Friday, October 18, 2024
Homeमाय व्हॉईसदोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही चाळीसगाव का बुडाले? (भाग- अंतीम)

हा झाला शहरी भागाचा प्रश्न. ग्रामीण भागातही अनियंत्रित वाळू उपशाचा प्रश्न मुळावर उठला आहे. यापूर्वी त्याचे गांभीर्य कदाचित गावांनाही लक्षात आले नसेल. पण आता त्यांना ते लक्षात घ्यावे लागेल. केवळ निसर्गावर खापर फोडून सुटका नाही. साऱ्या गावाने मिळून वाळू तस्करांना हाकलून द्यावे लागेल. गावागावात ग्रामठराव करून वाळूउपशाच्या ठेक्यांविरोधात दंड थोपटून उभे राहवे लागेल. अवैध वाळू उपशातून काहींचे उखळ पांढरे होत असेलही; पण या नतद्रष्टांना आता गावाने उखळात घेऊन ठेचून काढण्याची वेळ आली आहे. आपल्या गावचा, परिसरातील नैसर्गिक भवताल वाचविला तरच पुढे आपण जगणार आहोत.

हिंगोणा ग्रामस्थांनी अनेक दिवस वाळू तस्करांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी उपोषण केल्याचे आठवते. त्यात लोकप्रतिनिधींचा कितपत पाठींबा होता, याचाही हिशेब आता व्हायला हवा. प्रफुल्ल साळुंखे यांनी वाळू उपशामुळे नदीपात्रात होणारे खड्डे कसे शेतातील माती ओढून नेण्याला कारणीभूत ठरतात आणि शेतात पाणी घुसून नाला कसा होतो, याचे विस्तृत आणि मुद्देसूद विवेचन केले आहे. हे सारे ध्यानात घेणे आवश्यक आहे. नुसता निसर्ग कोपत नाही; आपल्या चुकांनी, दुर्लक्ष, बेपर्वाई आणि बेजबाबदारीने त्याचे थोडेसे अनियमित रूपही रौद्र रूप धारण करून मग भयंकर तडाखा देत छेडछाडीचे, त्याच्याशी खेळल्याचे सारे हिशेब वसूल करते.

आता पुन्हा चाळीसगाव शहराकडे वळूया. तितूर नदीला अचानक पूर आल्याने नदीशेजारील अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याचे व मोठे नुकसान झाल्याची ताजी घटना यापूर्वी दोन वर्षांपूर्वी घडलेली स्मरणात असेल. त्यानंतर कुणी काय दिवे लावले, याचा हिशेब विचारण्याची हिंमत हे शहर करणार आहे का? त्याहीवेळी हे लक्षात आले होते, की गेल्या काही वर्षांपासून मुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते. एकदा तर जुन्या नगरपालिकेपर्यंतही त्यातून पाणी पोहोचलेच होते की..

याचे एक मूलभूत कारण तेव्हाही लक्षात आले होते की- छोट्या गुजरीतील व हॉटेल दयानंदजवळील मोठ्या पुलाला केवळ दोन ठिकाणी पाणी पास होण्यासाठी जागा आहे. त्यामुळे वरून येणारे पाणी जास्त आणि पुलाखालून पास होणारे पाणी कमी होत असल्याने बंधाऱ्याप्रमाणे हे पाणी अडवले जाते. मग ते ओव्हर फ्लो होऊन आजूबाजूला वाट मिळेल तिकडे शिरते, दुकानातही घुसते. याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी तेव्हा केली गेली होती. आश्वासनेही दिली गेली होती. अधिकाऱ्यांना झापलेही गेले होते; मग पुढे काय झाले? दोन वर्षांत कुणी काय केले? काही केले असते, तर आजची वेळ नक्कीच आली नसती.

चाळीसगाव

पालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीचे पात्रच गायब!, अशी दैनिक “लोकमत”मधील एक बातमीही 2-3 महिन्यांपूर्वीच वाचनात आली होती. त्यात तितूर नदीपात्रात सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र गायबच झाले, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. पालिकेने शहरातून जाणाऱ्या नदीच्या पात्राची रुंदी निश्चित केलेली नाही. पूररेषेची आखणी केलेली नाही. अशात नदीवर बांधण्यात आलेला चित्रविचित्र आकाराचा लोखंडी पूल व त्याची लांबी पाहता या नदीचे पात्र किती आहे, याचा अंदाज सहज येतो, हे त्या वृत्तात स्पष्टपणे म्हटले होते. पालिकेच्या दुर्लक्षामुळेच नदीचे पात्रच गायब झाले अन् सुशोभिकरण कसले, विद्रुपीकरण झाले आहे, हे सत्य आहे. नदीची सफाई आणि खोलीकरण ही कामे वेळोवेळी, योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. आजच्या शहराला बसलेल्या फटक्याचे ते मुख्य कारण आहे.

नदी स्वच्छतेसाठी यापूर्वी दुकानदार, नागरिकांनी केलेल्या सूचना.. (स्थानिक वृत्तांनुसार)

1. नदीची पूररेषा व सर्व्हे नक्की केला पाहिजे. 

2. नदीतील अतिक्रमणे काढली पाहिजेत. 

3. नदीपात्रात गटारांचे पाणी सोडणे थांबवावे. 

4. नदीपात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करावा. 

