Friday, February 14, 2025
Homeहेल्थ इज वेल्थ२६ वर्षीय महिलेच्या...

२६ वर्षीय महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा

जवळजवळ तीन महिन्‍यांपासून पोटात दुखते, गोळा आल्यासारखे वाटते, श्‍वास घेणेही कठीण वाटते, अशी तक्रार करणारी महिला रुग्ण बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विष्‍णूप्रसाद नंदराय (व्‍ही. एन.) देसाई सर्वसाधारण रूग्‍णालयात दाखल झाली. तिची तपासणी केल्यावर पोटात मोठा मांसल गोळा अर्थात ट्यूमर आढळला. व्ही. एन. देसाई रूग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने दुर्मिळ आणि अत्यंत गुंतागुंतीची अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करुन या महिलेच्या पोटातून तब्बल ५ किलो वजनाचा ट्यूमर काढला आणि असह्य वेदनांमधून तिची सुटका केली.

पोटाचा वाढता आकार, श्वास घेण्यास त्रास व दैनंदिन जीवनात अतिथकवा या तक्रारींमुळे ही २६ वर्षीय महिला कमालीची त्रस्त होती. त्यांच्या पोटात सतत दुखत होते. तसेच त्यांचे वजन असाधारणपणे वाढत होते. या महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर यशस्वी गर्भधारणा व प्रसूती होऊन मूल झाले. तद्नंतर पोटदुखी होवू लागल्याने या महिलेने वेळोवेळी स्थानिक खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. मात्र, त्रासापासून सुटका झाली नाही. खासगी रुग्णालयात होणारा आर्थिक खर्च झेपणारा नसल्याने नातेवाईकांनी या महिलेला व्‍ही.एन. देसाई सर्वसाधारण रूग्‍णालयात उपचार घेण्यासाठी सुचवले. 

व्‍ही.एन. देसाई सर्वसाधारण रूग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) डॉ. हरबन्‍ससिंग बावा यांच्‍या सुचनेनुसार स्‍त्री रोग विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी या रुग्ण महिलेची समस्या जाणून घेतल्यानंतर अचूक निदान होण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतले. वैद्यकीय तपासणीदरम्‍यान महिलेच्‍या ओटीपोटाजवळ अंदाजे २१ सेंटीमीटर बाय २० सेंटीमीटर आकाराचा गोळा दिसत होता. एम.आर.आय. तपासणीत महिलेच्‍या पोटात उजव्‍या भागात एक गळू (सिस्ट) आढळून आला. त्‍याला वैद्यकीय परिभाषेत ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ म्‍हणतात. जगभरात बीजकोशाच्‍या गाठींपैकी केवळ १५ टक्के ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ असतात. सिटी स्कॅन, सोनोग्राफी आदी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, एकूणच स्थिती लक्षात घेता या महिलेवर शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय स्‍त्रीरोग विभागाच्‍या प्रमुख डॉ. ललिता मायदेव, डॉ. श्वेता काशीकर, डॉ. डोलोमनी आणि डॉ. निकिता यांच्‍या पथकाने घेतला. 

महिला रुग्णाचे वय व प्रकृती पाहता त्यांना शस्त्रक्रियेपूर्वी विविध आरोग्यवर्धक औषधे देण्यात आली. तसेच, फिजिओथेरपी देण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी नातेवाईकांना आजाराची पूर्ण माहिती देऊन अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्याबद्दल अवगत केले. रुग्ण व नातेवाईकांच्या परवानगीने या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्‍त्रक्रियेदरम्यान महिलेच्‍या बीजकोशातून २४ सेटीमीटर बाय २३ सेंटीमीटर आकाराचा अनेक कप्पे असलेला मांसल गोळा अर्थात ट्यूमर काढण्यात आला. या ट्यूमरचे अंदाजे वजन ५ किलो एवढे होते. त्या अंतर्गत २.५ लीटर एवढे ‘मुसिनस’ द्रव होते. शस्‍त्रक्रियेनंतर महिलेच्‍या वेदना दूर झाल्या. वैद्यकीय निगराणीमध्ये ठेवल्यानंतर बरे झाल्यावर महिलेला घरी सोडण्‍यात आले. या महिलेची प्रकृती आता उत्‍तम असून त्या पूर्ववत दैनंदिन कार्यरत आहेत.   

या शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने माहिती देताना देसाई रुग्णालयातील स्‍त्रीरोग विभागाच्‍या प्रमुख डॉ. ललिता मायदेव म्हणाल्या की, महानगरपालिका सर्वसाधारण उपनगरीय रूग्‍णालयात सुरू करण्‍यात आलेल्‍या ‘डीएनबी’ अभ्यासक्रमामुळे व्ही. एन. देसाई रूग्‍णालयामध्ये अशाप्रकारची आव्हानात्मक शस्त्रक्रिया करता आली. डीएनबीच्‍या माध्यमातून तसेच अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने उपनगरीय रूग्‍णालयांमध्‍ये जटील आणि पूर्वी कधीही न केलेल्या अशा अवघड स्वरुपाच्या शस्त्रक्रिया करणेदेखील आता शक्य होत आहे. लोकमान्‍य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. मोहन जोशी यांचे मार्गदर्शन, सिद्धार्थ महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालयाच्‍या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पाटील यांचा पाठिंबा आणि वैद्यकीय अधीक्षक (प्रभारी) डॉ. हरबन्‍ससिंग बावा यांच्‍या निर्देशाखाली केलेले व्यवस्थापन या सर्वांमुळे ही शस्‍त्रक्रिया यशस्वीपणे करता आली.

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content