उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार त्यांच्या फटकळ आणि मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याची झलक त्यांनी सुमारे सत्तर मिनिटांच्या आपल्या भाषणातही दाखवली. इतकेच नव्हे तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या वेळीही त्यांनी त्याचे दर्शन घडवले आणि सभागृहातील सदस्यांप्रमाणेच पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांनीही त्यांना हास्यकल्लोळात दाद दिली.
अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार नॉन स्टॉप गाडी सुटतात, तसे वेगाने भाषण करत होते. त्यावेळी त्यांनी मध्येच एकदा पॉज घेतल्यावर आणि त्यांना बोलायला त्रास होतोय, असे वाटल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना पाणी घ्या, असे सुचवले. त्यावर पटकन अजित पवार उत्तरले, मला नको, तुलाच पाण्याची गरज असेल. त्यावर सभागृहात हंशा उसळला.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अभिनंदन अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केले. ते करताना त्यांनी मराठी भाषेचे वर्णन चार काव्यपंक्तीत केले. ते म्हणाले-
अफाटची शब्दधन
गोड नाद सुखकारी
अग्रमान हे जिला
शारदेच्या दरबारी…
त्यावर विरोधी बाकांवरून एका सदस्याने सुभानअल्लाह…
अशी दाद दिली. त्यावर अजित पवार पटकन म्हणाले की, इकडे सुभानअल्लाह नाही रे बाबा, ते शेरोशायरीच्या वेळी… आणि सभागृहात पुन्हा हंशा उसळला.
अर्थसंकल्पीय भाषण झाल्यावर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणारे अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वालही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या वेळी अजित पवार यांनी पटकन कॉमेन्ट करून पुन्हा हंशा वसूल केला.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीलाच ते म्हणाले की, आमच्यात काहीही फरक झालेला नाही. फक्त खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. त्यावर अजित पवार पटकन हसतहसत म्हणाले, अजून यांच्या मनातून काही जात नाही.
मुख्यमंत्रीपदावरून थेट उपमुख्यमंत्री व्हावे लागल्याने एकनाथ शिन्दे नाराज आहेत, अशा आशयाच्या बातम्या गेले तीन महिने प्रसारमाध्यमांमधून झळकतात. त्यावर शिन्दे तसेच फडणवीस यांनीही वारंवार खुलासे केले आहेत. अगदी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतही फडणवीस यांनी आम्हा तिघांपैकी कोणीही नाराज नाही, असा दावा केला होता. पण, शिन्दे यांनी केलेले `फक्त खुर्च्यांची अदलाबदल आहे’, हे वक्तव्य आणि अजित पवार यांनी केलेली `यांच्या मनातून काही अजून जात नाही’ ही टिप्पणी, यामुळे पुन्हा शिन्दे यांच्या नाराजीचीच चर्चा विधानभवनात सुरू होती. विशेषतः अजित पवार यांच्या टिप्पणीनंतर शिन्दे यांचा चेहरा कसा पटकन उतरला, याचीच चर्चा होताना दिसत होती.