5. नदी प्रदूषणमुक्त करण्याकडेदेखील लक्ष द्यावे. 

6. पावसाळ्यापूर्वी 70 टक्के आणि पावसाळा व त्यानंतरच्या काळात 30 टक्के सफाई करण्यात यावी.

7. शहरात दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी-नाल्यांमधून गाळ उपसण्याचे काम करण्यात यावे. 

8. पूर आल्यावर दुकानात पाणी जाणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यायला पाहिजे.

थोडासा नद्यांचा भूगोल..!

चाळीसगाव शहर डोंगरी व तितूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. डोंगरी नदी पाटणादेवीच्या डोंगरात, सह्याद्री पर्वतरांगात, धवल तीर्थापासून उगम पावते. या डोंगरी नदीच्या किनारी उंचावर वसलेले ठिकाण म्हणजे पाटणादेवी तीर्थक्षेत्र. इथेच पुढे आहे गौताळा औट्रमघाट अभयारण्य! तितूर ही पश्चिमेकडून येणारी नदी. चाळीसगाव शहरात दत्तवाडीनजीक या दोन्ही नद्यांचा संगम होतो. त्यानंतर चाळीसगाव शहराच्या मधोमध धावणारी तितूर पुढे गिरणाला मिळते.

चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत- जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून तितूर नदी वाहते. चाळीसगावात तितूर व डोंगरी नदीचा संगम असलेल्या परिसरात लागूनच मस्तानी अम्मा टेकडी दर्गा आहे. याशिवाय, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा पीर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबांचा दर्गाही जवळच आहे.

फेसबुकवर व्यक्त झालेल्या काही चाळीसगावकरांच्या प्रतिक्रिया.. (त्यांच्या शब्दात, जशाच्या तशा)

• नुसतं वाहत्या पाण्यात नारळ सोडून काम अजिबात होत नाही. मग विकासाचा नकली फुगारा फुटल्याशिवायपण राहत नाही. म्हणून तालुक्यात काहीतरी वेगळं करायचे असेल तर प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केले पाहिजे. ही नदी मृत झाली आहे. ती पुन्हा जिवंत करण्याचं काम स्वतःला नेता समजणाऱ्या लोकनेत्यांनी केले पाहिजे. शहरातील नद्या जिवंत होण्यासाठी पालिकेचे योगदान महत्त्वाचे आहे.

• नदीपात्रातील जमिनी पण अनेक जणांनी अनाधिकृत बळकावून पक्की बांधकामं केली आहेत. त्यावरपण संबंधित मुर्दाड प्रशासकीय यंत्रणा व पाकीटबहाद्दर, चिरीमिरीछाप नगरसेवक यांच सोईस्कर दुर्लक्ष झालं आहे..

• काहीही करा, कितीही लिहा, काहीच फरक पडणार नाही.. दर रविवारी, आपले कुटुंब सोडून, कोरोनाच्या महाभयंकर संकट डोक्यावर असल्यावरसुद्धा श्री शर्माजी सुमारे एका वर्षांपासून  चाळीसगाव शहरातील घाण दूर करताहेत. स्वच्छता करत आहेत. वेळोवेळी ते संबंधित यंत्रणेला जाणीव करून देत आहेत. तरीही कोणीही जागे होत नाही. शहरातील नागरिकांचे दुर्दैव याशिवाय काय म्हणणार?

थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रीय विद्यालय कन्या शाळाही यावेळी पाण्यात होती. नदीकाठी शाळा बांधकाम धोक्याचं आहे, असे सांगूनही ऐकले गेले नाही. कधी दिवसा अचानक शाळा सुरू असताना पाण्याचा लोंढा आला तर.. चाळीसगावकर हा विचार करणार आहेत का? विकास जर शहराला विनाशाकडे नेणारा असेल तर तो नसलेला अधिक हिताचा!

Continue reading

कर्जाचे इएमआय सध्यातरी जैसे थे!

खुशखबर! तुमचे लोनचे हफ्ते (इएमआय) वाढणार नाहीत, कर्जही महागणार नाही; रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.5% कायम ठेवला आहे. सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही! भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) FY25साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनासाठी जीडीपी वाढीचा अंदाज...

दोन वर्षांपूर्वीच्या तडाख्यानंतरही चाळीसगाव का बुडाले?

एक पोस्ट पाहिली कुठेतरी- महाड, चिपळूणनंतर आता कन्नड, चाळीसगाव. विकास चार आण्याचा, आपत्ती व्यवस्थापन बारा आण्याचे! दोन वर्षांपूर्वी, 2019मध्ये ऑक्टोबर महिन्यात तितूर नदीला असाच अचानक पूर आला होता. ती आजच्या घटनेची नांदी होती. निसर्गाने धोक्याची घंटा वाजविली होती. मात्र, तेव्हा...

गुंतवणूक करायची तर “झोमॅटो” सबस्क्राईब करा!

गुंतवणूक करायची तर "झोमॅटो" सबस्क्राईब करा! 72 ते 76 ₹ प्राईसबँड.. अप्पर प्राईस 76ला सबस्क्राईब करा. आज ओपन झाला आहे आणि 16 जुलैला ऑफर क्लोज होईल. कमीतकमी 195 शेअर्स म्हणजे 76X195 = 14,820ची गुंतवणूक करा. चुकून शेअर 76च्या खाली लिस्ट...
Skip to content