Details
सर्वाधिक पत्रकारांना ‘संसद’ दाखविली बाळासाहेबांनीच!
03-May-2019
| 0
”
योगेश वसंत त्रिवेदी
yogeshtrivedi55@gmail.com
मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केली. या संघटनेने गेल्या ५३ वर्षांत अनेक चढउतार पाहिले. एकचालकानुवर्ती संघटना म्हणून शिवसेना पुढे आली. एक नेता, एक झेंडा आणि एकच मैदान अशी ओळख निर्माण होऊन या संघटनेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान पटकावले. स्वतःचा पंतप्रधान जरी या संघटनेला मिळू शकला नसला तरी लोकसभेचे अध्यक्ष आणि दोन मुख्यमंत्री या संघटनेने देशाला आणि राज्याला दिले. सामाजिक, सांस्कृतिक, लोकहितकारी कार्य करूनही माध्यमांनी सतत शिवसेनेवर टीकाच केली. असे असले तरी शिवसेनेने तब्बल सहा पत्रकारांना संसदेचा दरवाजा उघडून दिला. लोकसत्ताचे विद्याधर (अण्णा) गोखले, प्रभंजनकार नारायण आठवले, महाराष्ट्र टाइम्सचे भारतकुमार राऊत, इंग्रजीचे प्रीतिश नंदी, हिंदी सामनाचे संजय निरूपम आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना बाळासाहेब ठाकरे यांनी खासदार बनविले. यापैकी विद्याधर गोखले आणि नारायण आठवले हे त्यावेळच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते तर प्रीतिश नंदी, भारतकुमार राऊत, संजय निरूपम आणि संजय राऊत यांना राज्यसभेत जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली.
तसं पाहयला गेलं तर राष्ट्र सेवा दलातून शिवसेनेत येऊन शिवसैनिक बनलेले प्रमोद नवलकर हेही पत्रकारच. नवशक्तिमध्ये तब्बल पन्नास वर्षे ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर लिहून विश्वविक्रम करणारे प्रमोद नवलकर हे भ्रमंतीचा दिवाळी अंकसुद्धा प्रकाशित करीत असत. धुळे येथील शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील हेसुद्धा पत्रकारच होते. सध्याचे वादग्रस्त नेते, आमदार आणि धुळे येथे लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले अनिल गोटे हेही मूळचे पत्रकारच. स्वतः बाळासाहेब ठाकरे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार होते आणि मार्मिक, सामना आणि दोपहर का सामनाचे संपादक होते. आता या तिन्हीच्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. १९५५ साली प्रकाशभाई मोहाडीकर यांच्यासमवेत ‘श्याम’ नांवाचं नियतकालिक बाळासाहेब चालवीत असत. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका दिनू रणदिवे आणि अशोक पडबिद्री हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रसिद्ध करीत. त्याला शीर्षक प्रबोधनकार ठाकरे देत असत आणि ‘मावळा’ या नावाने बाळासाहेब ठाकरे त्यात व्यंगचित्र रेखाटत असत. आता ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले आहे. केतकरांना बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा राज्यसभेत जाण्यासाठी विचारणा केली होती, परंतु त्यांनी विनम्रपणे नकार दिला होता.
मनोहर जोशींनी लढवली ‘कमळा’वर निवडणूक!
