेणाऱ्या भिंडेला कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे, याचा तपास व्हावा, अशी मागणी करत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडेही या गोष्टीचा तपास केला जावा, अशी मागणी केली. त्यावर उसळून प्रतिक्रिया देत अजय चौधरी म्हणाले, अहो तुमचे तर फोटो अंडरवर्ल्डवाल्यांबरोबर आहेत. त्यावर राणे पटकन उत्तरले, अहो माझे तर तुमच्याबरोबर पण फोटो आहेत. त्यावर सभागृहात जोरदार हंशा उसळला.
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे होणार एका महिन्यात ऑडिट
मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व जाहिरात फलकांचे (होर्डिंग) स्ट्रक्चरल ऑडिट महिनाभरात केले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामन्त यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. जाहिरातीचे होर्डिंग कोसळून घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेचा विषय आमदार जितेन्द्र आव्हाड, अस्लम शेख, अतुल भातखळकर, पराग अळवणी, आशिष शेलार, अमित साटम आदींनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट तीस दिवसात केले जाईल, असे मंत्री उदय सामन्त यांनी विधानसभेत जाहीर केले.
आमदार राम कदम यांनी संबंधित होर्डिंगसाठी जबाबदार असलेल्या कंपनीच्या भिंडे या व्यक्तीचे फोटो उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असून तो आपण ट्विट केला होता, असे सांगितले. तसेच, राजकीय आशीर्वादामुळेच या व्यक्तीला कोरोना काळात इतक्या नियमबाह्य आकाराच्या होर्डिंगसाठी परवानगी दिली गेली, असा आरोपही कदम यांनी केला.
माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्यामार्फत या दुर्घटनेची चौकशी केली जात आहे. त्यात सर्वच बाबींची चौकशी केली जाईल, असेही सामन्त यांनी स्पष्ट केले. आमदार अजय चौधरी यांनी राम कदम यांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, या सभागृहात काही लोकांना उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय झोपही येत नाही आणि प्रसिद्धीही मिळत नाही. प्रसिद्धी हवी असेल तर उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागते.