Friday, October 18, 2024
Homeबॅक पेजदिग्गज अभिनेते-दिग्दर्शक भरत...

दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक भरत गोपी यांना अनोखी आदरांजली!

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते व्ही. गोपीनाथन नायर अर्थात भरत गोपी यांच्या 86व्या जयंतीचे औचित्य साधून एनएफडीसी-एनएफएआयच्या वतीने ‘आघात’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ-राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने विशेष प्रयत्न करून 4K स्वरुपात रुपांतरीत केलेला आघात (1985) हा चित्रपट पाहण्याची संधी मुंबईतील चित्रपट प्रेक्षकांना मिळणार आहे.

मुंबई ॲकेडमी ऑफ मुव्हींग इमेज (MAMI) मार्फत आयोजित जिओ मामी मुंबई चित्रपट महोत्सवात शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी मालाड येथील आयनॉक्स इनॉर्बिट मॉल येथे हा चित्रपट दाखवण्यात आल्यानंतर भरत गोपी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच उद्या, 2 नोव्हेंबर रोजी अंधेरीतील पीव्हीआर आयकॉन इन्फिनिटी मॉल येथे दाखवण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

विजय तेंडुलकर यांच्या नाटकावर आधारित हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये दोन व्यापारी समूहांमधील सत्तास्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यावर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटात भरत गोपी यांच्यासह ओम पुरी, नसिरुद्दीन शाह, सदाशिव अमरापूरकर, अमरीश पुरी, अच्युत पोतदार, पंकज कपूर, रोहिणी हट्टंगडी, दीपा साही, के. के. रैना आणि एम. के. रैना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अभिनय केलेला आहे.

यंदाच्या मामी मुंबई चित्रपट महोत्सवात हा चित्रपट ‘भरत गोपी यांचे चित्रपट’ या उपक्रमाअंतर्गत दाखवण्यात येत आहे. भरत गोपी यांना भारतीय चित्रपट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या चित्रपटांचा वारसा हा अतिशय मोठा असून यंदाच्या काळातील अभिनेते, चित्रपट निर्माते यांच्यासह प्रेक्षकांसाठीही तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्या कारकिर्दित भरत गोपी यांनी मणि कौल, जी. अरविंदन, अदूर गोपालकृष्णन, गोविंद निहलानी आणि के. जी. जॉर्ज यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शक-निर्मात्यांसोबत काम केलं. मात्र त्यामध्ये केवळ दोन हिंदी चित्रपटांमध्येच ते दिसले. ‘आघात’ हा चित्रपट हा त्यापैकीच एक. या बाबी विचारात घेऊन एनएफडीसी-एनएफएआयने भरत गोपी अभिनित ‘आघात’ चित्रपट हा सध्याच्या काळात लोकप्रिय असलेल्या 4K या आधुनिक स्वरुपात आणला आहे.

एनएफडीसी-एनएफएआय या संस्था केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या भारतीय चित्रपट वारसा मोहीम (एनएफएचएम) या उपक्रमाअंतर्गत 2015 पासून भारतीय चित्रपट सृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि त्याला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे. या मोहिमेत दिग्गज दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांचाही सहभाग होता. जुन्या चित्रपटांना नव्या 4K स्वरुपात आणण्यासाठी एनएफडीसी-एनएफएआयने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले आहे.

आघात चित्रपटासोबतच एनएफडीसीने संग्रहित केलेल्या एलिप्पथायम, कोडियेत्ताम आणि चिदंबरम या चित्रपटांचे विशेष शोही जिओ मामी चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत या चित्रपटांची वेळ आणि ठिकाण यांच्याबाबत अधिक माहितीसाठी https://www.mumbaifilmfestival.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content