काय? शीर्षक वाचून दचकलात? डॉ. मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ‘कमळ’ ही निवडणूक निशाणी घेऊन लोकसभा निवडणूक लढले? होय! अगदी खरंय. डॉ. मुरली मनोहर जोशी हे तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेतच आणि ते उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून येत असत. पण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ या निवडणूक निशाणीवर लोकसभेची निवडणूक लढविली होती, हा विनोद नाही तर ती वस्तुस्थिती आहे. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर १९७१ साली ‘ढाल तलवार’ या निशाणीवर शिवसेनेने लोकसभेची निवडणूक लढविली होती. शंकर प्रधान हे शिवसेनेतर्फे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून उभे होते तर उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून डॉ. मनोहर जोशी यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युती नव्हती. कारण तेव्हा भारतीय जनसंघ हा पक्ष अस्तित्त्वात होता. १९८० साली शिवसेनेचे प्रि. वामनराव महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणुकीत उभे होते. १९८० साली भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जवळ आले ते इतके समरस झाले की, १९८४ साली लोकसभेची निवडणूक शिवसेनेने ‘ढाल तलवार’ऐवजी चक्क भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ या निशाणीवर लढविण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात वामनराव महाडिक आणि उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात मनोहर जोशी लोकसभेच्या निवडणुकीत उभे होते. अर्थात दोन्ही मतदारसंघात महाडिक आणि जोशी यांना पराभव पत्करावा लागला. दक्षिण-मध्यमध्ये कामगार नेते डॉ. दत्ता सामंत आणि उत्तर-मध्यमध्ये काँग्रेसचे शरद दिघे खासदार झाले. १९८९ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी युती केली, जी मधला काहीकाळ वगळता अद्याप सुरू आहे. पराभव ही विजयाची पायरी असते, असं म्हणतात. त्यामुळे मनोहर जोशी १९८४ साली ‘कमळ’ या निशाणीवर पराभूत झाले असले तरी ‘कमळा’च्या साथीने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नंतर लोकसभेचे अध्यक्ष झाले. अर्थात त्यांनी पक्षनिष्ठा अबाधित ठेवल्यामुळेच! (ता. क.: कोहिनूर क्लासेसमुळे मनोहर जोशी यांना प्रिन्सिपॉल म्हणतात तर शिवसेनेवर त्यांनी मुंबई विद्यापीठात प्रबंध सादर करून पीएचडी मिळविली म्हणून त्यांना अभिमानाने डॉक्टर या उपाधीने संबोधण्यात येते.)
आचार्य अत्रेही लोकसभा निवडणुकीत पडले!
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील म्हणजे आपले सर्वांचे आबा. यांनी एकदा प्रा. अरूण गुजराथी यांच्या पराभवानंतर विधानसभेत बोलताना एक विदारक सत्य सांगत खंत व्यक्त केली होती. आबा म्हणाले, “काय परिस्थिती आहे पाहा, साने गुरूजींचे शिष्य असलेले अरूण निवडणुकीत पराभूत होतात आणि अरूण गवळी निवडून येतो. आजच्या राजकारणात निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची मानली जाते. नारायण राणे एकदा उद्विग्न होऊन म्हणाले होते की काम करणाऱ्याला कोण निवडून देत नाय, हे आमच्या लक्षात आलंय. सांगायचा मुद्दा असा की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा देत जो जबरदस्त लढा १९५६ च्या सुमारास झाला त्याचं नेतृत्त्व ज्या समाजधुरिणांनी केलं होतं, त्यात अग्रणी होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आचार्य अत्रे यांनी मराठा आणि केसरी या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मुखपत्र मानण्यात येणाऱ्या वृत्तपत्रांतून हा लढा अक्षरशः पेटवत ठेवला होता.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यात आला. पण हा मंगल कलश आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या आचार्य अत्रे यांना उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात १९६७ साली पराभव पत्करावा लागला होता. काँग्रेसच्या आर. डी. भंडारे यांनी आचार्य अत्रे यांचा पराभव केला होता. भंडारे यांना १ लाख ५८ हजार ६० मते मिळाली होती तर आचार्य अत्रे यांना १ लाख ५१ हजार १०८ मते मिळाली. बी. सी. कांबळे (अपक्ष) यांना ३८ हजार ४०५ मते मिळाली होती. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य अत्रे यांनी आपल्या भाषणांनी विधिमंडळ गाजविले आहे जर ते लोकसभेत निवडून गेले असते तर संसदही त्यांनी हादरवून सोडली असती. १९६७ चे सर्व खासदार आचार्य अत्रे यांच्या घणाघाती, विनोदी अशा विविध स्वरूपाच्या भाषणांपासून वंचित राहिले हे मात्र खरे! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाई डांगे यांच्यापासून मनोहर जोशी, राम नाईक यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तशी यादी करायची झाल्यास ती फार मोठी होऊ शकेल. जिथे अनभिषिक्त सम्राज्ञी समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांना राजनारायण यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, ज्येष्ठ नेते, संसदपटू अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत व्हावे लागले तिथे बाकीच्यांचे काय?”

