Thursday, October 24, 2024
Homeकल्चर +खार दांड्यात रंगले...

खार दांड्यात रंगले अप्रतीम कविसंमेलन!

मुंबईतील प्रसिद्ध समुद्रकिनारी विहार-कार्टर रोडच्या उत्तरेकडील एक छोटंसं मासेमारी गाव खार दांडा. त्याच्या विलक्षण स्थलाकृती, वालुकामय समुद्रकिनारा आणि लांब जेट्टीमुळे, खार दांडा अजूनही त्याच्या लहान निळ्या आणि केशरी मासेमारी बोटी आणि खांबावर कोरड्या बोंबीलच्या लांबलचक रांगांद्वारे ओळखला जातो. त्याच्यासोबत येथे तुम्हाला अध्यात्मिक अनुभव, सर्वोत्तम रेस्टॉरंट्स, मनोरंजन पर्याय आणि हँग-आउट स्पॉट्सही मिळतील.

येथे दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तुम्ही अध्यात्मिक अनुभव, ध्यान करण्यासाठी जिथे थोडा वेळ सार्थकी लावू शकता असं श्रीरामकृष्ण मठ. प्रत्येकासाठी कला सुलभ एक व्यासपीठ जिथे भारतभरातील कलाकारांची मूळ चित्रे, शिल्पे आणि इतर कलाकृतींची विस्तृत श्रेणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे ते म्हणजे रिदम आर्ट गॅलरी. नियमितपणे म्युझिकल नाईट आणि कॉमेडी शो आयोजित करणारं द हॅबिटॅट. गोड आणि खमंग पदार्थांसाठी प्रसिद्ध अद्वितीय बुडापेस्ट बेकहाऊस. सजावट ॲक्सेसरीजपासून डायरी, नोटपॅड किंवा मित्रांसाठी मजेदार भेटवस्तू घेण्यासाठी हॅपी बॉक्स. अनेक ब्रँडेड वस्तूंसाठी प्रसिद्ध असलेलं सुपरकिक्स. अशा ह्या खार दांडा परिसराच्या राम मंदीर रोड येथील पाटील हाऊसमधील गोरगरीब मुलांसाठी प्रसिद्ध असलेली अक्षर अकॅडमी. ही अकॅडमी आणि खार दांडा परिसर एक नवा इतिहास लिहित होता. आजवरचं सगळ्यात पहिलं कविसंमेलन अक्षर अकॅडमीमध्ये हर्षोल्हासात आणि आनंदी वातावरणात नुकताच संपन्न झालं. 

खार दांडा येथे “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “शोध आनंदाचा फाऊंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलं कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मुंबई, कल्याण, डोंबिवली, विरार, पनवेल अशा विविध भागांतून आलेल्या २० निमंत्रित कवींनी प्रत्येकी मराठी राजभाषा गौरव दिनाचे आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वरचित दोन बहारदार कविता सादर केल्या.

कविसंमेलनाची सुरूवात अगदी अनोख्या पद्धतीने करण्यात आली. विरार सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या आस्था मेश्राम हिने खणखणीत आणि बुलंद आवाजात शिवगर्जना सादर केली. या शिवगर्जनेमुळे उपस्थित काव्यप्रेमींमध्ये उत्साह संचारला. त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठात पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या माधवी पवार हिने पहाडी आवाजात साभिनय पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

त्यानंतर कवी मधुकर तराळे यांच्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या कवितेने कविसंमेलनाची सुरूवात झाली. त्यांच्यानंतर बालकवी वेदान्त पंडित, संतोष मोहिते, विक्रांत लाळे, नंदा कोकाटे, विलास सूर्यवंशी, स्वाती शिवशरण, गौरी पंडित, रजनी निकाळजे, प्रमोदिनी देशमुख, कविता झुंजारराव, समीर बने, शितलादेवी कुळकर्णी, प्रा. जगदीश संसारे, राकेश डाफळे, कल्पना म्हापुसकर, जयश्री चुरी, प्रसाद कोचरेकर आणि माधवी पवार यांनी पहिल्या सत्रामध्ये मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली.

मध्यंतरामध्ये शितलादेवी कुळकर्णी यांनी नावांवरून होणार्‍या गमतीगमतींवर आधारित एक प्रहसन सादर करून उपस्थितांना हसवलं तर स्वाती शिवशरण यांनी एकपात्री मधून चिमटे काढतानाच सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. 

ह्याच अवकाशादरम्यान विश्वभान प्रतिष्ठानतर्फे संस्थापक/अध्यक्ष प्रा. जगदीश संसारे यांच्या हस्ते तसेच शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, उपाध्यक्ष विद्याधर शेडगे, सचिव सनी आडेकर, विश्वभान प्रतिष्ठानच्या आस्था मेश्राम, माधवी पवार तसेच सर्व उपस्थितांच्या साक्षीने मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक/अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांना त्यांच्या साहित्य, कला, क्रीडा आणि समाजसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल “समाजरत्न २०२३” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व कवींनी आपल्या सर्वांगसुंदर कवितांनी सभागृह भारून टाकले. कविसंमेलनाच्या आयोजना महत्त्वाचा एक भाग असलेले सनी आडेकर यांनीही कविता सादर केली. बालकवी वेदान्त पंडित याची कविता बरंच काही सांगून गेली. श्रोतृवर्गानेही त्याच्या प्रतिभेचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या वतीने सहभाग सन्मानपत्र तसेच विश्वभान प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह देऊन सर्व निमंत्रित कवींना गौरविण्यात आले. प्रमोदिनी देशमुख यांनीदेखील युवावर्गाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या माधवी पवार हिचा गुणगौरव केला.

कविसंमेलनाचं समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर, प्रा. जगदीश संसारे, मधुकर तराळे आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी परिश्रम घेतले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढील कविसंमेलन घेण्याचे योजिले आहे. त्यासाठी संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान प्रमोदिनी देशमुख यांना देण्यात आला आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content