कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा रहीम आहेत, कुठे पमी मावशीही आहे तर कुठे बालब्राह्मचारीही आहे. ढोंगी ‘बुवा’ (अन बायाही) हा फार प्राचीन काळापासून मानवी समाजाला जडलेला एक महारोग आहे. सर्व धर्मांत आणि सर्व समाजात तो आढळून येतो. हिंदू समाजाच्या तर तो हाडीमासी खिळून बसलेला आहे. तुकोबांनी तर ‘लांब लांब जटा’ वाढवणाऱ्या ‘टिळा-टोपी-माळा-मुद्रा’ ही संतचिन्हे लेवून ‘परद्रव्य-परनारी’ याची अभिलाषा बाळगणाऱ्या या भोंदू ‘रसना-शिष्णाच्या अंकिता’ची थोबाडे फोडलेली आहेत. ‘ऐसे पोटभरे संत। तया कैचा भगवंत।।’ (आचार्य अत्रे ) असे रोखठोक वर्णन केल्यानंतर आणखी काय हवे?
महाराष्ट राज्य अस्तित्त्वात आल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर मध्येच भोंदूबुवा उपटलेले दिसतातच! माझ्या लहानपणी पाण्यावर चालणारे कुणी हटयोगी राव होते! त्यांची संभावना आचार्य अत्रे यांनीच ‘हट.. योगी राव’ अशा तिखट शब्दांत केलेली आठवते. त्यानंतर लखोबा लोखंडेचा प्रयोग झाला. गेल्या २५/३० वर्षांत राज्याने टिळाधारी वाघ पाहिले, कुणी अनिरुद्ध पाहिले, नरेंद्रबुवा पाहतच आहोत. खानदेश-मराठवाड्यातील टिळेधारी वाघाच्या शिष्यगणात तर तत्कालीन मुख्यमंत्रीच होते! मुख्य सचिवांनी केलेल्या गुप्त चौकशीत मुख्यमंत्र्यांचेच नाव आल्याने तो चौकशी अहवाल जाहीरच करण्यात आला नव्हता. वाघाच्या गैरप्रकारांची चौकशी मात्र झाली व त्याला शिक्षाही ठोठावली गेली. (हा चौकशी अहवाल आम्हा काही पत्रकारांना तेव्हाच्या खुद्द मुख्य सचिवांनीच दाखवला होता. मात्र त्यांची अट हॊती की काहीही छापणार नसाल तरच दाखवतो. कारवाईबाबत काहीही लिहा पण नावे नकोत.)

या बुवाबाजीवर नजर फिरवली असता एक दिसते की यातील काहीजण वा काहींचे जवळचे नातेवाईक महसूल विभागातील जमीन व्यवहाराशी संबंधित खात्यात कामाला होते. या नातेवाईकांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहाय्याने या सर्वच बुवांनी हजारो एकर्स सरकारी जमीन लाटली आहे. सध्याच्या काळातील एक बुवा तर महसूल विभागात तलाठी होते, असे समजते. अशोक खरातप्रकरणी रुपाली चाकणकर यांची एक राजकीय विकेट पडली आहे. पोलिसांचे विशेष चौकशी पथक याप्रकरणी तपास करत असल्याने आता किमान सहा महिने तरी संशयित निर्धास्त आहेत, कारण चौकशी सुरु आहे या एका वाक्यानेच त्यांना जीवदान मिळाले आहे. चौकशीची व्याप्ती पाहता तपासाचा अवधी वाढवूनच मिळण्याची शक्यता अधिक वाटते. “For every single saint sage, you have a hundred frauds” हे भूतपूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विधान शंभर टक्के पटणारे आहे. “महाराष्ट्रात या भोंदू बुवांचे पीक पूर्वीपासूनच होते. पण या बुवाबाजीला आजकाल भलताच ऊत आला आहे. कारण सत्ता आणि संपत्ती यांच्या अनन्वित अंदाधुंदीमुळे जनतेचा सर्व बाजूंनी कोंडमारा झाल्यामुळे जनता जास्तच दैववाडी, श्रद्धाळू आणि चमत्कारवादी बनली आहे. त्यामुळे कोणीही बुवाने किंवा बाईने उठावे आणि काय वाटेल ते ढोंग-धत्तुरे करून लोकांना फसवावे, अशी आजकालची दुनिया झाली आहे. आचार्य अत्रे यांनी तब्बल ५२ वर्षांपूर्वी केलेले विधान किती तंतोतंत आहे याचीच प्रचिती नव्याने येत आहे.
अशोक खरात या भामट्याचे प्रताप पाहता व औष्णोउदक भक्तांच्या गळी उतरवण्याची कला पाहता
“बाबा हा विश्वपिता
आई आदिमाता
बाबा हे परब्रह्म
आई त्यांचीच शोभा
हा शंकर, ही अंबा
हा इंद्र, ही रंभा
यांच्या या तेजापुढे
काय सूर्याचा टेम्भा?
आई बाबांची कृपा \ भवसागरी नौका \ घाई करा बसेल नाहीतर… यमराजाचा तोबा!” (आचार्य अत्रे)
अशा पद्धतीची आरतीही खरात बाबाच्या ईशान्येश्वर मठात नक्कीच होत असणार…

ढोंगी बुवा अशोक खरातप्रकरणी राजकारणी नेत्यांचा संबंध असला तरी आम्हाला त्यातून राजकारण मुळीच करायचे नाही. कारण श्रद्धा वा अंधश्रद्धा या सर्वच समाजात कमीअधिक प्रमाणात असतातच. यातील सर्व प्रकारच्या गैरप्रकाराविरुद्ध कठोर पावले उचलून कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. अशी कठोर शिक्षा झाल्यास भविष्यात आणखी ‘खरात’ होण्याची भीती कमी राहील. खरात यालाच शिक्षा होऊन भागणार नाही तर या गैरप्रकारात ज्या-ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी खरातला पाठीशी घातले वा तक्रारच घेतली नाही अशा सर्वांना जरब बसेल, अशी कारवाई मुख्यमंत्री देवाभाऊ करतील का?
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

